का ल द र्श क

Sunday 11 July 2021

देशबांधवाचा संपत्तीतला हिस्सा

एकदा एक धनिक उद्योगपतींनी एका जाहिर सभेत सारे भारतीय आपले बांधव आहेत वगैरे नेहमीचे यशस्वी भाषण केले.  त्यानंतर पुष्पगुच्छ, हारतुरे, शाल, श्रीफळ  वगैरे सत्कार समारंभाचे सोपस्कार पार पाडले जाऊन उद्योगपती आपल्या घरी परतले.  


दुसर्‍या दिवशी सकाळी ते चहा न्याहारी उरकत बागेत निवांतपणे ताजे वर्तमानपत्रात वाचीत असतानाच त्यांना प्रवेशद्वारापाशी कसलासा गोंधळ ऐकू आला.  एकूणात काय प्रकार आहे हे पाहण्याकरिता ते फाटकापाशी आले तेव्हा एक व्यक्ति आत प्रवेश करण्याकरिता पहारेकर्‍यासोबत हुज्जत घालत असलेला त्यांना दिसला.   पहारेकर्‍याला खुणावून उद्योगपतींनी त्या व्यक्तिस आत येऊ दिले.  

त्या व्यक्तिने उद्योगपतींना आदरपूर्वक नमस्कार करुन संवादास सुरुवात केली.  

"मान्यवर,  कालचे आपले भाषण फारच सुंदर होते.  अगदी काळजाला भिडले."

"धन्यवाद."

"विशेषतः सर्व भारतीय आपले बांधव आहेत असे जे आपण सांगितलेत त्यामुळे मला फारच आनंद झाला.  तर मग त्यानुसार मी देखील आपला धाकटा भाऊच नाही का?"

"नक्कीच. मी तुला माझा धाकटा भाऊच मानतो."

"तर मग आपल्या ह्या संपत्तीवर भावाच्या नात्याने माझाही हक्क असेलच ना?  तेव्हा मी माझ्या वाटची संपत्ती घ्यायला आलो आहे.  कृपया मला माझा हिस्सा द्यावा."

"हो हो नक्कीच. का नाही? हे घे." असे म्हणत त्यांनी पाकिटातून एक रुपया काढत त्या व्यक्तिच्या हातावर ठेवला.  

"हे काय? धाकट्या भावाचा हिस्सा फक्त एकच रुपया?" तो व्यक्ति आश्चर्यचकित होत मोठ्याने ओरडला.  

"अरे, हळू बोल.  इतर भावंडांनी ऐकलं ना तर तुझ्या वाट्याला इतकी रक्कम देखील येणार नाही."  
_________________________________________________________________________________________________________________________________________

विनोद इथेच संपतो.  हा विनोद साधारण पस्तीस वर्षांपूर्वीचा आहे.  त्या काळी भारताची लोकसंख्या ही सुमारे ऐंशी कोटी होती आणि अनेक नावाजलेल्या धनिक उद्योगपतींचीही एकूण संपत्ती ही सरासरी पन्नास ते साठ कोटींच्या आसपास असायची.  त्या अर्थी पन्नास कोटी रक्कम जर सर्वच्या सर्व ऐंशी कोटी भावंडांमध्ये वाटायची ठरविली तर प्रत्येकाच्या वाट्याला एक रुपयापेक्षाही कमी रक्कम येईल हे त्या उद्योगपतींचे गणित अगदी बरोबर होते.  

आज पस्तीस वर्षांनंतर भारताची लोकसंख्या सुमारे एकशे तीस कोटींवर पोचली आहे.  मात्र या पस्तीस वर्षांत माणसाची जमिनीची गरज वाढल्याने जमिनीचे भाव कैक पटींनी वाढले.  याशिवाय इतर गरजा, चंगळवाद फोफावला.  शेअरबाजाराचा वारुदेखील चौखूर उधळल्याने तिथले निर्देशांकही प्रचंड वाढले.  परिणामी लोकसंख्या दुप्पट देखील झाली नाही पण धनिक उद्योगपतींची संपत्ती तीनशे ते चारशे पटींनी वाढली.  पस्तीस वर्षांपूर्वी ज्या उद्योगपतींची संपत्ती पन्नास ते साठ कोटी असायची आज ती सहज पंधरा ते वीस हजार कोटी झाली.  

म्हणजे पस्तीस वर्षांपूर्वीच्या ह्या विनोदासारखी परिस्थिती आज उद्भवली तर पंधरा हजार कोटी संपत्तीचा मालक असलेल्या धनिकाने संपत्तीतला वाटा मागणार्‍या गरीब बांधवाला शंभर रुपये काढून द्यायला हवे.  पण असे घडणार नाही.  कारण धनिकाच्या दृष्टीने पस्तीस वर्षांपूर्वी एक रुपयाची जेवढी किंमत होती त्यापेक्षाही आज शंभर रुपयांची किंमत नक्कीच कमी आहे परंतु गरिबाला पस्तीस वर्षांपूर्वी एक रुपयाचे जेवढे मोल होते त्यापेक्षा निश्चितच आज शंभर रुपयाचे मोल त्याला बरेच जास्त आहे.  त्यामुळे पस्तीस वर्षांपूर्वी धनिक उद्योगपती संपत्तीमधला वाटा म्हणून फक्त एक रुपया देत आहेत हे पाहून गरीब बांधव निराश होऊन जात असला तरी आज जर शंभर रुपये मिळत आहेत हे समजले तर लाखो बांधव संपत्तीतला वाटा द्या म्हणत धनिकाच्या प्रवेशद्वारापुढे रांगा लावतील.

हे असे का घडतेय?  कारण सामाजिक विषमता वाढली.  श्रीमंतांची श्रीमंती कैक पटींनी वाढली तर गरिब अजूनच दारिद्र्याच्या खाईत लोटले गेले.  पस्तीस वर्षांपूर्वी पन्नास हजारांच्या कारमधून फिरणारा आणि पंचवीस लाखांच्या बंगल्यात राहणारा धनिक आज चार सहा कोटींची मोटारगाडी (की मोटारगाड्या?) सहज फिरवतो आणि हजार कोटींच्या बंगल्यात राहतो आणि तसेच अजूनही काही बंगले त्याचे सेकंड होम, थर्ड होम म्हणत देशांतल्या वेगवेगळ्या शहरांत असतात.  त्यामुळेच धनिकाच्या लेखी आजच्या शंभर रुपयांना पस्तीस वर्षांपूर्वीच्या एक रुपयाइतकीही किंमत नसली तरी गरिबाला आज शंभर रुपयांत बर्‍याच गोष्टी मिळू शकतात ज्या तेव्हा एक रुपयात नक्कीच मिळू शकल्या नसत्या.  आज शंभर रुपयांत आठ वडापाव मिळतात. यात गरिबाचे दोन वेळचे पोटभर जेवण होते.  आता तर शिवभोजन थाळी, अम्मा कँटीन इत्यादींमुळे गरिब व्यक्ति शंभर रुपयांत पाच दिवस दोन वेळ जेवू शकतो.  अशा प्रकारे स्वस्तातले व निकस परंतु तरीही पोटाला तात्पुरता आधार देणारे अन्न खाऊन कमी मजुरीत श्रीमंतांची चाकरी करायला तयार असणारे कोट्यावधी मजूर या देशात उपलब्ध आहेत.  या कमी मोबदल्यात मिळणार्‍या श्रमांना खरेदी करुन त्याद्वारे निर्मित उत्पादनांची  बाजारात अतिरिक्त मोल वसूल करुन विक्री करणारे धनिक स्वतःची संपत्ती लॉगॅरिथमिक दराने वाढवित आहेत आणि ही गरिब - श्रीमंतांमधली दरी व  परिणामी सामाजिक विषमता भयानक वेगाने वाढतेय.  

शिवाय आता धनिक फार चतुर झाले आहेत.  ते वैयक्तिक स्तरावर प्रत्येक अनोळखी गरीब बांधवाला शंभर रुपये देण्याचा भोळसटपणा न करता काही निवडकांना यापेक्षा मोठ्या रकमेची मदत निश्चितच करतील पण ही मदत एखाद्या सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून करतील जेणेकरुन पुन्हा त्या फाऊंडेशनला लाखो भोळसटांकडून देणग्या मिळवता येतील.  त्यांनी शंभर कोटी जरी दान केलेत तरी  प्रसारमाध्यमे समाजमाध्यमे यांच्याकरवी त्याची इतकी जोरदार प्रसिद्धी करतील की फाऊंडेशनला हजारो कोटींचे देशी आणि विदेशी फंडिंग सहज मिळेल.  शासनाकडून कवडीमोल भावाने जमिनी, वीज, पाणी व इतर सुविधा मिळवतील.   बरेच अब्जाधीश त्यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात दान केल्याचा देखावा करतात पण तरीही श्रीमंतांच्या क्रमवारीतला त्यांचा वरचा क्रमांक घसरत नाही किंवा  त्यांच्या संपत्तीचा आकडा कमी न होता दिवसेंदिवस वाढतच जातो.  तर काहींच्या बाबतीत वैयक्तिक संपत्ती तुरळक प्रमाणात कमी झाली तरी यांचेच सोशल फाऊंडेशन गबर झालेले दिसते.  त्याच  सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष पद भुषवित उद्योगपती-पत्नी फाऊंडेशनच्या रकमेतून पुन्हा महागड्या गाड्या, अलिशान वातानुकुलित कार्यालये आणि विदेश वार्‍यांची चंगळ करताना दिसतात.  

जर गेल्या कित्येक वर्षांपासून हे सर्व श्रीमंत धनिक मान्यवर दानाचा महापूर वाहावत आहेत तर आजही ह्या देशात इतकी प्रचंड गरिबी कशी? या प्रश्नाचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही.  आणि हे सगळे आक्रित घडले ते लोकसंख्या वाढल्यामुळे.  खरे तर लोकसंख्या ही पस्तीस वर्षांपूर्वीच्या दुप्पट देखील झाली नाही.  जर यापेक्षा जास्त वाढली (जी वाढणारच आहे) तर काय भयावह परिस्थिती ओढवेल?

शरीरावर वाढणार्‍या चरबीप्रमाणे वाढत्या संपत्तीची पुटे या धनिकांभोवती चढली आहेत त्यामुळे गरिब श्रीमंतांमधील सामाजिक आणि  सांस्कृतिक अंतर देखील फारच वाढले आहे.   प्रवेशद्वारावर वैयक्तिक भेटीचा आग्रह धरणार्‍या गरिबाला आत बोलावून  त्याच्याशी वैयक्तिक संवाद साधण्याकरिता असणारा दोन मिनीटांचा वेळ आणि आपुलकी आजच्या धनिकाकडे नक्कीच नाहीये.  परिणामी वर नमूद केलेला विनोद आता पस्तीस वर्षांनंतर पुन्हा घडणे शक्य नाही.   सरपोतदारांनी मानेंना दिलेल्या रकमेप्रमाणेच हा विनोद देखील आता वारला.