का ल द र्श क

Wednesday 17 November 2010

(खर्‍या) करोडपतींना सलाम

कौन बनेगा करोडपती या दुरचित्रवाणीवरील खेळाचा चौथा मौसम सध्या जोरात चालु आहे.  पहिला मौसम साधारण दहा, अकरा वर्षापूर्वी चालु झाला असावा पण तेव्हा उपग्रह वाहिन्या बघण्याची सोय आमच्या दूरचित्रवाणी संचात नसल्याने मी तो बघू शकलो नाही.  अर्थात त्याविषयीची चर्चा नियमितपणे कानावर पडत असे.  अशाच अनेक अनौपचारिक गप्पांमध्ये चर्चिला जाणारा एक प्रश्न म्हणजे कौन बनेगा करोडपती च्या प्रत्येक भागात नेमका कोण करोडपती होतोय? हा त्या कार्यक्रमाच्या शीर्षकातच विचारला जाणारा प्रश्न आणि याचे चार पर्याय प्रेक्षक, स्पर्धक, जाहिरातदार आणि अमिताभ असे असतील तर कुठल्याही जीवनरेखेशिवाय याचे चटकन येणारे उत्तर म्हणजे अर्थातच अमिताभ.   त्यावेळी कुठे अधिकृत आकडा छापून आला नसला तरी अमिताभ प्रत्येक भागाचे मानधन एक कोटीच्या आसपास घेई असे कुजबुजले जाई.  ही  बाब खरी असेल तर या खेळातून प्रेक्षकांपुढे येणारा पहिला करोडपती त्यालाच मानायला हरकत नाही.

पुढे वर्तमानपत्रातून वाचले की हर्षवर्धन नवाथे नावाचा एक स्पर्धक एक कोटीचे बक्षीस जिंकणारा या स्पर्धेतला पहिला विजेता ठरला.  त्याची फारच चर्चा झाली.  (काही ठिकाणी नकारात्मक चर्चा देखील झाली पण ती इथे मांडण्याचे प्रयोजन नाही). 

कालांतराने कौबक चा दुसरा मौसम प्रेक्षकांपुढे आला.  अर्थात त्याला पहिल्याइतकी लोकप्रियता मिळाली नाही म्हणून अमिताभच्या तब्येतीचे कारण पुढे करीत तिसर्‍या मौसमात शाहरूख खान ने अमिताभची जागा घेतली.  हा मौसम तर कौबक साठी फारच अयशस्वी ठरला त्यामुळे आता चौथ्या मौसमात पुन्हा अमिताभचीच वर्णी लागली.  यावेळी वाहिनी देखील बदलली आहे (पूर्वी स्टार आणि आता सोनी) आणि लोकप्रियता देखील पूर्वीपेक्षा अभुतपूर्व प्रमाणात वाढली आहे.  आमच्या बंधुंच्या कृपेने घरात टाटा स्कायची स्थापना झाल्याने २०१० मधला हा चौथा मौसम बघण्याची संधी मला मिळाली.  हा कार्यक्रम मी प्रथमच बघत असून काही उणीवा असल्या तरी एकूणात मला हा कार्यक्रम आवडला.  दिनांक ८ व ९ नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या भागांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. 

८ नोव्हेंबर रोजी प्रशांत बतार या स्पर्धकाने एक कोटी पर्यंत मजल मारली.  त्यानंतर पाच कोटीच्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी अमिताभ, तज्ज्ञ रानडे, प्रशांतचे वडील या सर्वांनी त्याला खेळ सोडून एक कोटी घेत बाहेर पडण्याचे सूचविले परंतू तरीही आपल्या निश्चयावर ठाम राहून प्रशांतने पाच कोटीच्या प्रश्नाचे उत्तर दिले.  अर्थातच हे उत्तर चूकले आणि प्रशांतला तीन लाख वीस हजारांवर समाधान मानावे लागले.  प्रशांतने मोठी चूक केली असे अनेकांना वाटले.  काहींनी तर त्याला दोष देणारी विधाने फेसबुक, ट्विटर, बझ्झ इत्यादींवर जाहीर रीत्या केली.  परंतू मला तरी असे वाटते की प्रशांतचा निर्णय योग्यच होता.  तो एक कोटी मिळवू शकतो हे त्याने सिद्ध केलेच होते.  प्रत्यक्ष रक्कम मिळाली नाही तरी त्यामुळे त्याची योग्यता काही कमी होत नाही.  माघार न घेता आणि परिणामांची पर्वा न करता निर्णयावर ठाम राहून त्याने इतर कोणाच्या नसले तरी निदान माझ्या मनात तरी आदराचे स्थान नक्कीच मिळविले आहे.  (अर्थात दीपिका पदुकोन संदर्भात त्याने जाहीरपणे जी विधाने केली ती निश्चितच कौतुकास्पद नाहीत.  त्याबद्दल त्याला दोष दिलाच पाहिजे.)

९ नोव्हेंबरला ज्योती चौहान या पोलिस कर्मचारी असलेल्या महिलेने आपली व्यथा प्रेक्षकांसमोर मांडली.  तिची लहान मुलगी दुर्धर आजाराने ग्रासली असल्याने व तिच्यावर आधीच मोठे कर्ज असल्याने तिला साधारणत: तीन लाख रुपयांची गरज असल्याचे तिने आधीच स्पष्ट केले.  सुरूवातीलाच जीवनरेखांचा आधार घ्यावा लागल्याने ती तीन लाख वीस हजारांच्या टप्प्यावर पोचते की नाही अशी शंका निर्माण झाली.  या शंकेला निराधार ठरवित तिने हा टप्पा सहजच पार केला.  त्यानंतर साडेसहा लाख व साडेबारा लाख रुपयांची बक्षिसे असलेले प्रश्नही अचूक रीत्या सोडविले.  पंचवीस लाखाचे बक्षीस मिळवून देऊ शकणार्‍या प्रश्नाचे उत्तरही तिला येत होते, (फक्त खात्री नव्हती. तिने तसे सांगताच अमिताभने तिला नीट विचार करून बरोबर उत्तर देण्यास सूचविले.  त्यावर आपण वेळ वाया घालविणार नाही असे तिने सांगितले.  खेळाच्या या टप्प्यावर उत्तर देण्यास वेळेचे बंधन नसते याची अमिताभने तिला पुन्हा आठवण करून दिली.  त्यावर आपण उत्तरासाठी अधिक  वेळ घेतला तर त्यामुळे  Fastest Fingers First मधील इतर स्पर्धकांचा तोटा होईल असे ती म्हणाली.  इतका सारासार विचार करणारी आणि त्याप्रमाणे वागणारी ती बहुधा या खेळातील पहिली आणि एकमेव स्पर्धक असावी)   परंतू तिने कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचे नाकारले आणि खेळ सोडला.  आपल्याला ठाऊक असलेले उत्तर बरोबरच होते आणि त्यायोगे आपल्याला पंचवीस लाख मिळू शकले असते हे समजल्यावरही तिची प्रसन्न चर्या बदलली नाही.  आपल्याला मिळाले तेच खुप असून जास्तीच्या रकमेचा आपल्याला अजिबात मोह नाही हे तिने स्पष्ट केले.  मिळालेल्या रकमेतून मुलीसाठी सर्वोत्तम उपचार व कर्जफेड करूनही मोठी रक्कम शिल्लक राहील व कुटुंबासाठी तिचा निश्चितच चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल यामुळे आपण समाधानी आहोत असे तिने सांगितले.

वेगवेगळ्या परिस्थितीत अगदीच असमान निर्णय घेणारे प्रशांत बतार आणि ज्योति चौहान हे दोन्ही स्पर्धक माझ्या दृष्टीने या करोडपती बनण्याचे स्वप्न दाखविणार्‍या खेळाचे खरे मानकरी आहेत.  त्यांना माझा सलाम.

2 comments:

  1. प्रत्येक नवीन लेखाला वा विषयाला एक नवीन ब्लॉग. अशाने तुम्ही ब्लॉग करोडपती नक्की होणार...असो

    लेख चांगला झालाय..बऱ्याचजणांचे विचार तुम्ही शब्दात व्यक्त केलेत त्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  2. नाही आता असं होण्याची शक्यता कमी आहे कारण या ब्लॉगचं शीर्षक... माझ्या आधीच्या ब्लॉग्सची शीर्षकं ही त्या त्या विषयाला अनुरूप अशी होती त्यामुळे तिथे दुसर्‍या विषयाशी संबंधित लेख प्रकाशित करता येत नसत. आता या ब्लॉगला शीर्षकच असं बहाल केलंय की ते सर्वसमावेशक वाटेल आणि इथे माझे यापुढचे कुठलेही लेख प्रकाशित करता येतील.

    अर्थात पुन्हा नवीन ब्लॉग बनण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही.

    ReplyDelete

Note: only a member of this blog may post a comment.