का ल द र्श क

Wednesday 8 April 2015

समस्या आणि उपाय भाग १: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक गुंतागुंतीच्या समस्या जाणवतात.  या समस्यांचा वेध घेऊन अतिशय साध्या कल्पनांचा अवलंब करीत त्यावर शोधण्यात आलेल्या सरल उपायांची ओळख.

भाग १: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक


प्रत्येक वर्षी अ.भा.म.सा.प. द्वारा आयोजित अ.भा.म.सा.सं. अध्यक्षपदाच्या निवडणुका घेतल्या जातात.   त्याचप्रमाणे प्रत्येक (च) वर्षी काही ठराविक वादविवाद झडतात.

  1. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे बिरुद मिरविणार्‍या आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद असे नाव लावणार्‍या संस्थेमार्फत आयोजित केल्या जाणार्‍या या संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणूकीत मतदान करण्याचा अधिकार अगदी मोजक्याच (संख्येने फक्त काही शेकड्यात असणार्‍या) मतदारांना का? जेव्हा की मराठी साहित्याच्या वाचकांची संख्या किमान दोन कोटी तरी असणार.  मग अशा अत्यल्प मतदारांनी निवडलेल्या साहित्यिकास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष मानणे योग्य ठरेल का?
  2. कोणाला मतदानाचा अधिकार द्यावा आणि कोणाला नाही हा जर संस्थेचा अधिकार असेल आणि संस्था शासकीय नसल्या कारणाने संस्थेचा हा अधिकार अबाधित असेल तर शासकीय अनुदानावर ह्या संमेलनाचा खर्च करावा का?
  3. संमेलनात राजकीय व्यक्तींना बोलवून व्यासपीठावर भाषण करू द्यावे का? आणि जर राजकीय व्यक्तींना बोलविले नाही तर पुन्हा तोच प्रश्न की, शासकीय अनुदानावर ह्या संमेलनाचा खर्च करावा का?
  4. शासकीय अनुदान टाळावे तर खासगी प्रायोजकांकडून खर्चाचा भार उचलायला हवा.  तसे केले तर त्यांच्या उत्पादनाच्या जाहिरातींनी संमेलनाचे मंडप सजवायला हवे.  या प्रकारच्या आयोजनालाही अनेक जण नापसंती दर्शवितात.  गुटखा, मद्य आदींच्या जाहिराती नक्कीच आक्षेपार्ह ठरतात.

या सर्व समस्या टाळायच्या असतील खाली दिल्याप्रमाणे एक साधा उपाय अमलात आणावा

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकी करिता कुणालाही (हो.. अगदी कुणालाही) उभे राहू द्यावे.  दिलेल्या मुदतीत जितके इच्छुक आपले अर्ज सादर करतील त्या सर्वांची यादी बनवावी.  या इच्छुक उमेदवारांपैकी प्रत्येकाच्या नावाने अ.भा.म.सा.प. ने राष्ट्रीयीकृत बँकेत एक एक स्वतंत्र खाती उघडावीत.  त्यानंतर वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी व आकाशवाणी वाहिन्या आणि महाजालावरील संकेतस्थळे या सर्व प्रसारमाध्यमांद्वारे सर्वसामान्य जनतेला आवाहन करावे की, त्यांना इच्छुक उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराला संमेलनाध्यक्ष म्हणून निवडून द्यायचे आहे त्या उमेदवाराच्या नावाने अ.भा.म.सा.प. ने उघडून दिलेल्या बँक खात्यात यथाशक्ती रक्कम (केवळ धनादेश अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच) तीस दिवसांच्या आत जमा करावी. 

अशा प्रकारे ज्या उमेदवारास वाचकपसंती जास्त असेल त्याच्या खात्यात तीस दिवसांनंतर कमाल रक्कम जमा होईल आणि तोच संमेलनाध्यक्ष म्हणून घोषित केला जाईल.  तसेच त्याच्या निवडीबाबत कोणासही आक्षेप राहणार नाहीत.  त्याचप्रमाणे रक्कम केवळ धनादेश अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच जमा होत असल्याने यात काळे  धन जमा होणार नाही.  सर्व इच्छुक उमेदवारांच्या खात्यात जमा होणारी रक्कम अ.भा.म.सा.प. द्वारे एकत्रित केली जाऊन संमेलनास होणारा खर्च त्यातून परस्पर भागविता येईल. 

1 comment:

  1. http://www.aaplajansanvad.com/E-papers.aspx?FolderName=25%2f03%2f2015 (पृष्ठ क्र.३)

    ReplyDelete

Note: only a member of this blog may post a comment.