का ल द र्श क

Saturday, 15 November 2014

कुठल्याही आधाराशिवाय

१९९६ सालची हकीगत आहे.  मी कुस्रो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथे विद्युत अभियांत्रिकीच्या पदविकेचा अभ्यासक्रम शिकत होतो.    शेवटचे सत्र सुरू होते आणि आम्हाला एक विषय निवडून त्यावर सेमिनार सादर करावयाचा होता.  त्या काळी ओव्हर हेड प्रोजेक्टर वर स्लाईडस दाखविण्याची पद्धत होती.  याकरिता ट्रान्स्परंट शीट (पॉलिथिन पासून बनलेल्या) विकत घेऊन त्यावर फोटोकॉपी करून घ्याव्या लागत.  याकरिता ट्रान्स्परंट शीट चे १० रुपये आणि त्यावर फोटोकॉपी करावयाचे ३ रुपये असा  प्रति शीट १३ रुपये खर्च येत होता.  सेमिनार अहवाल  (रिपोर्ट) संगणकावर टंकलिखित करून तो मुद्रित करण्याचा खर्च देखील प्रति पान १० रुपये इतका होता.  याशिवाय नंतर ही पाने गोल्डन एंबॉसिंग सह बाईंडिंग करावयाचा खर्च १०० रुपये अथवा अधिक असायचा.  अर्थात महाविद्यालयाकडून यापैकी कुठल्याही बाबीची सक्ती नव्हतीच.  आपला सेमिनार प्रभावी व्हावा तसेच त्याचा अहवाल देखील आकर्षक दिसावा म्हणून जवळपास सर्वच विद्यार्थी स्वतःच हौसेने इतका खर्च करीत असत.  काही जण तर ओव्हर हेड प्रोजेक्टर ऐवजी नव्यानेच आलेले इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्टर भाड्याने आणत व त्यावर स्थिरचित्रे तसेच चलचित्रे देखील दाखवीत.

माझी इतका खर्च करण्याची ऐपतही नव्हती आणि पसंतीदेखील नव्हती.  मी विषय निवडला - टेलिव्हिजन.  त्याकरिता १८५ रुपयांचे गुलाटींचे पुस्तक विकत घेतले.  दूरचित्रवाणी केंद्रावरून प्रसारण कसे होते आणि आपल्या कडील संचात त्याचे ग्रहण कसे होते याचा मुळातूनच अभ्यास केला.  स्वतः समजून घेतला म्हणजे तो विषय इतरांसमोर चांगल्या पद्धतीने मांडता येतो.  त्यानंतर एकही स्लाइड न बनविता केवळ फूटपट्टी व स्केचपेन्स च्या साहाय्याने काढलेली साध्या कागदावरील तीन रंगीत रेखाचित्रे समोर ठेवून मी सेमिनार सादर केला.  इतर विद्यार्थ्यांच्या सेमिनार मध्ये ओ एच पी स्लाईडस चा प्रचंड प्रमाणात वापर होता.  शिवाय त्यांच्या कॉम्प्युटर टाईप्ड - इंक जेट प्रिंटेड - गोल्डन एंबॉस्ड बाईंडिंग केलेल्या अहवालासमोर माझा स्वतःच्या हातांनी फॅसिट टाइपराइटरवर टाईप केलेला आणि ट्रान्स्परंट क्लिप फाइलमध्ये लावलेला अहवाल देखील साधा दिसत होता.  शिवाय मी कागद देखील इतरांप्रमाणे एक्झिक्युटिव्ह बॉण्ड न वापरता साधेच कॉपी पॉवर वाले वापरले होते.  असे असूनही आमच्या परीक्षकांना माझा सेमिनार व अहवाल प्रभावी नाही तरी परिणामकारक वाटला.  ६० विद्यार्थ्यांच्या वर्गात मला त्यांनी सर्वात जास्त गुण दिले.  प्रथम क्रमांकाचे पारितोषिक म्हणून मला रुपये अडीचशे रोख मिळालेत.  अहवाल टंकलेखन आणि गुलाटींच्या पुस्तकाची किंमत असा मी केलेला सर्व खर्च (जो इतर विद्यार्थ्यांनी केलेल्या खर्चाच्या तुलनेत नगण्य होता) वसूल झाला.

हा साधेपणा माझ्यात कुठून आला? तर शालेय पाठ्यपुस्तकांतून १ली ते ७ वी च्या भाषा विषयांत साध्या कथा व लेख असत.  तरीही ते समजण्याकरिता त्या सोबत चित्रे दिलेली असत.  आठवी पासून कुमारभारती च्या पुस्तकांत आशयघन वैचारिक लेख तसेच विचारप्रवर्तक कथा असत.  परंतु त्यांच्या पुष्ट्यर्थ कुठेही चित्रे दिलेली नसत कारण अशा दर्जेदार लिखाणाला अशा कुठल्याही बाह्य आधाराची गरज नसायची, मजकूरच पुरेसा परिणामकारक असे.

हा साधेपणा कुठे हरवत चालला आहे.  कलाकृतींच्या प्रदर्शनात साधेपणा असेल तर त्या प्रभावी वाटत नाहीत असे अनेकांना वाटते.  परंतु हे समजून घ्यायला हवे की कलाकृती प्रभावी हवी की परिणामकारक?  अनेकदा एखाद्या वक्त्याचे मोठे एखाद्या विषयावर आलंकारिक भाषेत मोठे प्रभावी भाषण होते पण त्याचा परिणाम काय होतो?  लोक त्याला चांगला हशा व टाळ्यांचा प्रतिसाद देतात पण त्या भाषणातील विचार किती अमलात आणतात?  करोडो रुपये खर्चून चित्रपट बनविले जातात, पण कथेतला आशय लोकांवर किती परिणाम करतो?  विनोदी चित्रपट व उपग्रह वाहिन्यांवरच्या कॉमेडी सर्कशी पाहताना तर हे फारच जाणवते.  विनोद करताना त्यांना कसरती कराव्या लागतात तरी पुन्हा मागून नकली हसू ऐकवावे लागते.  जर विनोदी संवाद आहे तर प्रेक्षक हसतीलच ना?  त्यांना हसा असे सुचविण्यासाठी नकली हसू भरायची गरज का लागते?  तसेच टाळ्यांचे.  गिव्ह हिम / हर अ बिग हॅंड हे वाक्य तर रिअलिटी शो मध्ये अनेक वेळा ऐकू येते.  अरेच्च्या!  कौतुकास्पद करामत असेल तर आपणहूनच टाळ्या वाजतील, मागणी का करावी लागतेय?

शाळेत असताना एक विनोद वाचलेला आठवतोय - एक विद्यार्थिनी चित्र काढते आणि शिक्षिकेला तपासण्यासाठी देते.  शिक्षिका विचारतात, कसलं चित्र आहे?  विद्यार्थिनी म्हणते - हत्तीचं. शिक्षिका उत्तरता - मग तसं बाजूला लिही ना की हे हत्तीचं चित्र आहे म्हणून.  मला कसं कळणार ते कसलं चित्र आहे?  थोडक्यात काय जर तुमची कलाकृती काय आहे, कशाबद्दल आहे हे रसिकांपर्यंत पोचवायला ती असमर्थ ठरत असेल तर तिला बाहेरून अशी वेगळी लेबले लावावी लागतात.  करोडो खर्चून चित्रपट बनवायचा, वर त्यातून आम्ही काय संदेश देतोय, तो किती चांगला आहे हे सांगायला देशातल्या विविध शहरांत त्याचे प्रमोशन करत फिरायचे हे कशासाठी?  चित्रपट बघितल्यावर कळेलच ना तो कसला संदेश देतोय ते?  त्याकरिता स्पॉटबॉयपासून निर्मात्यापर्यंत झाडून सर्वांनी मुलाखती देत का सुटायचे?

सध्या झी जिंदगी वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या साध्या परंतु आशयघन मालिका पाहताना आपल्या देशी कलाकृतींमधला फोलपणा प्रकर्षाने जाणवू लागलाय.  खोट्या डामडौलाच्या प्रभावातून बाहेर येऊन अशा कुठल्याही बाह्य आधाराशिवाय आंतरिक  साधेपणातील परिणामकारकता आपल्या देशातले कलाकार (खरेतर कलेचे सादरकर्ते व्यावसायिक) कधी समजून घेणार? 

Thursday, 11 September 2014

अपवादात्मक अपवाद

भारतीय समाजाने येथील मानवांची अलिखित आणि अनौपचारिक वर्गवारी केलेली आहे.  या वर्गवारीनुसार पुरुषांनी कसं वागावं, महिलांनी कसं वागावं, याचे काही एक नियम ठरून गेले आहेत.  महिला आणि पुरुषांमध्ये असणाऱ्या शारीरिक भेदांशिवाय त्यांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतेतील फरकदेखील समाजाने ठरवून टाकला आहे.  या आखणीनुसार महिला व पुरुषांची कार्यक्षेत्रेही ठरली आहेत.  त्यानुसार ढोबळ मानाने घराच्या आतले कार्यक्षेत्र हे महिलांचे आणि घराबाहेरचे कार्यक्षेत्र ही विभागणी तर फारच जुनी आहे.  परंतु या नियमांना अपवाद म्हणून काही महिला या घराबाहेर देखील कार्यरत राहतील हे समाजाने मान्य केले आहे.  या अपवादांची देखील समाजाने पुन्हा वर्गवारी केली आहे.  त्यानुसार आर्थिकदृष्ट्या निम्नवर्गीय महिला या घरकाम अथवा लघु उद्योगातील कामगार म्हणून कार्यरत राहतील असे ठरले आहे.  प्लंबर, सुतार, लोहार (वेल्डर / फॅब्रिकेटर), रेल्वे स्थानकावरील हमाल, वाहन / मोबाईल / इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती कारागीर या खास पुरुष राखीव जागांवर चुकूनही महिला दिसणार नाहीत.  मुद्रण उद्योगात (छापखान्यात) महिला आहेत पण त्या कुठे? तर यंत्रावर पुरुषांनी मुद्रणाचे मुख्य काम केल्यावर मुद्रित कागदाच्या घड्या घालणे, पुस्तके चिटकविणे अशा कमी जोखमीच्या आणि अर्थातच कमी मोबदल्याच्या कामावर.  वर्तमानपत्र विक्रीतही घरोघरी दुचाकीवरून वर्तमानपत्रे पोचविण्याचे काम पुरुषांचे तर महिलांचे काम दुकानात एका जागी बसून विक्री करण्यापुरतेच मर्यादित.  रिक्षा, टेम्पो, ट्रक अशा व्यावसायिक वाहनांचे चालक देखील पुरुषच.  टॅक्सीचालक म्हणून आता काही प्रमाणात महिला पुढे येताहेत पण त्या देखील प्रियदर्शिनी सारख्या संस्थेच्या माध्यमातून, स्वतंत्र पणे नव्हे.  शिवाय त्यांचे प्रमाण देखील अत्यल्पच आहे.  खासगी वाहनांचे चालक या पदावरही अजूनही पुरुषांचेच साम्राज्य आहे.   

 आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय महिलांचे प्राधान्य अध्यापन, कला, सेवा क्षेत्रात राहील हे गृहीत धरले जाते.   उद्योग, अभियांत्रिकी, वैद्यकीय अर्थ, गुंतवणूक या क्षेत्रात जर महिला असल्याच तर त्यांच्यावर प्रामुख्याने कमी जबाबदारीचे अथवा दुय्यम श्रेणीचे काम राहील हे पाहिले गेले आहे. उदाहरणच घ्यायचे तर कार्यालयात पुरुष व्यवस्थापक तर महिला स्वागतिका, विमान सेवेत पुरुष वैमानिक तर महिला हवाई स्वागतिका, इस्पितळात पुरुष शल्य विशारद तर महिला परिचारिका अशा प्रकारे भूमिकांचे वाटप झाले आहे. 

उच्च आर्थिक गटातील महिलांची परिस्थिती काय आहे?  विविध उद्योगसंस्थांच्या मालक, संचालक या पदांवर महिला दिसतील.  राजकारणातही काही मोजक्या उच्च पदांवर महिला आहेत.  पण त्या तिथे का आहेत?  तर त्या एखाद्या घराण्याशी संबंधित आहेत म्हणून.  जसे की, कायनेटिक उद्योगसमूहाचे मालक श्री. अरुण फिरोदिया यांच्या कन्या सुलज्जा फिरोदिया-मोटवाणी.  पंडित नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी इत्यादी.   जर सुलज्जा व इंदिरा यांना सख्खे बंधू असते तर त्या आपल्या पित्याच्या वारसदार ठरल्या असत्या काय?  २०१४ लोकसभा निवडणूकीत मुंबईमध्ये एक अपवादात्मक चित्र दिसले.  सुनील दत्त व प्रमोद महाजन या दिवंगत राजकारण्यांच्या कन्या प्रिया व पूनम एकमेकींच्या विरोधात खासदारकीची निवडणूक लढवीत होत्या.  या घटनेत या दोघींनाही सख्खे भाऊ असतानादेखील आपापल्या पित्याचा वारसा या दोन्ही कन्यांकडे आला.  अर्थात या दोघींचे बंधू संजय दत्त व राहुल महाजन वैयक्तिक कारणांमुळे ही निवडणूक लढविण्यास असमर्थ असल्यानेच या दोघींना ही संधी मिळाली. 

अर्थात या सर्व व्यवस्थेला आव्हान देत अनेक मध्यम व उच्च मध्यम आर्थिक गटातील महिलांनी अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने मोठमोठी पदे मिळविली आहेत.  तसेच उच्च आर्थिक गटात (कॉर्पोरेट विश्व) इंद्रा नूयी, चंदा कोचर अशा महिलांनी आपले स्थान पुरुषांच्या बरोबरीच्या पातळीवर आणले आहे.  इतके असले तरीही अजून लिमिटेड कंपन्यांपैकी ५५ टक्के कंपन्यांमध्ये (किमान एकतरी महिला संचालक नेमणे कायद्याने बंधनकारक असूनही) एकही महिला संचालक नाही ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही.   शिवाय मोठ्या पदांवर असणाऱ्या व संख्येने अत्यल्प अशा महिला या त्या ठिकाणी अपवादानेच आहेत हे देखील विविध नियतकालिकांतून लेखांद्वारे सातत्याने लोकांसमोर मांडण्यात येते जेणेकरून महिलांचे अशा स्थानी असणे सहजसाध्य नाही तर अतिशय जिकिरीचे आहे हे इतर महिलामनांवर बिंबविले जावे. 

कला विश्वातले महिलांचे स्थान काय आहे?  चित्रपट, नाट्य ही क्षेत्रे समाजाचा आरसा आहेत.  त्यामुळे अर्थातच त्यांच्या कथांमध्ये महिला व पुरुष पात्रांचे प्रमाण सारखेच असणार.  त्यामुळे अभिनय व गायन क्षेत्रात महिला व पुरुष यांचे प्रमाण सारखेच असणे नैसर्गिक आहे.  (अर्थात पूर्वीच्या काळी महिलांच्या भूमिका देखील पुरुषच करीत, त्यामुळे तिथेही महिलांचे प्रमाण कमीच होते पण आता ती परिस्थिती राहिली नाही. )  गायक व गायिकांचे आणि अभिनेते व अभिनेत्रींचे संख्यात्मक प्रमाण सारखे असले तरीही त्यांच्या दर्जात्मक प्रमाणातला फरक लक्षणीय आहे.  अभिनेत्यांची कारकीर्द तुलनेने प्रदीर्घ व आव्हानात्मक आहे तर अभिनेत्रींची कारकीर्द अल्प स्वल्प तसेच अभिनयाला फारसा वाव नसणारी आहे.  त्यांच्या मानधनातला फरकही लक्षणीय आहे.  गायक व गायिकांमध्ये असा फरक दिसून येत नाही.  किंबहुना तिथे प्रकार उलटाच आहे.    १९८० साली वयाच्या अवघ्या पंचावन्नाव्या वर्षी मोहम्मद रफी आणि १९८७ साली वयाच्या अवघ्या अठ्ठावन्नाव्या वर्षी किशोर कुमारांचा मृत्यू झाला ही बाब लक्षात घेता आणि आघाडीच्या गायिका लता व आशा या तुलनेने दीर्घायुषी ठरल्या आहेत हे पाहता गायक व गायिकांची कारकीर्दीची तुलना करणे थोडे किचकट असले तरीही हे लक्षात घ्यावे लागेलच की आशा व लता या दोघींनी कुठल्याही पुरुष गायकापेक्षा अफाट संख्येने गाणी गायली आहेत.  या दोघींच्या जास्त गाण्यांमुळेही पुन्हा महिला पुरुष असमानताच सिद्ध होते आणि तीदेखील गायनक्षेत्रातली नव्हे तर अभिनय क्षेत्रातली.  लता व आशा यांना पुरुष गायकांपेक्षा जास्त गाणी मिळण्याचे कारण -
  1. चित्रपटात नायिकेलाच नाचगाण्याला जास्त वाव असतो. नायक तुलनेने महत्त्वाचे असे म्हणजे शौर्य, धाडस, पराक्रम, बौद्धिक कसोटी यात व्यग्र असतो.
  2. नायिका कुणीही असली तरीही तिला कुठलाही कॉमन आवाज चालतो.  फार तर सोज्वळ गाण्यांकरिता लता आणि कॅब्रे, इत्यादी बोल्ड गाण्यांकरिता आशा अशी विभागणी पुरेशी आहे हा चित्रपटकर्त्यांचा दृष्टिकोन.  याउलट नायक कोण आहे? त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा बाज काय आहे? हे नीट विचारात घेऊन त्यानुसार त्याकरिता गायकाचे नियोजन.  जसे की देव आनंद व राजेश खन्ना करिता किशोर कुमार, दिलीपकुमार व शम्मी कपूर करिता मोहम्मद रफी,  राज कपूर व मनोज कुमार करिता मुकेश ही विभागणी पुरुष गायकांना कमी काम मिळवून देणारी असली तरीही पुरुष अभिनेत्यांचे महत्त्व वाढविणारीच ठरते नाही काय?
याशिवाय कला प्रांतातील महिलांच्या बाबतीत असणारे विविध प्रवाद.  त्या स्वतःच्या क्षमतेवर किती आणि पुरुषांचा शिडी सारखा वापर करून किती वरपर्यंत चढल्यात याबाबत चर्चिले जाणारे किस्से.  या व्यवस्थेलाही तोंड देत एखादी महिला अगदी उघडपणे व निःसंशय स्वतःच्या मेहनतीच्याच जोरावर यशशिखरावर विराजमान झाली असेल आणि उणीव दाखवावी असे तिच्यात शोधूनही सापडण्यासारखे दूरान्वयानेही काही नसेल तर तिला लगेच  वेगळ्याच कोंदणात बसविले जाते.  मग ती सर्वांचीच ताई, माई, अक्का असल्याचा तिच्यावर शिक्का बसतो.  ती कोणाची प्रेयसी, कोणाची मैत्रीण देखील होऊ शकत नाही.  एका वेगळ्याच गंभीर नजरेने तिच्याकडे पाहिले जाते.  याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लता मंगेशकर.  त्यांच्या पिढीतील, पुढच्या आणि त्याही पुढच्या पिढीतील सर्वच जण त्यांचा दीदी म्हणूनच उल्लेख करतात.  त्यामुळेच जेव्हा त्यांच्या एका वाढदिवसाच्या जाहीर समारंभात सोनू निगमने "मी थोडा आधी जन्माला आलो असतो किंवा लताजी थोड्या उशीराने जन्माला आल्या असत्या तर मी त्यांना विवाहाकरिता मागणी घातली असती." असे विधान केले तेव्हा ते अनेकांना खटकले.  सोनू निगमांवर टीकाही झाली.  खरे पाहता सोनूने लताजींकडे पाहण्याच्या समाजाच्या चाकोरीबद्ध नजरेची कोंडी फोडली असेच म्हणावे लागेल.  परंतु आपल्या समाजाने अपवादांचीही वर्गवारी केली असल्याने सोनूचे विधान समाजाच्या पचनी पडले नाहीच.  

अपवादांची वर्गवारी करण्याची समाजाची सवय तशी फारच जुनी.  महिला शक्यतो घरातच राहणार.  घराबाहेर पडल्या तरीही त्यांच्यावर तसा प्रसंग आला तरच.  म्हणजे झाशीची राणी ही शूर लढवय्यी असे आपण म्हणतो पण ती तशी का? तर तिचे पती गंगाधरपंत (जे तिच्याहून चाळीस एक वर्षांनी मोठे) यांच्या मृत्यूनंतर तिला अकाली वैधव्य आल्यावर राज्याचे रक्षण करण्याकरिता.  कारण तिचा पुनर्विवाह होऊन तिच्या नव्या पतीला राज्याचा रक्षणकर्ता बनण्याची संधी देणंही परंपरेला मंजूर नाहीच.  त्यापेक्षा अपवाद म्हणून तिलाच रणरागिणी बनविणं समाजाला जास्त सोयीस्कर आणि म्हणूनच राणीला श्रेयस्कर.  पण या श्रेयाची धनीण होताना राणीला वयाच्या बाविशीतच मृत्यूला सामोरं जावं लागून फार मोठी किंमत चुकवावी लागली हे कोणी ध्यानात घेत नाही.  [काव्यात्म न्याय / योगायोग म्हणजे उपग्रह वाहिनीवरील मालिकेत झाशीच्या राणीची भूमिका करून लोकप्रिय झालेल्या कृत्तिका सेनगर हिनेच पुढे पुनर्विवाह या मालिकेत महिलेच्या पुनर्विवाहाचा मुद्दाही ऐरणीवर आणण्यात मुख्य भूमिका निभावली.]  असो. तर झाशीच्या राणीचे शौर्य हे अपवादच होते असे समजणाऱ्या समाजाच्या मानसिकतेचे पुरावे म्हणजे झाशीच्या राणीच्या इतिहासोत्तर काळात जन्माला आलेल्या मुलींनाही घोडसवारीचे प्रशिक्षण दिले जात नसे.  अगदी त्यापुढील काळातही किती जणी सायकली अथवा स्वयंचलित दुचाकी चालवीत असत?  सुनीताबाई देशपांडे चारचाकी मोटार चालवीत आणि भाई चालकाच्या बाजूला बसत.  एकदा सुनीताबाई रस्त्याने अशाच गाडी चालवीत असताना दोन मुले रस्त्यात दिसली.  त्यातल्या एकाने दुसऱ्याला सांगितले - अरे बाई गाडी चालवतीये, बाजूला हो नाहीतर अपघातात सापडशील.  त्यावर दुसरा पहिल्याला म्हणाला - काळजी करू नकोस शेजारी बाप्या बसलाय ना. तोच काळजी घेईल अपघात होणार नाही याची.  आयुष्यात कधीही वाहनाचे सुकाणूचक्र न धरलेल्या भाईच्या केवळ शेजारी असल्यामुळे रस्त्यावरील मुलांना हायसे वाटावे आणि त्यापुढे सुनीताबाईंच्या वाहन चालविण्याच्या अफाट कौशल्याचा काडीचाही प्रभाव पडू नये याचे सुनीताबाईंना मोठे वैषम्य वाटले.  पण सामाजिक वर्गवारीने पुरुष व महिलांची कार्यक्षेत्रे ठरविली त्याला सुनीताबाई किंवा रस्त्यावरची ती मुले तरी काय करणार? 

पुढे महिला दुचाकी वाहने चालवू लागल्या तरी कोणती? तर स्कूटर किंवा मोपेड यांसारखी.  एखादी महिला मोटरबाईकसारखे वाहन चालविते असे सत्तर ऐंशीच्या दशकांतील चित्रपटांतून दाखवायला सुरुवात झाली.  अशी वाहने चालविणारी महिला पुरुषांसारखे पँट शर्ट असा पोशाख, पुरुषांप्रमाणेच अगदी लहान कापलेले केस अशी टॉमबॉय स्वरूपात दाखविली जाऊ लागली.  म्हणजे तिला काही वेगळे करायचे तर तिला महिलांच्या नेहमीच्या गटातून बाहेर काढून तिचे छंद हे अपवादात्मक आहेत असे दाखवूनच.     ही झाली समाजाच्या अपवादांचीही वर्गवारी करावयाच्या मानसिकतेची पद्धत.  म्हणजे महिला अमुक एक वाहन प्रकार चालविणार नाहीत आणि समजा एखादीने चालविलेच तर ती लगेच टॉमबॉय कॅटेगरीतली.  

पुरुषांप्रमाणे वाहन प्रमाणे वाहन चालविले, किंवा तसे कपडे घातले, किंवा तसे केस ठेवले तर ती महिला पुरुषी वृत्तीची ठरते काय?  तिच्यातील स्त्री-सुलभ भावना लोप पावतात काय?  अजिबात नाही.  आणि हे समाजाला दाखवून दिले पुरुषांसारखे कपडे घालणाऱ्या, बारीक केस ठेवणाऱ्या आणि बरीचशी त्यागराज खाडिलकरांसारखी चेहरेपट्टी असणाऱ्या गायिका फाल्गुनी पाठकने.  तिची सर्व गाणी पाहा आणि ऐका.  प्रत्येक गाण्याचे बोल आणि सादरीकरण स्त्री-सुलभ भावनांचे यथार्थ प्रदर्शन मांडणारे आहे हे लगेच जाणवेल.   आता तर अनेक महिला टिपीकल महिला वेषात आणि केशभूषेत राहून देखील खास पुरुषांची समजली जाणारी बुलेट सारखी वाहने देखील चालवीत आहेत.  महिलांकडून आता अपवादांच्या वर्गवारीलाही आव्हान दिले जाण्यास सुरुवात झाली आहे. 

मनोरंजन क्षेत्रात गायन, अभिनय अशा विभागांमध्ये महिलांची आवश्यकता असल्याने महिलांना स्थान आहे पण लेखन / दिग्दर्शन /संगीत दिग्दर्शन या विभागांत महिलांचा सहभाग अत्यल्प आहे.  अपवाद म्हणून काही महिला या क्षेत्रात आहेत.  त्यातही दिग्दर्शन हा प्रांत अतिशय विद्वत्तेचा समजला जातो त्यामुळे या प्रांतातील महिला अपवादाच्या वर्गवारीप्रमाणे अतिशय अभ्यासू, विद्वान आणि महत्त्वाचे म्हणजे धीरगंभीर स्वभावाच्या हे ठरून गेल्यासारखे आहे.  सई परांजपें ह्या अपवादाच्या परंपरेतला एक अपवादात्मक अपवाद.  त्यांनी गंभीर चित्रपटांबरोबरच निखळ विनोदी चित्रपट देखील बनविले.  परंतु मीरा नायर, कल्पना लाजमी, तनुजा चंद्रा या धीरगंभीर दिग्दर्शिकांनी पुन्हा अपवादाची वर्गवारीच सिद्ध केली. 

अशा वेळी मनोरंजन विश्वाच्या क्षितिजावर उदय झाला फराह खानचा.  ह्या दिग्दर्शिकेने पहिल्याच प्रयत्नात (मै हूं ना - २००४) प्रेक्षकांना अगदी खळखळून हसायला भाग पाडलं.   विनोदासोबतच चित्रपटात देशभक्ती, प्रेम, शौर्य हे सर्व रस मिसळून एक चांगला मसालापट बनविला, त्याला उत्तम व्यावसायिक यश देखील मिळालं आणि समीक्षकांची प्रशंसाही.  मुख्य म्हणजे शाहरुख सारख्या मनस्वी कलाकाराला लीलया हाताळलं.  महिला अष्टपैलू नसतात किंवा अनेक आघाड्यांवर त्या एकाच वेळी कार्यरत राहू शकत नाहीत या पारंपरिक समजालाही तिने छेद दिला.  मूळची ती तशी दिग्दर्शिका नव्हेच. पहिल्या दिग्दर्शकीय प्रयत्नापूर्वी तिने जलवा, सात साल बाद (१९८७), कुछ कुछ होता है (१९९८) आणि कल हो ना हो (२००३) या चित्रपटांमधून किरकोळ भूमिका केल्या होत्या.    त्याशिवाय १९९२ च्या जो जीता वही सिकंदर पासून २००३ च्या चलते चलते पर्यंत तिने अनेक चित्रपटांत नृत्यदिग्दर्शिका म्हणूनही काम केले.  २००४ साली दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केल्यावरही तिने आपले हे जुने काम सोडले नाहीच.  अजूनही ती पाहुणी अभिनेत्री आणि नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम करतेच.  शिवाय पटकथा लेखन आणि निर्मिती ह्या जबाबदाऱ्याही तिने पार पाडल्या आहेत.  इतकेच नव्हे तर शिरीन फरहाद की तो निकल पडी या चित्रपटाद्वारे तिने पूर्ण लांबीची नायिकेची भूमिकाही निभावली आहे.  तेही वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी आणि पारंपरिक नायिकेला शोभेल अशी शरीरयष्टी नसतानाही. 

त्याशिवाय आपल्या दिग्दर्शकीय आणि नृत्यदिग्दर्शकीय कौशल्यातून इतर कोणालाही न जमलेली गोष्ट सर्वात आधी साध्य करून दाखविली.  कत्रिना कैफने पदार्पणातच (बूम - २००३) बिकिनी दृश्य दिले.  इतर अनेक चित्रपटांतूनही तिने देहप्रदर्शनाचा अजिबात संकोच केला नाही.  परंतु इतके करूनही ती कधी 'मादक' किंवा 'चालू' दिसू शकली नाही.  याचे कारण तिच्या चेहऱ्यावर असलेले कायमचे निरागस भाव.  अगदी अक्षय कुमार सोबतच्या नमस्ते लंडनमध्ये तिच्या संवादांमुळे ती भांडकुदळ किंवा उर्मट वाटली असली तरीही तिला 'चालू' दाखविणे कुठल्याच दिग्दर्शकाला जमले नव्हते.  परंतु ही बाब जणू एक आव्हानच आहे असे समजून फराह खानने तिला तीस मार खान चित्रपटात शीला की जवानी या गाण्यातून 'मादक' किंवा 'चालू' रूपात प्रेक्षकांसमोर सादर केले.  या गीतात कत्रिनाच्या चेहऱ्यावरचे नेहमीचे निरागस भाव पार पुसले गेलेले आढळतात.  आता हे फराहने योग्य केले की अयोग्य हा वादाचा मुद्दा असला तरीही इतर कुणालाही साध्य न होऊ शकलेली गोष्ट तिने सहज करून दाखविली हे मान्य करावेच लागते.      

इतक्या आघाड्या सांभाळणारी ही बुद्धिमान महिला अपवादात्मक असली तरी इतर अपवादात्मक महिलांप्रमाणे हिचे व्यक्तिमत्त्व विद्वत्तेच्या ओझ्याखाली धीरगंभीर बनले आहे असे मात्र अजिबात नाही.  अतिशय हसतमुख व विनोदी व्यक्तिमत्त्वाची ही महिला डान्स इंडिया डान्स, जो जीता वही सुपरस्टार, एंटरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा या व अशा इतर कार्यक्रमांतून प्रेक्षकांसमोर येते, स्पर्धकांशी दिलखुलास संवाद (तेही अगदी थेट बंबईय्या हिंदीतून) साधते तेव्हा कुणी सेलिब्रेटी न वाटता आपल्यातीलच एक सामान्य व्यक्ती वाटते.  

व्यक्तिगत आयुष्यात देखील या महिलेने अनेक परंपरांना छेद दिला आहे.  सहसा महिला आपला वैवाहिक जोडीदार शोधताना वय व शारीरिक क्षमता यांत आपल्यापेक्षा वरचढ पुरुषास पसंती देतात.  तसेच मुस्लिम महिला सहसा गैर मुस्लिम पुरुषांना पसंती देत नाहीत.  परंतु इथेही सर्व परंपरांना छेद देत फराहने आपल्यापेक्षा तब्बल साडेआठ वर्षांनी लहान असलेल्या शिरीष कुंदेर सोबत विवाह केला.  चाळिशीनंतर महिलांचा मातृत्व टाळण्याकडे महिलांचा कल असतो.  इथेही पुन्हा अपवाद करीत फराहने वयाच्या त्रेचाळिसाव्या वर्षी ही संधी घेतली आणि निसर्गानेही तिला अपवादांची मालिका प्रवाहित ठेवण्यास साहाय्य करीत एक पुत्र (झार) व दोन कन्या (दिवा आणि अन्या) या तिळ्यांची आई बनविले.  

फराहचे विशेष कौतुक करावेसे वाटते ते तिच्या द्रष्टेपणा बाबत.  द्रष्टेपण म्हणजे भविष्याचा वेध घेण्याची कला.  हे भल्याभल्यांना जमत नाही.  पुरुषांत देखील हा गुण अपवादानेच आढळतो तिथे स्त्रियांची काय कथा?  मनोरंजन क्षेत्रात पूर्वी एखाद्या बड्या असामीने एखादा चित्रपट बनविला आणि  तो प्रेक्षकांनी स्वीकारला नाही की लगेच आम्ही काळाच्या पुढचा चित्रपट बनविला असे म्हटले जायचे.  देव आनंद यांचा तर हा अतिशय प्रसिद्ध युक्तिवाद होता.  अर्थात त्यांचे मै सोलह बरस की, सेन्सॉर आणि मिस्टर प्राईम मिनिस्टर हे चित्रपट पाहताना हा युक्तिवाद माफक प्रमाणात पटतो देखील.  परंतु यश चोप्रांनी जेव्हा त्यांचा लम्हे हा चित्रपट अपयशी ठरला आणि तो काळाच्या पुढचा असल्याचा दावा केला तेव्हा त्यात काही तथ्य नव्हते कारण याच कथेवर पूर्वी गुलजार यांनी मौसम हा एक यशस्वी चित्रपट बनवून दाखविला होता.  असो.  तर असे हे द्रष्टेपण समाजात अभावानेच आढळणारे.  फराह खान मध्ये ही भविष्याचा वेध घेणारी कला दिसून आली ती २००९ मध्ये जेव्हा तिने तेरे मेरे बीच में नावाचा एक सेलिब्रिटी रिअलिटी शो स्टार प्लस या उपग्रह वाहिनीवर सादर केला.  तेरा भागांच्या कार्यक्रमाला फारसा प्रतिसाद लाभला नाही कारण तेव्हा ही संकल्पना नवीन होती.   आता मात्र अशी संकल्पना रुळली आहे.  अनुपम खेर देखील असा एक कार्यक्रम आता सादर करतात आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय.  तर फराह च्या कार्यक्रमात तिने दुसऱ्याच भागात मुष्टीयोद्धा विजेंद्र सिंग आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांना निमंत्रित केले होते.  त्यात तिने विजेंद्रला अभिनय करण्याविषयी सुचविले होते आणि त्याच्याकडून लहानसा प्रसंग सादरही करून घेतला होता.  त्याचप्रमाणे प्रियांकालाही तिने लुटुपुटूचे बॉक्सिंग करायला लावले होते.  गंमत म्हणजे विजेंद्र सिंग फग्ली या चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून प्रेक्षकांपुढे आलाय आणि प्रियंकानेही मेरी कोम वरील चित्रपटात प्रशंसनीय बॉक्सिंग केली आहे.   ह्या भविष्याचा पाच वर्षांपूर्वीच वेध घेणाऱ्या ह्या महिलेला द्रष्टेपण नाही असे म्हणावे तरी कसे?  विकिपीडियावरील माहितीनुसार फराह खानचा जन्म ९ जानेवारी १९६५ चा म्हणजे चित्रपटसृष्टीतील तीनही दिग्गज खानांपेक्षा ती वयाने जराशी मोठीच.  तिच्यापेक्षा कमी वय असलेल्या पद्मिनी कोल्हापुरे आणि रेणुका शहाणे या आणि अशा इतर अनेकींची कारकीर्द आता जवळपास संपुष्टात आलेली असताना पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही महिला मनोरंजन क्षेत्रात अनेक आघाड्यांवर एकाच वेळी यशस्वीपणे कार्यरत राहू पाहत आहे.  दिवाळीत तिचा अजून एक भव्य प्रकल्प हॅपी न्यू इयर प्रेक्षकांसमोर सादर होत आहे.  या निमित्ताने तिच्या भावी वाटचालीकरिता शुभेच्छा देऊन ह्या लेखाची सांगता करतो.

Saturday, 19 April 2014

मी मतदान का करावे?

लेख पाच वर्षांपूर्वीचा असला तरीही विषय आज देखील तितकाच ताजा आणि परिस्थिती अनुरुप असल्याने पुनर्प्रकाशित करीत आहे.  
*************************
१३ ऑक्टोबर २००९ रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणूकीत विविध समाजसेवी संस्था, पक्ष संघटना, मान्यवरांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अनेकांनी तर मतदान न करणाऱ्यांची तीव्र शब्दांत निर्भत्सनाच केली आहे. मतदान का करावे या विषयी अनेक मुद्दे मांडण्यात आले. परंतू मतदान न करणारे ते का करत नाहीत या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्नच झाला नाही असे खेदाने म्हणावे लागेल. मतदानाचा हक्क मिळाल्यापासून मीही कधीच मतदान केले नाही व यावेळीह्ी करणार नाहीय. प्रत्येक वेळी माझ्या मतदान न करण्याला संयूक्तिक कारणे होती. परंतू यावेळी मतदान न करणाऱ्यांवर प्रचंड प्रमाणात टीका होतेय ते पाहून मी मतदान न करणाऱ्यांपैकीच एक असल्यामूळे मला मतदान न करण्याची कारणे नमूद करावीशी वाटतात. यातील काही कारणे सार्वकालिक आहेत तर काही तात्कालिक.
नेहमीप्रमाणेच यावेळीही प्रचारात अनेक नेत्यांनीै सवंग पणाची पातळी ओलांडली. जे नेते नेहमीच असे बोलतात त्यांची उदाहरणे मी पुन्हा देणार नाहीय पण ज्यांच्याकडून आधिक समंजसपणाची अपेक्षा होती त्या माननीय पंतप्रधान श्री. मनमोहन सिंगांनीही असे बेजबाबदार वक्तव्य करावे म्हणजे कळस झाला. सतरा पोलीसांचे बळी घेणाऱ्या नक्षलवाद्यांवर लष्करी कारवाई करणार नाही. विकासाची गंगा त्यांच्या दारी न पोचल्याने ते परिस्थितीमुळे नक्षलवादी झाले आहेत. असे वक्तव्य करून पंतप्रधानांना काय सूचित करायचे आहे? ज्यांच्यावर अन्याय झालाय अशा साऱ्यांनीच शस्त्रे हाती घ्यावी म्हणजे सरकार त्यांच्यावर कारवाई न करता चर्चेला तयार होइल. शिवाय नक्षलवाद्यांशी एकांडया शिलेदाराप्रमाणे लढणाऱ्या पोलिसांच्या मनोधैर्याचे काय? पुढे जाऊन पंतप्रधान असेही म्हणाले की जर राज्यात पुन्हा कँाग्रेसचे सरकार आले तर केन्द्राकडून भरघोस मदत दिली जाईल. (वाचा लोकसत्ता दिनांक १२ ऑक्टोबर २००९ च्या अंकातील मुखपृष्ठावरील बातमी) म्हणजे मतदारांनी दुसऱ्या पक्षाला मत देऊन निवडून आणले तर केन्द्र सरकार महाराष्ट्राची कोंडी करणार काय? आचारसंहिता किंवा कायद्याचा मुद्दा बाजूला ठेवला तरी हे राज्यातील जनतेचे ब्लॅकमेलिंग करणारे विधान नैतिकतेच्या कसोटीवर तरी टिकणारे आहे काय?
मतदान करणारे मोठया आभिमानाने आपण नुसते मतदान केले म्हणजे फार मोठे नैतिक कर्तव्य केल्याचा आव आणतात. पण मतदान कोणाला आणि का करावे हे पटल्याशिवाय केलेल्या मतदानाला काय अर्थ आहे? या दृष्टीने उमेदवारांची पार्श्वभूमी, पक्षांची भूमिका या बाबी मतदान करणाऱ्यांपैकी किती जण तपासून पाहतात? मी या गोष्टींचा अभ्यास केला आहे. त्यात प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त वेळ खर्ची घातला आहे आणि मगच मतदान न करण्याची माझी भूमिका मी निश्चित केली आहे. ‘मी मराठी’ वाहिनीवर परवाच पाहिलेल्या एका चर्चेमुळे तर ही भूमिका आधिकच पक्की झाली. या चर्चेत रिडालोस चे अबू आझमी, कँाग्रेस तर्फे विजय कलंत्री, मनसे च्या वतीने शालिनी ठाकरे, शिवसेने कडून दिवाकर रावते तर भाजपाचे विनोद तावडे यांनी भाग घेतला होता. अबू आझमी यांना मराठी अजिबात समजत नव्हते त्यामूळे त्यांच्याकरिता प्रश्नोत्तरांचा पुन्हा हिंदीत अनुवाद होत होता. विजय कलंत्रींना मराठी कळत होते पण बोलताना धाप लागत होती त्यामूळे ते दोन वाक्यं मराठी तर चार वाक्य हिन्दी बोलत होते. त्यांना मनसे असेही नीट म्हणता येत नव्हते ते सारखे मनसा असा उच्चार करीत होते. ठाकरे आडनाव लावणाऱ्या मनसेच्या शालिनी यांचे मराठी बोलणे आश्चर्यकारकरीत्या अतिशय वाईट होते. त्यांचा गृहपाठही व्यवस्थित झालेला नव्हता. त्या शक्य तितके कमीच बोलत राहून आपल्या अज्ञानावर पांघरूण घालत होत्या. शेवटी एका श्रोत्याच्या प्रश्नाने हे पांघरूण दूर झालेच. त्याने विचारले की मनसे उत्तर भारतीय व बिहारींना मुंबईतून हाकलायच्या गोष्टी करते मग बांग्लादेशीय घुसखोरांविषयी मनसेची भूमिका काय? यावर शालिनी ठाकरेंनी उत्तर भारतीय, बिहारी व बांग्लादेशीय घुसखोर या सगळयांविषयी पक्षाची सारखीच भूमिका असल्याचे सांगितले. या त्यांच्या उत्तरामूळे त्या फारच अडचणीत आल्या कारण अबू आझमींनी त्यांना विचारले की देशाचे नागरिक असणारे उत्तर भारतीय, बिहारी व घुसखोरी करणारे परकीय बांग्लादेशीय यांना एकाच तराजूत तोलणे योग्य आहे काय? पुढे ते शालिनी ठाकरेंना म्हणाले,”मॅडम आपको तो ऐसा कहते हुए शर्म आनी चाहिए क्योंकि आपका तो परिवार उत्तर भारत से आकर यहां बसा हुआ है।”. यावर शालिनी ठाकरेंनी मौनच बाळगले. दिवाकर रावते व विनोद तावडेंचे मराठी वर चांगले प्रभुत्व दिसून आले त्याचप्रमाणे त्यांचा अभ्यासही चांगला होता. पण त्यांची आक्रमकता टोकाची होती. त्यांनी चर्चेचे सूत्रसंचालन करणाऱ्या राजू परूळेकरांनाच दलाल म्हणून संबोधले. विनोद तावडेंचे हातवारे करणे इतके अंगावर येत होते की एकदा तर रावतेंनीच त्यांचा हात झटकून बाजूला केला.

याशिवाय मी प्रमुख नेत्यांच्या मुलाखती वृत्तपत्रांत वाचल्या तसेच दूरचित्रवाणीवरही पाहिल्या. राज ठाकरे, उध्दव ठाकरे, अजित पवार या तिघांचा अभ्यास चांगला आहे आणि संभाषणकौशल्यही वादातीत आहे. अजित पवार तर मुलाखतीत म्हणाले की आपण स्वतःचा मतदारसंघ असणाऱ्या बारामतीत आता शेवटचे दोन दिवस प्रचार करणार आहोत. आपण निवडून येणार की नाही ते सांगू शकत नाही. मतदारांना गृहीत न धरण्याची ही आदर्श विनम्रता माझ्या मनाला फारच भावली. ते माझ्या मतदारसंघात उभे असते तर मी निश्चितच त्यांना मतदान केले असते पण त्यांच्या आघाडीने आमच्या मतदारसंघात दिलेले उमेदवार सरळसरळ आपण अमूक इतक्या मताधिक्याने निवडून येऊ असे सांगतात तेव्हा त्यांना मत देण्याची इच्छाच होत नाही. तीच गोष्ट राज व उध्दव ठाकरे यांची. यांनी दिलेल्या उमेदवारांना शुध्द मराठी सुध्दा बोलता येत नाही मग सामाजिक जाणिवांचा अभ्यास ही फारच दूरची गोष्ट. फक्त नेत्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणामुळे त्यांच्या मठ्ठ उमेदवारांना मत कसे काय द्यायचे? रिडालोसची याच्या अगदी उलट परिस्थिती. त्यांचे स्थानिक उमेदवार चांगले अभ्यासू, लोकांच्या समस्यांची जाण असणारे व उच्चशिक्षीतही आहेत. तरीही,त्यांना मत देण्याचा विचार फारच जाणीवपूर्वक बाजूला सारावा लागतो कारण त्यांना मत देणे म्हणजे पुढे सत्तेचे कोलीत आयतेच रामदास आठवले व अबू आझमी अशा असमंजस व आक्रस्ताळया नेत्यांच्या हाती देणे.

याशिवाय अनेक लहान पक्षांचे तसेच काही अपक्ष उमेदवार आहेत ज्यांच्याविषयी मला काहीच ठाऊक नाही. काही नावे तर चक्क मतदानकेन्द्रात गेल्यावरच कळतील कारण हे आमच्याकडे प्रचारालाही फिरकले नाहीत. यांनी यापुर्वी काही समाजकार्य केले असल्यास त्याचा तपशील कळणे ही तर फारच दूरची गोष्ट. तसेही विधानसभेच्या मतदारसंघाचा पसारा फारच मोठा असल्याने उमेदवाराला मतदार व्यक्तिगत पातळीवर ओळखत असण्याची शक्यता फारच कमी असते. महापालिकेच्या निवडणूकीत ही शक्यता तूलनेने जास्त असते. तरीही मी महापालिकेच्या निवडणूकीलाही मतदान केले नाही कारण मी आमच्याच नव्हे तर शेजारच्या मतदारसंघातील उमेदवारालाही चांगलाच ओळखून होतो. आमच्या मतदारसंघात पात्र उमेदवार तेव्हा फक्त राष्ट्रवादी पक्षाने दिला होता व ते म्हणजे आमच्या पिंपरी चिंचवडचे माजी महापौर माननीय श्री. आर. एस. कुमार. अतिशय सुविद्य व सुशील व्यक्ति. नागरीकांची कामे करण्यात तत्पर आणि अतिशय विनम्र.

परंतू त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षाने शेजारच्या मतदारसंघात जावेद शेख या कूख्यात गुंडाला उमेदवारी दिली. या शेख महाशयांनी सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांना बंदुकीच्या धाकावर उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले व स्वतः बिनविरोध निवडून आले. दुसऱ्या एका मतदारसंघात राष्ट्रवाद्यांनी भाजप कार्यकर्त्याचा हातच कापून टाकला. अशा पक्षाला (त्यांचा आमच्या मतदारसंघातील उमेदवार चांगला असूनही) मतदान करून त्यांचे बळ वाढविण्यापेक्षा मी मतदान न करणेच पसंत केले.

याशिवाय मतदानाबाबत गोंधळ निर्माण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे उमेदवारांची बंडखोरी. कँाग्रेस हा धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गाणारा पारंपारिक पक्ष, तर हे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करतात असे म्हणत प्रखर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारा शिवसेना हा पक्ष. गंभीर बाब म्हणजे शिवसेनेने तिकीट नाकारले म्हणून उमेदवार थेट कँाग्रेसमध्ये प्रवेश करतो आणि तिकीट मिळवून निवडणूक लढतो ही थट्‌टा मतदारांची की लोकशाहीची? म्हणजे एकदम १८० अंशातच हा उमेदवार फिरला. याची धोरणे इतकी लवचिक कशी? की याला सत्तेशिवाय कधी काही धोरण नव्हतेच?

यापुढची महत्वाची बाब म्हणजे उमेदवारांच्या पात्रतेत फारसा फरक नसणे. दुकानदाराने काळया रंगाचा शर्ट आपल्याला दाखवला आणि आता समजा आपल्याला काळा रंग आवडतच नाही म्हणुन आपण त्याला दुसरा शर्ट दाखवायला सांगितले. हा दुसरा शर्टही काळाच फक्त त्यावर मधुन मधुन अगदी थोडे पांढरे ठिपके आहात. हाही आपल्याला आवडला नाही कारण आपला आवडता रंग पांढरा आहे आणि कहर म्हणजे दुकानदाराकडील साऱ्या शर्टांना काळया रंगाच्याच छटा आहेत अशा वेळी आपल्याला निवड करण्यात काही स्वारस्य राहील का? शेवटी दुकानदाराला आपण त्याच्याच आवडीचा कुठलाही एक शर्ट बांधून द्यायला सांगू. नेमके हेच कारण लोकांचा मतदानातला रस संपायला कारणीभूत आहे. कोणीही सत्तेवर आला तरी स्वतःच्या तुंबडया भरणारच याची उमेदवारांपेक्षाही जनतेलाच जास्त खात्री आहे. कोण किती रकमेचा अपहार करणार या आकडयांमध्ये काळया रंगाच्या विविध छटांमध्ये असणाऱ्या सुक्ष्म फरकापेक्षाही कमी फरक आहे. अर्थात एखाद्या मतदारसंघात जावेद शेखसारखा गुंड आणि त्याच्या विरोधात एखादा निःस्पृह समाजसेवक उभा असेल तर कदाचित तेथील १०० टक्के मतदारही मतदान करतील. परंतू असे गुंड बहुतांश वेळा बिनविरोध अथवा मतदान केंद्र ताब्यात घेऊन देखील निवडून येतात हेही जनतेच्या आता पचनी पडले आहे.

तसेच निवडून येणारे लोकप्रतिनिधी खरौखरच प्रभावीपणे काही करू शकतात की नोकरशाही पुढे झुकतात हाही एक संशोधनाचाच विषय आहे. सरकार पाच वर्षे अथवा त्याहून कमी काळ टिकते नोकरशाही चिवट असून सहजी बदलत नाही. कित्येक आधिकारी तर मुख्यमंत्र्यांनाही जुमानत नाहीत. त्यामूळे कुठल्याही पक्षाचे सरकार आले तरी जनतेला फारसा फरक पडत नाही.

निवडून दिलेल्या प्रतिनिधीने आपली कितीही निराशा केली तरी आपण त्याला पुढच्या निवडणूकीपर्यंत बदलु शकत नाही ही लोकशाहीची अजून एक मोठी शोकांतिका. साधे घरातल्या नोकराचे काम पसंत पडले नाही तर त्याला आपण एक महिन्याची आगाऊ सूचना अथवा पगार देऊन नोकरीवरून काढू शकतो पण शासनात इतकी मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी नेमलेला उमेदवार समाधानकारक काम करत नसला तरी सहन करावा लागतो.

ह्ी आणि अशी अजूनही अनेक कारणे आहेत ज्यामूळे मी मतदान का करावे असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला पडतो. बुध्दिवादी माणसांना असे प्रश्न पडत नाहीत. ते म्हणतात ‘त्यातल्या त्यात’ बऱ्या उमेदवाराला मत द्या. आता जर वर्गात सारे पस्तीस टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे असतील तर ‘त्यातल्या त्यात’ कुणाला उत्तीर्ण करणार? सैन्यातील कठोर पात्रता पुर्ण करणारे फारच कमी उमेदवार मिळतात त्यामूळेच सैन्यात अनेक जागा रिक्त आहेत, पण म्हणून पात्रतेचे निकष शिथील करून कुणाही ‘त्यातल्या त्यात’ बऱ्याला सैन्यात भरती करीत नाहीत. तेव्हा शेवटी मी इतकेच म्हणेन,
‘मेरे ख्वाबोमें जो नेता है, वो सचमुच हो नही सकता।
किसी औरको मै नेता चुन लु..................... ये हो नही सकता।।

टीप : काही अक्षरांचे रुपांतर व्यवस्थित न होऊ शकल्याने मजकुरात काही किरकोळ दोष आहेत. तरी मूळ मजकूराकरिता गुगल पानांचा दुवा येथे देत आहे.
त्यानंतर या लेखाला प्रतिसाद म्हणून माझा मित्र श्री. मंदार मोडक याचे आलेले उत्तर त्याच्याच शब्दांत -
माझा मित्र मंदार याची माझ्या लेखावरील प्रतिक्रिया:-
date21 October 2009 13:23
subjectमी मतदान का केले?

प्रित मित्र
चेतन यास,

तुझा `मी मतदान का करावे?' हा चिंतनशील लेख वाचला. खूप चांगला लेख आहे. आपल्या सर्वांची
हीच समस्या आहे. आपण लोकशाही स्वीकारली आहे. राजेशाही नाही म्हणून लोकशाही आहे असे
म्हणायचे दुसरे काय? लोकशाही मध्ये उमेदवार उभे राहणार , त्यापैकी वैयक्तिक पातळीवर बरावाईट कोण
तो ठरवून किंवा चांगला पक्ष बघून मतदान करणे भाग आहे.

पण चेतन तू नकाराधिकार तर नक्कीच वापरू शकतोस ना? मतदानास न जाता तू एकप्रकारे बोगस
मतदानासाठी जागा ठेवतो आहेस असे नाही का वाटत? आपले नाव त्या यादी मधून खोडले गेले
पाहिजे.

पूर्वीच्या कागदी मतदान पत्रिकांमुळे मत बाद करता यायचे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे येण्याआधी आणि
आता काय फरक झाला आहे ते पहा.

इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीनमुळे हजारो टन कागद वाचला. मतमोजणीला लागणारा वेळ वाचला. निकाल
झटपट लागू लागले. एकही मत बाद न होता १००% मते वैध ठरू लागली.अनेक देश भारतातील
इव्हीएम प्रमाणे मतदान घेण्याचे ठरवू लागले. हे सर्व ठीक.खूपच स्वागतार्ह.

पण मतदाराला एकही उमेदवार आवडत नसेल तर? मतपत्रिकेने मतदान करताना नकाराधिकाराची
अप्रत्यक्ष संधी होती. चुकीच्या ठिकाणी किंवा एकापेक्षा जास्त जागी शिक्का मारून मत बाद केले की
झाले. आपले नाव खोडले गेल्याशी मतलब म्हणजे किमान आपल्या नावावर कोणी बोगस मतदान तरी
करणार नाही याची खात्री.पण यातही हे नकाराधिकारातून मुद्दामहून बाद केलेले मत की चुकून बाद
झालेले मत हे ठरवता येत नव्हतेच. ही सर्व मते बाद मतां मध्ये गणली जात.

पुढे इव्हीएम आल्यावर ही `सोय' बंद झाली. मग नकाराधिकारासाठी विशिष्ट फॉर्म भरून देता येइल
असे पेपर मध्ये आले होते. मी मागील विधानसभा निवडणूकीत हा पर्याय वापरला होता. आमच्या इथे
अवघे ४ उमेदवार होते. मला कोणालाच मत द्यायचे नव्हते. तेथील अधिकाऱ्यांना व्हिटो राईट बद्दल
संगितले असता त्यांनी त्याबद्दल अनभिज्ञता दाखवली. शेवटी म. टा. चे कात्रण दाखवल्यावर त्यांच्या
डोक्यात प्रकाश पडला. मग एका कॉलममध्ये त्यांनी कोणालाही मतदान केले नाही असे लिहून घेऊन
सही घेतली. बोटाला शाई लावली. नावावर काट मारली. पण या सर्व प्रकारात माझे मत गुप्त राहिले
का? तर नाही. मी कोणालाच मत दिले नाही ही बाब उघड झाली. मग गुप्त मतदान पद्धतीला काय
अर्थ राहिला? म्हणुनच अनेक संघटना नकाराधिकाराचे बटन मशीनवरच हवे म्हणून मागणी करत आहेत
व अशा मतांचीही मोजणी व्हावी असा त्यांचा आग्रह आहे.

वर वर पाहता हे चुकीचे वाटेल. थोडा अभ्यास करून त्यातल्या त्यात चांगला उमेदवार निवडावा असेही
सांगितले जाते. पण हे प्रत्येक वेळी शक्य नसते. उमेदवाराची महिती मिळवण्यास वेळ असतोच असे
नाही. कधिकधि ही माहिती दिशाभूल करणारी असू शकते. अनेक उमेदवारांच्या नावावर पोलिस केस सुरू
आहेत. या केसेस कोणत्या गुन्ह्याखाली सुरू आहेत हे ही कळू शकते. पण कोणत्यातरी चांगल्या
आंदोलनासाठी तुरुंगात गेलेल्या उमेदवाराच्य नावावरही क्रिमिनल रेकॉर्ड दिसते. हे चुकीचे नाही का?
अग्नि संस्थेने मतदारसंघ निहाय सर्व उमेदवारांची अशि यादी बनवून प्रसिद्ध केली आहे. यात त्या
उमेदवाराचा पक्ष वय, शिक्षण,एकूण मालमत्ता,त्या भागाचा रहिवासी आहे की नाही,पॅन क्र. दिला आहे
की नाही,कन्व्हिक्शनस,पेण्डींग केसेस अशी यादी दिली आहे.
ही साईट पहा www.myneta.info

मुख्य पक्षांचे उमेदवार सोडल्यास (कदाचित तेही नाहीत) आपल्या मतदारसंघात कोणकोणते उमेदवार उभे
आहेत हे मतदान केंद्रावर गेल्यावर तेथे बाहेर लावलेली enlarged मतपत्रिका पाहूनच कळायचे.
अग्निच्या यादीमुळे ही नावे घरबसल्या कळू शकतात. काही असो..मतदान हे पवित्र कर्तव्य आहे असे
मानले चुकीच्या उमेदवाराला मत देऊन पाप केले आहे असे वाटू नये म्हणून हा नकाराधिकारावरील ई-
पत्र प्रपंच होता.

पण आता निवडणुका होऊन गेल्या आहेत. आणि उद्या `निक्काल' लागणार आहे. पाहुया घोडामैदान
जवळ आहे. मला तरी वाटते की सध्याचेच आघाडी सरकार परत सत्तेत येईल.

- मंदार.
मंदारच्या पत्राला मी दिलेले प्रत्युत्तर -
मंदारला माझे उत्तर
21 October 2009 14:51
परम मित्र मंदार,

तुझ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुझ्या ई-पत्रातील ’घोडा मैदान जवळ आहे’ या वाक्याने घोड्यांचा अपमान झाल्यासारखे वाटले त्यामुळे मी या वाक्याऐवजी ’डूक्कर - उकिरडा जवळ आहे’ अशी मनातल्या मनात सुधारणा करून वाचले. असो.
खाली आजच्या लोकसत्तातील अग्रलेख दिला आहे तो काळजी पूर्वक वाच. त्यांचे शेवटचे वाक्य "सामान्य माणूस यापुढे उमेदवारीच्या जवळपासही पोहोचू शकणार नाही, याची ही पावती आहे." अतिशय बोलके आहे. माझ्या मतदारसंघात कोणीच उमेदवार / पक्ष लायक नव्हता (मी लेखात लिहील्याप्रमाणे ज्या पक्षाचे नेते चांगले आहेत उदा. अजित पवार त्यांचे उमेदवार चांगले नव्हते तर चांगल्या उच्चशिक्षीत उमेदवारांनी रिडालोस मध्ये सामील होऊन स्वत:ला अबू आझमी व रामदास आठवलेंसारख्या दिशाहीन नेत्यांच्या दावणीला बांधले होते. असो.)
आता सगळेच उमेदवार इतके नालायक असल्यावर खरे मतदान होवो अथवा बोगस मतदान निवडून येणार यांच्यापैकीच एक. मग या बोगस मतदानाचा बाऊ कशाला करायचा? आणि जर खरेच इतके बोगस मतदान होते तर दर निवडणूकीत ६० टक्क्यांच्या आसपासच मतदान झालेले दिसते ते का? बोगस मतदान झाले तर १०० टक्के नाही तरी निदान ८० ते ८५ टक्क्यांचा आकडा दिसायला हवा. असो. मला वाटते मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.
माझ्या मते सरकार कुणाचे येते ते महत्वाचे नाही (कारण सार्‍यांची नियत आणि कुवत सारखीच). आपण त्यांच्यापुढे आपल्या मागण्या मांडणे आणि त्यांचा पाठपुरावा (Follow-Up) करणे महत्त्वाचे. पाच वर्षांपुर्वी आपण अशाच आपल्या मागण्या लोकसत्तामार्फ़त मांडल्या आणि आपल्याला माननीय मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुखांबरोबर त्यांच्या वर्षा या निवासस्थानी चर्चेची संधी मिळाली. आपली ओळखही त्या निमित्तानेच झाली. (आठवण ताजी करण्यासाठी त्या प्रसंगी काढलेले प्रकाशालेख (Photograph चा खरा मराठी अनुवाद) पाठवित आहे).
आताही तू म्हणतोस तसे आघाडीचेच सरकार आले आणि पुन्हा विलासरावच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले तर लोकसत्ताने आपल्याला पुन्हा एकवार चर्चेची संधी द्यायला हवी. पुर्वीच्या मागण्या कितपत पुर्ण झाल्यात याचाही ऊहापोह करता येईल. तू मुंबईतच राहतोस तेव्हा शक्य असल्यास कुमार केतकरांची भेट घेऊन ही मागणी करावीस असे मला वाटते. माझ्या आठवणी प्रमाणे तू तेव्हा चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांचे संपर्क पत्ते व दूरध्वनी क्रमांक लिहून घेतले होतेस तेही केतकरांना देऊ शकतोस. मला वाटते सारे जण अत्यंत आनंदाने पुन्हा सामील होऊ शकतील.
वर उल्लेखित लोकसत्ता मधला अग्रलेख
तीन कोटींचा तमाशा!
बुधवार, २१ ऑक्टोबर २००९
येत्या एक-दीड दिवसात महाराष्ट्राचे राजकीय चित्र स्पष्ट होईल. विधानसभेवर निवडून येण्यासाठी इरेला पडलेल्या उमेदवारांनी पैशांची केलेली उधळपट्टी ही शरमेने मान खाली जावी, अशी आहे. एकेका मतदारसंघात किमान तीन तीन कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. या हिशेबाने २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण किती पैसे उडवण्यात आले, याचे त्रराशिक मांडले तर तीन हजार कोटींहून अधिक रुपये या तमाशात उधळले गेले आहेत, असे लक्षात येईल. सामान्य माणसाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे हे पैसे खर्च झाले, ही वस्तुस्थिती आहे. वाईट याचे वाटते, की या पैशात यंदा मोठय़ा प्रमाणात बहुतेक लहानमोठय़ा प्रसारमाध्यमांनी अत्यंत घृणास्पद अशी भूमिका बजावली आहे. काही सन्माननीय अपवाद वगळले तर या भ्रष्ट ‘पॅकेजीकरणा’च्या लाटेवर अनेकजण स्वार झाले होते. अनेक ‘मीडिया’ घराण्यांचे मालक, चालक पैशाच्या अशा व्यवहारात आघाडीवर होते, ही वस्तुस्थिती आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक निधीचा एकतृतीयांशहून अधिक हिस्सा प्रसारमाध्यमांना पुरस्कृत करण्यासाठी राखून ठेवला होता, असे म्हणतात. एकाच वेळी दोन्ही बाजूच्या उमेदवारांकडून पैसे घेतले गेले आणि तिथेही ‘त्यांनी इतके दिले, तुम्ही किती देणार’, अशी सौदेबाजी केली गेली. काही मालक स्वत:च पैसे आणायला बाहेरगावी जात होते अशी उघड चर्चा होती. प्रश्न उमेदवाराने राजकीय आखाडय़ात उभे राहून स्वत:ची बोली लावण्याचा होता, ती ते लावत होते. वीस-पंचवीस लाखांच्या आतबाहेर प्रत्येकाचा ‘मीडिया’शी स्वतंत्र व्यवहार ठरत असे, असे सांगितले गेले. अशी ही विक्रीव्यवस्था एकाचवेळी चौघांशी झाल्यास ‘मीडिया’चे ‘पॅकेज’ कोणत्या स्तरावर जात असेल, याचा विचार न करणे उत्तम! अमेरिकेत काही काळापूर्वी ‘चेक-बुक जर्नालिझम’ कुविख्यात होते, पण इथे त्याने ‘आज रोख उद्या उधार’ या तत्त्वाचा डाव मांडला. पत्रकारितेतही पूर्वी काही थोडय़ांना दारू पाजली की पुढे सर्व काम सुरळीत होत असे, असे म्हटले जाई. आता हे सर्व ‘ट्रेड इन कॅश’ पातळीवर पोहोचले आहे. तुमच्यासंबंधात गैर न छापण्यासाठी अमुक इतके, चांगले छापण्यासाठी अमुक इतके आणि प्रतिस्पध्र्याची अडचण करून ठेवणारी बातमी छापायचे अमुक इतके, असा हा सारा व्यवहार! काही पत्रकारांनाही त्यासाठी कामाला लावण्यात आले होते आणि त्यांनीही ही ‘कामगिरी’ बिनबोभाटपणे पार पाडल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही अशा पद्धतीचे व्यवहार झाले, परंतु तेव्हा मतदारसंघ ४८ आणि महत्त्वाच्या उमेदवारांचे प्रमाण त्या मानाने कमी. या खेपेला २८८ मतदारसंघ आणि त्या प्रत्येकाची परिणामकारकता जास्त. स्वाभाविकच ज्यांना निवडून यायचे आहे, अशांनी हा दौलतजादा केला असेल तर नवल नाही. या संतापजनक बाबीची बाजारात चविष्टपणे चर्चा होत असली तरी संबंधित माध्यमांच्या मालक, चालक, पालक यांना त्याचे काही सोयरसुतक नाही. ‘पेज थ्री’ संस्कृतीचे हे विकृतीकरण नसानसात भिनल्याचे पाहायला मिळावे, यापेक्षा दुर्दैव दुसरे कोणते? काही मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी, उमेदवारांच्या प्रतिनिधींनी पैसे कसे उधळले, याच्या सुरस आणि रंजक कथा अजूनही कानावर येत आहेत. काही मतदारसंघांत स्वयंचलित दुचाकी वाहनांपासून मोटारीपर्यंत अनेक गोष्टींचे वाटप झाले. पुणे शहराचा लौकिक असा, की या शहरातले विद्वान खिशात भजी ठेवून रस्त्याने जाताना वाचन करायचे. आता कुणालाच वाचन करायचे नसल्याने, त्यांच्या खिशात भलत्याच गोष्टी निघतात. खिशात अंगठय़ा बाळगणाऱ्यांनी त्या मतदाराच्या बोटात सरकवल्याची सध्या चर्चा केली जात आहे. कोकणातल्या एका मतदारसंघात एका उमेदवाराच्या जीपमध्ये अगदी अलीकडे एक कोटी रुपये सापडले. निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी ती जीप चौकशीसाठी ताब्यात घेतली. या जीपमध्ये एक हजार रुपयांच्या शंभर नोटांचे एक बंडल, अशी शंभर बंडले मिळाल्याची चर्चा आहे. गंमत अशी, की ही जीप जेव्हा जवळच्या पंपावर नेण्यात आली, तेव्हा या जीपमध्ये मतदारांना वाटण्यासाठी ५० साडय़ा असल्याचे ‘निष्पन्न’ झाले आणि गुन्हा दाखल झाला. आता त्या एक कोटीचे काय झाले, याची खुमासदार माहिती चर्चेचा विषय बनली आहे. या हजार रुपयांच्या नोटा तरी खऱ्या का, असे विचारले जात आहे. याचे कारण असे, की महाराष्ट्रातल्या एका शहरात वाटण्यात आलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. अशा बनावट नोटा चलनात आणायचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांना शिक्षा अपरिहार्य आहे. ज्याने हे पैसे वाटण्यासाठी दिले, तो कदाचित आता म्हणेल, की मी जेव्हा हे पैसे दिले तेव्हा ते खरे होते, नंतर त्यांचे काय झाले, ते मी कसे सांगणार? सुरस आणि चमत्कारिक अशा या कथांची मालिकाच निवडणुकीत पाहायला मिळाली. महानगरांमधील मध्यमवर्गीय वसाहतींनी आपल्या इमारती रंगवून घेतल्या, तर काहींनी आपल्या वसाहतींना पाण्याच्या मोठय़ा नळांचे कनेक्शन जोडून घेतले. काही डोकेबाज व्यवस्थापकांनी आपल्या वसाहतींच्या सर्व केबलजोडची दोन वर्षांची वर्गणी उमेदवाराला भरायला सांगितली आणि उमेदवाराच्या प्रतिनिधीने पैसे भरल्याची पावती जेव्हा त्या वसाहतीच्या अध्यक्षांना दाखवली, तेव्हाच त्यांनी संबंधित उमेदवाराला मत द्यायचा फतवा आपल्या सभासदांना उद्देशून काढला, असेही म्हणतात. पूर्वी झोपडपट्टय़ांमध्ये साडय़ा वाटल्याचे आरोप करणाऱ्या तथाकथित सुशिक्षितांनी या वेळी अशा व्यवहारांमध्ये खुलेआम स्वत:ला झोकून दिले होते. मतदारांना वश करण्यासाठी उमेदवारांकडून कोणकोणते डावपेच लढवले गेले, हे ऐकताना एखाद्याची मती खरोखरच गुंग होऊन जाईल. प्रश्न, कुणी काय घेतले किंवा कुणी काय दिले, यापेक्षा या सगळय़ांकडे एवढे पैसे आले कुठून, हा आहे. या उमेदवारांपैकी कदाचित फारच थोडे गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे असू शकतात, फारच थोडय़ांचे काळे धंदे असू शकतील, त्यापैकी फारच थोडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर काळा पैसा बाळगणारे असू शकतात. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पैसा खर्च केला जाऊनही निवडणूक आयोगाचे त्याकडे लक्ष कसे गेले नाही, हा जसा एक भाग आहे, तसा प्राप्तिकर खात्याची मंडळी या काळात डोळय़ांवर पट्टय़ा बांधून स्वस्थचित्त का होती, असा दुसरा प्रश्न आहे. यापैकी काही उमेदवारांची स्विस बँकेत खाती आहेत किंवा काय, याची माहिती तपासण्याची गरज आहे. ज्यांची स्विस बँकेत खाती आहेत, अशांपैकी कुणीतरी आपल्या मर्जीतल्या उमेदवाराला मदत करायला पुढे आले असण्याची शक्यता आहे. हा उमेदवार निवडून आला, की त्याला दामदुपटीने परतफेड करायला लावायचाही संबंधितांचा डाव असू शकतो. या उमेदवारांपैकी फारच थोडय़ांनी कर्ज काढून निवडणुकीची ही दिवाळी साजरी केली असण्याची शक्यता आहे. कोणतीही बँक उद्योगधंद्यासाठी जसे कर्ज द्यायला तयार होते, तशी ती निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे आहे म्हणून कर्ज द्यायला तयार होत नाही. निवडणूक आयोगाने पैसा खर्च करायची जी मर्यादा ठरवून दिली ती यातल्या प्रत्येकाने प्रचाराच्या पहिल्याच दिवशी ओलांडली असण्याची शक्यता आहे. तरीही निवडणूक आयोग मत व्यक्त करेल, असे नाही. स्विस बँकेने परवाच, आपण भारताला सर्व खातेदारांची नावे द्यायला तयार आहोत, असे जाहीर केले आहे. तसे घडले तर ज्या भारतीयांचे स्विस बँकेत पैसे आहेत, त्यांची पाचावर धारण बसणार आहे. भारतीयांचे ७० हजार कोटी रुपये स्विस बँकेत आहेत, त्यात यांच्यापैकी कुणी नसेल, अशी शक्यता नाही. शेवटी कुणाच्या तरी वारेमाप पैशाच्या जिवावरच हा सगळा मस्तवालपणा केला गेला. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी खर्च केलेले पैसे, उतरल्यानंतरचे पैसे आणि निवडून येताच मंत्रिपद लाभावे म्हणून खर्च होणारे पैसे, असे तीन प्रकार सध्या चर्चेत आहेत. त्यात आता सट्टेबाजाराचीही भर पडली आहे. निवडणुकीच्या रिंगणात या खेपेला बरेच कोटय़धीश उभे होते, त्याचाही हा परिणाम आहे. सामान्य माणूस यापुढे उमेदवारीच्या जवळपासही पोहोचू शकणार नाही, याची ही पावती आहे.

Thursday, 27 March 2014

काळा घोडा

आधी Dark Horse ही काय संकल्पना आहे ते ठाऊक नसणार्‍यांकरिता:- घोड्यांच्या शर्यती प्रेक्षक दुरून पाहत असता त्यांना काही घोडे विजयाच्या टप्प्यात आल्यासारखे आढळतात.  त्यांच्यापैकीच एखादा विजयी होणार यावर ते अंदाज बांधून पैजदेखील घेतात.  असे चर्चेत असणारे किमान पाच सहा घोडे असतात आणि बहुतेकवेळा त्यापैकीच एखादा विजयी होतो.  कधी कधी मात्र या चर्चेत नसणारा एखादा घोडा विजयी होतो.  हा  घोडा अचानक कुठून येतो?  सुरुवातीपासून तो कधीच पहिल्या पाचात नसताना अचानक एकदम मागून पुढे येतो का? तर तसे नाही.  तो सुरुवातीपासूनच पहिल्या पाच सहांमध्ये असतो परंतु तो गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचा असल्याने इतर उजळ रंगाच्या घोड्यांकडे जसे प्रेक्षकांचे लक्ष असते तसे याच्याकडे नसते.  हीच ती डार्क हॉर्स संकल्पना.

सध्या २०१४ च्या लोकसभा निवडणूकांचा हंगाम आहे.  पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनेक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत.  त्यांच्यापैकी एखादा पंतप्रधान होऊ शकतो हे खरेच परंतु त्यांच्याव्यतिरिक्त देखील एखादा उमेदवार अचानक पंतप्रधानपदी आरूढ होणे शक्य आहे.  गेल्या वीस वर्षांचा इतिहास पाहिला तर १९९६ मध्ये १३ दिवस, १९९८ मध्ये १३ महिने आणि १९९९ मध्ये साडेचार वर्षे पंतप्रधान पदावर राहिलेले अटलबिहारी वाजपेयी यांचा अपवाद वगळता इतर सर्वच उमेदवार ( पी. वी. नरसिंह राव, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल व मनमोहन सिंह दोन्ही वेळा) हे अगदी अनपेक्षित रीत्या पंतप्रधान पदावर विराजमान झाले आहेत.

यावेळीही नरेन्द्र मोदी, राहूल गांधी, नितीशकुमार ही नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत.  मायावती, मुलायमसिंह आणि ममता बॅनर्जी यांचीही या पदाविषयीची आकांक्षा जाहीर आहेच.  शरद पवार स्वत: नाही म्हणत असले तरी त्यांच्या वतीने त्यांच्या पक्षातील नेत्यांप्रमाणेच नाना पाटेकरांसारखे अभिनेतेही आग्रही आहेत.  मनमोहन सिंह काही बोलत नसले तरी त्यांना स्वत:ला पुन्हा एक टर्म करायची इच्छा आहेच (खरे तर त्यांना इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंचाही विक्रम मोडायचाय).  अरविंद केजरीवालना राज्य पातळीवर लॉटरी लागली होतीच तशीच आता पुन्हा राष्ट्रीय पातळीवर लागेल अशी अपेक्षा असणारच.  दिग्विजय सिंह पुन्हा पुन्हा सुषमा स्वराज यांचे नाव घेत आहेत.  जयललिता या प्रादेशिक नेत्या असल्या तरीही देवेगौडांप्रमाणेच त्यांनाही तिसर्‍या आघाडीत सामील होऊन पंतप्रधान होण्यास वाव आहे.  

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर असा कोणी नेता आहे का की जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीतला डार्क हॉर्स ठरू शकेल?  अर्थातच माध्यमांनी त्याचे नाव पंतप्रधान पदाचा संभाव्य उमेदवार म्हणून झळकवले असेल तर तो शर्यतीत तर राहील परंतु डार्क हॉर्स ठरू शकणार नाही.  

तेव्हा ज्याच्या नावाची पंतप्रधान पदाकरिता अद्याप चर्चा झालेली नाही असा माझ्या मते संभाव्य उमेदवार म्हणजे राजनाथ सिंह.  या निवडणूकांवर अगदी सुरुवातीपासून लक्ष दिले असता असे आढळून येते की, नरेन्द्र मोदी यांना भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून विनाअट आणि विनातक्रार सर्वशक्तीनिशी पाठिंबा देणारी पहिली व्यक्ती म्हणजे राजनाथसिंह.  नरेन्द्र मोदींना अडवाणी, स्वराज, अशा अनेक दिग्गजांचा सुरुवातीपासून प्रचंड प्रमाणात विरोध होता.  हा विरोध मोडून काढत तगडा पाठिंबा राजनाथ सिंह यांनीच दिला.  राजकारणात, युद्धात, व्यापारात (आणि प्रेम सोडून इतर सर्वच प्रकरणांत) कोणीच कोणाकरिता काहीच फुकट करीत नाही.  मग राजनाथसिंहानी मोदींकरिता अचानक एवढे सर्व का करावे?  तर माझा अंदाज असा की, मोदीच्या नावावर त्यांनी गुजरातेत केलेल्या विकासाच्या बळावर जनतेकडे मते मागावी, भरघोस जागा मिळवाव्यात आणि भाजपला विजयाच्या समीप आणून उभे करावे.  जर भाजपला पाठिंब्याकरिता काही जागांची गरज पडलीच तर इतर पक्षांचा पाठिंबा मिळविताना पुन्हा नरेन्द्र मोदींची आक्रमक हिन्दुत्ववादी ही प्रतिमा प्रसारमाध्यमांद्वारे ठळक करावी म्हणजे नरेन्द्र मोदींचा पर्याय बाजुला पडून इतर नेत्यांची नावे विचारात येतील परंतु यातही मोदींच्या पसंतीचा उमेदवार म्हणून स्वत:ची वर्णी लावून घ्यावी.  तसेच जर भाजपला संपूर्ण बहूमत मिळाले तर मोदींच्या जीवाला धोका आहे असे सांगून त्यांच्या सुरक्षिततेकरिता त्यांच्याऐवजी आपणच पदावर आरुढ व्हावे असा काहीसा या भाजपाध्यक्षांचा डाव असू शकतो.  २००४ मध्ये संपुआला बहुमत मिळूनही सुषमा स्वराज आदींच्या जोरदार विरोधामुळे सोनिया गांधी पंतप्रधान न होता आकस्मिक रीत्या मनमोहन सिंह पंतप्रधान झाले होते त्या प्रसंगाशी साधर्म्य राखत यावेळी राजनाथ सिंह यांना पंतप्रधान बनणे शक्य आहे.