का ल द र्श क

Wednesday 8 December 2010

भारताला गरज भरताची



भारतीय नागरीक आपल्या पुराण पुरूषांच्या / देवतांच्या बाबतीत जरा जास्तच हळवे असतात.  त्यांच्या विषयी कुठे काही वादग्रस्त छापून आले तर लगेच आक्रमक होऊन दंगल / जाळपोळ करतात.  पण हेच भक्त लोक आपल्या आदर्शांचे गुण स्वत:च्या अंगी बाणविण्याबाबत तितकेसे उत्साही नसतात.  रामायणातील राम व महाभारतातील कृष्ण हे आपल्यापैकी बहुतेकांचे आदर्श.  मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा चमत्कारी श्रीकृष्ण बनणे हे आजच्या जमान्यात कुणालाच शक्य नाही.  त्यापेक्षा रामायणातला किंवा महाभारतातला भरत बनणे आपल्याला जमू शकेल.  किंबहुना आजच्या भारताला राम किंवा कृष्णापेक्षा भरताचीच जास्त गरज आहे.

रामायणातील भरत हा आद्यकाळातील विश्वस्त (Trustee) म्हणता येईल.  हाताशी आलेले अयोध्येचे राज्य त्याने आपल्या थोरल्या बंधुसाठी नाकारले.  पण त्याहूनही विशेष म्हणजे रामाच्या आग्रहावरून त्याने चौदा वर्षे राज्यकारभार चालविला, तोही राजा बनुन नव्हे तर राजाचा प्रतिनिधी म्हणून, त्याच्या पादुका गादीवर ठेवुन. तो स्वत: राजसिंहासनावर कधीच बसला नाही.  चौदा वर्षे त्याने विश्वस्त म्हणून निष्ठेने राज्य चालविले आणि त्यानंतर राम वनवासावरून परत येताच ’इदं न मम’ या वृत्तीने ते रामाच्या सुपूर्त केले.

महाभारतातील भरताचे काम तर रामायणातील भरताहूनही अधिक कठीण होते.  रामायणातील भरताला राज्यासाठी उत्तराधिकारी निवडण्याची गरज नव्हती.  राम येताच अयोध्येचे राज्य त्याला सुपूर्त करावयाचे हे भरताला ठाऊक होते.  परंतू महाभारतातील भरताला वानप्रस्थाश्रमास जाण्यापुर्वी आपला उत्तराधिकारी निवडायचा होता.  महाभारतातील भरत हा राजा दुष्यंत व शकुंतला यांचा पुत्र, हस्तिनापूरचा सम्राट, चंद्रवंशी राजा भरत होय.  असे म्हणतात की याच्याच नावावरून आपल्या देशाचे नाव भारत असे पडले.  ह्या भरताला आठ पुत्र होते.  आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून तो ह्या आठांपैकी कुणाचीही निवड सहज करू शकला असता.  त्याकाळी राजेशाही पद्धत अस्तित्त्वात असल्याने त्यात कुणाला काही खटकण्यासारखेही नव्हते.  परंतू आपल्या आठही पुत्रांपैकी कुणीही राजगादीसाठी पात्र नसल्याचे लक्षात येताच त्याने आपल्या राज्यातील एका योग्य तरूणाची (शंतनू) आपला राजकीय वारस म्हणून निवड केली.  आपल्या रक्ताच्या पुत्रांना डावलून एका परक्या तरूणाला राज्याभिषेक करण्याचे धाडस सम्राट भरत दाखवू शकले ते केवळ त्यांच्या अंगी असलेल्या विश्वस्त वृत्तीमुळेच.

राजा भरताची ही विश्वस्त वृत्ती हस्तिनापूरच्या पुढील राज्यकर्त्यांना जोपासता आली नाही.  सरसकट सर्वांनी आपल्या पुत्रांना राजगादीवर बसविले.  सरळ मार्गाने पुत्र झाला नाही तर व्यभिचाराने पुत्रांना जन्म दिला.  (आठवा व्यासांपासून राणी अंबिकेला झालेला अंध धृतराष्ट्र, तर अंबालिकेला झालेला रोगट पंडू).  पण यापैकी एकालाही आपणदेखील सम्राट भरताप्रमाणेच राज्यातील एखाद्या होतकरू तरूणाला आपला राजकीय वारस नेमावे असे वाटले नाही. 

आजच्या जमान्यात तर लोकशाही सत्ता पद्धत अस्तित्त्वात असून देखील आपल्या अपात्र चिरंजीवांना सत्तेत आणण्याची धडपड करणारे नेते पाहता, त्या काळातही घराणेशाही जनतेवर न लादण्याचा सम्राट भरताचा निर्णय केवळ स्तुत्यच नव्हे तर अनुकरणीय देखील वाटतो. 


आपण राज्याचे मालक नसून विश्वस्त आहोत व ही सत्तेची खिरापत आपल्या घराण्यातील लोकांना वाटण्यासाठी नसून हे पद विश्वस्त वृत्तीने काम करू शकेल अशा लायक व्यक्तीला सोपविणे ही आपली जबाबदारी आहे हे आजच्या लोकप्रतिनिधींनी समजून घेतले पाहिजे.  खरेतर अनेकांना ही बाब कळते पण वळत नाही.  ह्याला कारण पुत्रप्रेम माणसाला अंधत्व आणते व त्याला कर्तव्य दिसत नाही.  संभाव्य उमेदवारांमध्ये आपला पुत्रही असेल तर साहजिकच त्याला झुकते माप दिले जाते.  महाभारतातही पुत्र की पुतण्या हा निर्णय घेताना धृतराष्ट्राला निष्पक्षपातीपणा दाखविता आला नाही.  तीच चूक आजचे नेतेही करीत आहेत.  नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वरीष्ठ सनदी पोलीस अधिकारी देखील पोलीस दलात घराणेशाही आणत आहेत.  (आठवा लोकसेवा आयोग परीक्षा घोटाळा).

अर्थात पुत्राला आपला उत्तराधिकारी नेमले नाही तरीही अडचणच.  लोक तिकडूनही नावे ठेवतात.  (महात्मा गांधींची चारही मुले फारशी चमकली नाहीत; त्यावेळी गांधींनी मुलांसाठी काहीच केले नाही, ते आपल्या पितृधर्माला जागले नाहीत, अशी त्यांच्यावर टीका करणारेही अनेक जण सापडतील).  तसेच गृहस्वामिनीचा रोषही पत्करावा लागतो.  याशिवाय राजकारण काही पुर्वीइतके सरळ राहिलेले नाही.  हल्लीच्या जमान्यात सरळमार्गी माणसालाही कधी कधी चौकटीबाहेर जाऊन काही कामे करावी लागतात.  अशा व्यक्तीची ही जगापासून गुप्त असलेली व त्याला अडचणीत आणू शकणारी रहस्ये त्याच्या पुत्राला नक्कीच ठाऊक असतात.  पुत्राला दुखविणे हे सर्वनाशालाच निमंत्रण ठरू शकते.  (पाहा - अमिताभ बच्चन यांचा सरकार हा चित्रपट).  म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती.

त्यामूळे बरेचदा राज्यकर्त्यांना अनेकदा अनिच्छेनेच आपल्या अपात्र पुत्रांनाही आपला राजकीय वारस घोषित करावे लागते.  ’अत्यूच्च पदी थोरही बिघडतो’ अशा अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे.  हा थोर बिघडतो तो बहुधा या पुत्रप्रेमा अथवा पुत्रदबावामूळेच.

सम्राट भरताची विश्वस्त वृत्ती अंगी बाणवायची असेल तर सार्वजनिक क्षेत्रात मोठी जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी स्वत:ला अपत्य होऊ न देण्याचा कठोर निर्णय घेणे हेच इष्ट.  अनेकांना हे विधान धाडसाचे वाटू शकेल, परंतू मोठ्या पदाची मनीषा बाळगून असलेल्या व्यक्तींनी एवढा किमान त्याग तरी केलाच पाहिजे.  हा विचार जगावेगळा, बहुमताच्या विरुद्ध वाटण्याची शक्यता आहे.  परंतू एक लक्षात ठेवले पाहिजे की जग हे अतिसामान्य विचारसरणीच्या बहूसंख्य लोकांमुळे चालले नसून असामान्य, लोकोत्तर विचारसरणीच्या संख्येने अत्यल्प असलेल्या लोकांमुळेच चालले आहे.  बसमध्ये साठ प्रवासी असतात, परंतू बस चालविण्याचे काम एकटा चालकच करीत असतो.  साठही प्रवासी उतरून गेले तरीही चालक एकटा बस पुढे नेऊ शकतो.  पण साठ प्रवासीदेखील चालकाशिवाय बस चालवू शकत नाहीत.  प्रत्येकानेच अशा प्रकारे वर्तन करावे अशी अपेक्षा नाही, परंतू भारताच्या एक अब्ज लोकसंख्येतून निदान असा एकतरी भरत निर्माण व्हावा ही अपेक्षा चूकीची आहे काय?

Thursday 2 December 2010

गुन्हेगारी रोखण्यासाठी मी काय करू शकतो?


 

पूर्वप्रसिद्धी:- मिसळपाव

होय. 'आपण काय करू शकतो?' असे न लिहीता 'मी काय करू शकतो?' असे शीर्षक मुद्दामच दिले आहे. याचे कारण मी वाचलेली एक जुनी गोष्ट. या गोष्टीत एक राजा त्याच्या जनतेला एक दिवसात एक मोठा हौद दुधाने भरण्यास सांगतो. यासाठी सर्वांनी फक्त एक, एक हंडाभर दूध त्या हौदात टाकायचे असे ठरते. प्रत्येक जण असा विचार करतो की बाकीचे सर्वच जर एक, एक हंडाभर दूध टाकणार आहेत तर त्या हौदात मी एकट्याने एक हंडाभर दुधाऐवजी एक हंडाभर पाणी टाकल्याने असा कितीसा मोठा फरक पडणार आहे? अशा पद्धतीने सर्वांनीच विचार केल्याने संध्याकाळपर्यंत तो हौद दुधाऐवजी पाण्यानेच भरून जातो. तेव्हा एखाद्या समुहाला एखाद्या कार्याचे आवाहन केल्यास त्या कार्याचा कसा विचका होतो हे जाणून मी समूहातील प्रत्येक व्यक्तिला व्यक्तिश: आवाहन करीत आहे.

बरेचदा आपल्याला गैर व्यवहार रोखण्याचे उपाय माहित असतात कारण ते अतिशय साधे आणि सोपे असतात. अर्थात कळायला सोपे असले तरी अंमलात आणायला ते अनेकांना कठीणच नव्हे तर अगदी अशक्य सुद्धा वाटतात. उदाहरणार्थ भ्रष्टाचार रोखण्याचा अगदी साधा आणि सोपा मार्ग म्हणजे आपण त्यात सामील न होणे. पण हेच अनेकांना जमत नाही ते म्हणतात 'आम्हालाही काही लाच द्यायची हौस नाही पण क्षुल्लक रकमेकरीता भांडत बसायला कोणाला इथे वेळ आहे आणि शिवाय त्यापायी आपली महत्वाची कामे अडून राहतात ते निराळेच'. थोडक्यात काय तर उपाय नुसता माहिती असून काही फायदा नाही तो अंमलात आणायलाही तितकाच सोपा असायला हवा. आज मी तुम्हाला अशाच एका अंमलात आणायला सोप्या असणार्‍या उपायाची माहिती देणार आहे. अर्थात या उपायाने गुन्हेगारी पुर्णत: रोखली जाणार नसली तरीही निदान 'गुन्हेगारी रोखण्यातील पहिली पायरी' एवढे महत्व तरी या उपायाला निश्चितच आहे. तेव्हा हा उपाय अंमलात आणून तुम्ही गुन्हेगारी रोखण्यातला खारीचा वाटा नक्कीच उचलु शकता.

हा साधा सोपा उपाय मला सापडला तो भारताची आर्थिकच नव्हे तर गुन्हेगारी राजधानीदेखील असलेल्या मुंबई शहरात. पुर्वी ह्या शहरात आपले सार्‍यांचे आवडते श्री. प्रमोद नवलकर हे त्यांच्या हयातीत वेळी अवेळी फेरफटका मारून टेहळणी करीत आणि शहरातील समस्यांचा आढावा घेऊन त्यांना जाणवलेल्या अडचणी व त्यावर सापडलेले उपाय वाचकांपुढे समर्थपणे मांडत. त्यांच्या जाण्याने ही प्रथा जणु खंडितच झाली. पण त्यांच्या लेखांपासून प्रेरित होऊन हाती काही लागते का? याचा शोध घ्यावा म्हणून मीही मुंबईत असा फेरफटका मारला आणि काय आश्चर्य अगदी युरेका, युरेका ओरडावे अशा काही नवीन गोष्टी समोर आल्या. त्यापैकीच एक म्हणजे मुंबईतील भिकार्‍यांची समस्या.

आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्यापैकी सर्वांनीच जर ह्या भिकार्‍यांना भीक घालणे बंद केले तरी गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल. लोकल ट्रेन, बस, रस्ते, फुटपाथ, दुकाने व चौपाटीसारख्या ठिकाणी लोकांकडून रोज भिकार्‍यांना दिल्या जाणार्‍या रकमेचा एकूण ताळेबंद हा काही कोटींच्या घरात जातो हे अविश्वसनीय असले तरी सत्य आहे. आताच्या जमान्यात लोक भिकार्‍यांच्या थाळीत पुर्वीसारखे चार - आठ आणे न टाकता एक, दोन अथवा पाच रुपयांची नाणी सर्रास टाकतात. काही दुकानदारांच्याकडे तर येणार्‍या प्रत्येक भिकार्‍याला पाचचे नाणे अथवा दहाची नोट दिली जाते. दिवसभरात हे दुकानदार सरासरी पाचशे ते हजार रुपये भिकार्‍यांवर खर्च करतात. परदेशी पर्यटक व उच्चभ्रू यांचे कडे तर लहान नोटा व नाणी नसल्यामुळे त्यांच्याकडून अनेकदा भिकार्‍यांना शंभराच्या नोटांचादेखील लाभ होतो. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे भीक घालणार्‍यांच्या संख्येतही वाढ होत आहे. या संख्येने मिळणार्‍या रकमेला गुणल्यास प्रत्येक भिकारी सरासरी वीस ते तीस हजार रुपये महिना कमवितो. अर्थात हा सारा पैसा त्या भिकार्‍याचा राहत नाही. यातला किरकोळ भाग वजा जाता बाकी सारा मलिदा हा अंडरवर्ल्ड अर्थात गुन्हेगारी क्षेत्राला जाऊन मिळतो. (आणि यामुळेच इतकी सारी कमाई होऊनही भिकार्‍यांना पुन्हा भीकच मागावी लागते.)

भिकार्‍यांकडून गुन्हेगारांपर्यंत पैसा पोचण्याची काही कारणे खालीलप्रमाणे:-

भिकार्‍यांना बसण्यासाठी ज्या मोक्याच्या जागा हव्या असतात त्यांच्यावर 'दादा' लोकांचे राज्य असते त्यामुळे या दादांना त्यांचा वाटा देण्याशिवाय भिकार्‍यांना गत्यंतर नसते.
याशिवाय कुणालाही जन्मजात भीक मागण्याची आवड नसते. त्यांना तसे करण्यास लाचार बनविते त्यांची हतबल परिस्थिती. त्यामुळे आपण भीकेवर जगतो आहोत ही भावना त्यांना मनातून कुरतडत असते. यावर मात करण्यासाठी व निगरगट्ट बनण्यासाठी अनेक भिकारी अफू, चरस, गांजा आदी अंमली पदार्थांचे सेवन करतात. हे पदार्थ त्यांना गुन्हेगारांकडून अव्वाच्या सव्वा दराने विकले जातात.
अनेक लहान मुलांना गुन्हेगारी टोळ्यांमार्फतच जबरदस्तीने भीक मागण्यास लावले जाते. यासाठी त्यांना अंध, अपंगही बनविले जाते. साहजिकच त्यांना भीक म्हणुन मिळणारी रक्कम ह्या गुन्हेगारांच्याच ताब्यात जाते. त्याशिवाय यातील काही बालकांना त्यांचे वय वाढल्यावर गुन्हेगारी क्षेत्रात सामावुन घेतले जाते आणि भुरट्या चोर्‍या व खिसे कापण्यासारखे काही गुन्हे त्यांच्यामार्फत करुन घेतले जातात.

तेव्हा 'मी कुणालाही भीक देणार नाही' एवढा साधा नियम आपल्यापैकी प्रत्येकाने पाळला तरी गुन्हेगारांना मिळणारी मोठी रसद तोडली जाईल यात शंकाच नाही. याउप्परही आपल्याला एखाद्या भिकार्‍याची खुपच दया आल्यास त्याला आपल्यासोबत घेऊन काही अन्न खावयांस लावणे. भिकारी वयाने प्रौढ असल्यास त्याला एखादे काम द्यावे वा तो बालक असल्यास त्यास एखाद्या चांगल्या संस्थेत भरती करावे अथवा आपली ऐपत असल्यास रीतसर कायदेशीर सोपस्कार करून त्यास दत्तक घेऊन स्वत: सांभाळावे. परंतू हे शक्य नसल्यास औटघटकेचे औदार्य दाखवून त्यास भीक म्हणून रोख रक्कम कदापि देऊ नये. लक्षात ठेवा भिकार्‍याला भिकारी राहू न देणे हीच त्याच्यावर खर्‍या अर्थाने दया दाखवणे ठरते. याशिवाय आपण आजच्या एका बालकाला भीक मागण्यापासून परावृत्त करतो त्याचवेळी आपण उद्याचा एक गुन्हेगार घडण्यापासूनही थांबवित असतो.

अर्थात, ही एक छोटीशी पायरी आहे पण ज्यांना ही देखील ओलांडता येत नसेल ते पुढच्या पायर्‍या कशा ओलांडणार? ज्यांना यापुढे जाऊन काही करायचे असेल त्यांच्यासाठी:-

मी अजून काय करू शकतो?
मी कुठल्याही संघटनेशी संबंधित असेल, अंगी थोडेसे धाडस व सोबत इतरांचे पाठबळ असेल तर ह्या भिकार्‍यांवर गुपचूप नजर ठेऊन त्यांचे कुणाशी संबंध आहेत? ते कुणाशी आर्थिक व्यवहार करतात? या गोष्टींचा छडा लावून ही माहिती पोलिसांपर्यंत, माध्यमांपर्यंत पोचवू शकतो.

मी कुठल्याही माध्यमाशी (द्रुक / श्राव्य / मुद्रित, इत्यादी) संबंधित असेल तर या विचारांचा शक्य तितकी प्रसिद्धी देऊन जनजागृती करु शकतो.

वरील पैकी काहीच शक्य नसले तरी निदान माझ्या संपर्कातील इतरांना ही माहिती पुढे पाठवू शकतो.

"मग मी आता यापैकी काय करणार आहे?' हे ज्याचे त्याने ठरवावे.

Wednesday 1 December 2010

रिक्षाचालकांचा इलाज

प्रवाशांचे हक्क आणि रिक्षाचालकांचे कर्तव्य
 
आपल्या देशात काही व्यवसाय करण्यासाठी सर्वांना मुक्त परवानगी आहे. परंतू इतर काही व्यवसाय करण्यास परवाना पद्धती लागू करण्यात आली आहे. हे व्यवसाय सर्वांनाच करता येत नाहीत. त्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात येते जेणेकरून त्यांच्या व्यवसायात स्पर्धा निर्माण न होता त्यांना नियमित उत्पन्न मिळावे. रिक्षावाहतूकीचा व्यवसाय हा देखील त्यापैकीच एक आहे. त्याचप्रमाणे टॆक्सीवाहतूकीचाही. या व्यवसायातील लोक काळ्या-पिवळ्या रंगातील वाहनांचा उपयोग करतात. हे रंग ते सार्वजनिक सेवा करतात असे दर्शवतात. त्यामूळे या लोकांच्या व्यवसायाला एक स्पर्धामुक्त वातावरणाचे संरक्षण लाभले आहे. उदाहरणार्थ :- वाहने भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय करणारे इतर लोकही असतात की जे आपल्या वाहनावर लाल रंगात T हे इंग्रजी अक्षर रंगवून घेतात. यांच्या वाहनाला पिवळ्या रंगाचा क्रमांकफ़लक असतो. परंतू या व्यवसायासाठी लागणारा परवाना सर्वांनाच मिळू शकतो. यांच्या संख्येवर कुठलीही मर्यादा नाही. त्यामूळे त्यांच्यात स्पर्धा असते. म्हणजेच एखादा आपली इंडिका रु.६/- प्रति कि.मी. भाड्याने देईल तर दुसरा रु.५/- प्रति कि.मी. भाड्याने देईल.
परंतू रिक्षा / टॆक्सी व्यवसायात अशी स्पर्धा नाही. त्यांना एका ठराविक दरानेच व्यवसाय करावा लागतो. एका दृष्टीने हा त्यांचाही फ़ायदा आहे कारण त्यामूळे त्यांच्यात चढाओढ लागत नाही आणि त्यांच्या व्यवसायाला संरक्षण मिळते. त्याप्रमाणे हा त्यांच्या प्रवाशांसाठीही फ़ायदा आहे. अशाच पद्धतीचे इतरही काही नियम या व्यवसायासाठी बनविले आहेत की जे प्रवासी व व्यावसायिक या दोघांसाठी फ़ायद्याचे तसेच बंधनकारकही आहेत.
  1. कायम टेरिफ़ कार्ड व मीटरचा उपयोग करणे
  2. स्टॆंडवर येणारे कुठलेही भाडे न नाकारणे.
  3. भाडे घेतल्यानंतर वाहनात आपल्या तर्फ़े इतर प्रवासी / नातेवाईक यांना न बसविणे.
  4. सार्वजनिक बस वाहतूकीच्या थांब्यावर प्रवासी न भरणे.
  5. अधिकृत रिक्षा थांब्याव्यतिरिक्त प्रवासी भरण्याकरिता इतरत्र रिक्षा उभी न करणे.
हे व इतर अनेक नियम किती तरी प्रवाशांना ठाऊकच नाहीत.
 
पिंपरी-चिंचवड मधील रिक्षावाले
 
मला माझ्या कामानिमित्त अनेकदा निगडीहून पुणे शहरात यावे लागते तेव्हा मी माझ्या घरापासून सकाळी निगडी बसस्टॊप पर्यंत येतो आणि तिथून पीएमटीने पुणे शहरात येतो. पुणे शहरात बहुतेक ठिकाणी पीएमटीची सेवा बरी आहे. माझे काम होऊन जाते. परंतू पुन्हा संध्याकाळी निगडीला आल्यावर परत माझ्या घरापर्यंत जायला बसची नियमित सोय नाही.
रिक्षाचालकांना मीटरप्रमाणे भाडे घ्यायचे मान्य नाही. ते प्रवाशांकडून दीडपट ते दुप्पट भाडे वसूल करतात. प्रवाशांनाही त्यात काही चूक आहे असे वाटत नाही. प्रवासी रिक्षात बसण्या आधी चालकाला इच्छित स्थळी जाण्याचे भाडे विचारतात त्यानंतर थोडीफ़ार घासाघीस करतात. पटले तर बसतात नाहीतर सरळ चालत जातात.
मी यावर उपाय केला तो असा :-
मी एका रिक्षात बसलो आणि त्याला माझ्या घराचा पत्ता सांगितला तो म्हणाला १५ रुपये होतील. मी म्हंटले चालेल. नंतर आम्ही आमच्या घरापर्यंत आलो तेव्हा मी त्याच्या हातात दहा रुपये दिले तर तो भांडायला लागला. नंतर त्याचा आरडाओरडा ऐकून माझे कुटुंबीय आणि इतर लोक ही जमा झाले. त्याने सर्व हकीगत सांगितल्यावर माझे कुटूंबीय व इतरांनीही त्या रिक्षाचालकाचीच बाजु घेतली. सर्वांचे म्हणणे असे पडले की जर तुमचे पंधरा रुपये अगोदरच ठरले होते तर आता ते जास्त वाटले तरी दिलेच पाहिजे.
त्यावर मी काही गोष्टी रिक्षावाल्याला तसेच इतरांनाही समजावून सांगितल्या.
  1. रिक्षा वाल्याने मी रिक्षात बसल्यावर लगेच मीटर चालु करून रिक्षा इच्छित स्थळी न्यायला हवी.
  2. मला तोंडी भाडे सांगणे हे पुर्णत: बेकायदेशीर आहे. त्यामुळे ते भाडे त्याने मला अगोदर सांगितले असले तरी माझ्यावर बंधनकारक ठरत नाही.
  3. मी रिक्षाने केलेला प्रवास १.६ कि.मी. असुन जर मीटर चालु केले असते तर त्यावर दहा रुपये भाडे दाखवले गेले असते. (त्या काळातील दराप्रमाणे). तेव्हा मी दिलेले भाडे बरोबरच आहे.
  4. या सर्व गोष्टी पटत नसतील रिक्षावाल्याने पुन्हा एकदा मीटर टाकून तोच प्रवास करुन खात्री करुन घ्यावी तसेच इतर नियमांचीही शहानिशा पोलीस ठाण्यात जाऊन करून घ्यावी.
रिक्षावाला या कुठल्याच गोष्टीसाठी तयार झाला नाही. तो मला म्हणाला,"आता मला १५ रुपये द्या. मग माझा नंबर लिहुन घ्या आणि हवी तर माझी तक्रार पोलिसात करा." त्यावर मी त्याला म्हणालो,"तुम्ही काय मला पावती देणार आहात काय? मग तुम्हीच दहा रुपये घ्या आणि पाहिजे तर तुम्हीच माझी तक्रार करा."
 
ठाम
 
त्यावर त्याने बरीच वादावादी केली परंतू मी माझ्या निर्णयावर ठाम असल्यामूळे तो शेवटी दहा रुपये घेऊन गेला.
असाच प्रयोग मी त्यानंतरही चार वेळा केला. प्रत्येक वेळी थोडा फ़ार संघर्ष करावा लागला पण मी ठाम राहिलो.
शेवटच्या वेळी तर कहरच झाला. रात्रीचे दोन वाजले होते. मी मुंबईहून आलो होतो. निगडी ला उतरलो. रिक्षा धरली. रिक्षावाला म्हणाला, "वीस रुपये". मी म्हणालो,"ठीक आहे." नंतर आम्ही शंभर मीटरच पुढे गेलो असू तर त्याने एकाला रिक्षात घेतले आणि माझ्याशेजारी बसवले. तो त्याचा मित्रच होता आणि केवळ वेळ घालवण्याकरिता आमच्या बरोबर येत होता.
माझ्या घरापाशी आल्यावर उतरताना मी त्याला दहा रुपये दिले. तो आरडा ओरडा करु लागला. मी त्याला म्हंटले,"हे बघ मीटर ने दहा रुपये होतात. रात्री बारानंतर म्हणजे दीडपट म्हणुन पंधरा रुपये होतात. पण तु अजुन एक प्रवासी घेतला. मग भाडे विभागले जाऊन होते रुपये साडेसात. तर आता तू मला अडीच रुपये परत दे." हे ऐकून तो अजुनच चवताळला. आजुबाजुचे लोक जागे झाले. त्यातल्या एकाने पाचाची नोट काढली आणि रिक्षावाल्याला देऊ लागला. त्यावर मी त्या रिक्षावाल्याला ठणकावुन सांगितले,"हे बघ त्या नोटेला हात लावलास तर मी मारामारीला सुरुवात करीन आणि पहिल्यांदा तुला नाही तर तुझ्या या मित्राला चोपून काढीन. कारण मी इथे माझे घर आहे म्हणुन आलो तर तु रिक्षाचालक म्हणुन मला घेऊन आलास पण तुझा हा मित्र इथे का आला याचे पटण्यासारखे काहीच उत्तर त्याच्याकडे नाही त्यामुळे मी त्याला मारले तरी तो पोलिसांना माझी तक्रार करु शकणार नाही." एवढे बोलून मी त्या मित्रापाशी सरकलो. तर तो घाबरुन पळून गेला आणि त्याच्यामागोमाग तो रिक्षावालाही. (कारण रिक्षा शेअर करण्यासाठी प्रथम बसलेल्या प्रवाशाची परवानगी आवश्यक असते जी या रिक्षाचालकाने घेतली नव्हती.)
अशा प्रकारे मी ठाम भुमिका घेऊन माझ्यापुरते तरी या नाठाळ रिक्षाचालकांना नमविले. परंतू आमच्या शेजारच्या नागरिकांच्या बचावात्मक पवित्र्यामुळे मी आता असले प्रकार सोडून दिले आहेत. आता मी माझ्या घरातून माझी दुचाकी घेऊन निघतो आणि ती निगडीच्या वाहन तळावर पाच रुपये देऊन उभी करतो. पिंपरी-चिंचवड शहरात आता मी रिक्षातुन प्रवास करीतच नाही.
 
इतर प्रकारांनीही त्रास
 
अर्थात रिक्षातून प्रवास केला नाही म्हणजे रिक्षावाल्यांचा त्रास संपला असे नाही. त्यांचे त्रास देण्याचे इतरही प्रकार असतात.
  1. आपण बसथांब्यावर उभे असतो आणि बस आपल्या समोर थांबते तेव्हा ते आपल्या आणि बसच्या मध्ये अशा प्रकारे येऊन थांबतात की आपल्या बसमध्ये चढता येऊ नये.
  2. चुकीच्या दिशेने रिक्षा आपल्या दुचाकी वर घालणे.
  3. चौकात सिग्नल हिरवा असतानाही थांबून प्रवासी भरणे व मागच्या वाहनांची गैरसोय करणे.
  4. स्वत:ला डावीकडे वळायचे नसुनही वळणावर डावीकडे थांबून प्रवासी भरणे व डावीकडे वळणा-या वाहनचालकांची गैरसोय करणे.
  5. अधिकृत रिक्षाथांब्यांशिवाय इतरत्र रिक्शा उभी करुन रस्त्यावर अतिक्रमण करणे आणि इतर नागरिकांची गैरसोय करणे.
याचा बंदोबस्त कसा करावा याच विचारात सध्या मी आहे.


महिमा अंगठीचा

पूर्वप्रसिद्धी :- मोगरा फुलला ई-दीपावली वार्षिकांक २०१०

मला ओळखणार्‍या मंडळींना लेखाचे शीर्षक वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असणार.  म्हणजे मी काही कोणी फार प्रसिद्ध व्यक्ति आहे आणि अनेक लोक मला ओळखतात असा काही माझा दावा नाही पण माझ्या वर्तूळातले जे काही थोडे फार (किंवा खरं तर फार थोडे) लोक  मला ओळखतात, माझे विचार जाणून आहेत त्या सर्वांना हे चांगलेच ठाऊक आहे की मी नास्तिक आहे.  त्यामुळे अंगठीच्या वापराने भाग्य उजळेल असं तर मी निश्चितच सांगणार नाहीय. 
त्याशिवाय दागिन्यांच्या वापराला देखील माझा नेहमीच विरोध असतो व तो मी वेळोवेळी खासगीत तसेच जाहीरपणेदेखील प्रदर्शित केलाय.  त्यातही सुरूवातीला माझा शरीराला छेद पाडून वापरल्या जाणार्‍या दागिन्यांना जास्त विरोध होता; पण एका घटनेने माझा अंगठीच्या वापराला असलेला विरोध देखील तितकाच तीव्र झाला.  १९९८ साली माझ्या एका शेजार्‍याला घेऊन मी इस्पितळात गेलो असता तिथे टेल्को चा एक अभियंता उपचाराकरिता आलेला मला दिसला.  त्याच्या हाताच्या बोटांवर अवजड वस्तू पडून गंभीर दुखापत झाली होती.  डॊक्टरांना पुढील उपचार / क्ष-किरण तपासणी या करिता त्याच्या बोटात असलेली अंगठी काढणे गरजेचे होते पण बोटात ज्या भागावर अंगठी होती त्याच्या पुढच्या भागावरच गंभीर जखम झाली होती.  आता ती घट्ट बसलेली अंगठी (अंगठी सर्वसाधारणपणे घट्ट बसणारीच असते अन्यथा ती कधीही बोटातून निसटून पडू शकते) काढायची तर त्या दुखापत झालेल्या भागाला घासूनच काढावी लागणार म्हणजे पुन्हा असह्य वेदनांना सामोरे जाणे आले.  शेवटी तिथली परिचारिका म्हणाली, “अब तो काट ही डालनी पडेगी.”  मी घाबरून विचारले, “तो क्या अब आप इनकी उंगली काट डालेंगे?”  तेव्हा माझ्या कडे आश्चर्याने पाहत ती उत्तरली, “नही, उंगली नही इनकी अंगुठी काट देंगे.”  पण बोट कापणे ज्यांना शक्य आहे असे इस्पितळातले विशारदही अंगठी कापू शकत नाहीत, त्याकरिता मग दागिन्याच्या दुकानातून कारागिरास पाचारण करण्यात आले आणि त्या रूग्णाच्या पुढील उपचारांना अजूनच विलंब झाला.   त्यानंतर माझ्या डोक्यात अंगठी चा वापर एकदम निषिद्ध हा विचार पक्का रूजला.
मग आता लेखाचे शीर्षक अशा पद्धतीने देण्याचे मला कारण तरी काय असा प्रश्न वाचकांना नक्कीच पडला असेल तर त्याचे स्पष्टीकरण असे की लेखाच्या शीर्षकात वापरलेला अंगठी हा शब्द प्रतीकात्मक आहे.  आपल्या सर्वांना अल्लाउद्दीन आणि त्याच्या जादुई दिव्याची गोष्ट ठाऊक असेलच.  या गोष्टीतील हा जादुई दिवा मूळात अल्लाउद्दीनच्या मालकीचा नसतो तर त्याचा काका म्हणवून घेणारा एक जण (जो या कथेचा खलनायक आहे) त्याला आपल्या सोबत घेऊन जातो आणि एका अंधार्‍या तळघरातून मोठा धोका पत्करून हा दिवा शोधून आणण्याचे काम अल्लाउद्दीनवर सोपवितो.  अल्लाउद्दीनला या कार्यासाठी तळघरात पाठविण्यापुर्वी हा त्याचा तथाकथित काका त्याच्या बोटात एक अंगठी चढवतो.  ह्या अंगठीत देखील दिव्याप्रमाणेच घासल्यावर आज्ञाधारक राक्षसाला प्रकट करण्याचा गुण असतो.   फक्त दिव्याच्या तूलनेत या अंगठीच्या राक्षसाच्या काही मर्यादा असतात व क्षमता कमी असते.  ही अंगठी अल्लाउद्दीनला तात्पुरत्या स्वरूपात तळघरातील मोहिमेत काही अडचण आल्यास मदतीकरिता दिली गेलेली असते.  नंतर जेव्हा अल्लाउद्दीन दिवा मिळवितो तेव्हा हा काका म्हणविणारा इसम लबाड असल्याचे त्याला कळते व तो दिवा त्याला द्यायचे नाकारतो आणि स्वत:साठीच त्या दिव्याचा वापर करतो.  मालकाच्या इच्छापूर्तीबाबत दिव्याच्या राक्षसाची क्षमता प्रचंड असल्यामुळे पुढे दिव्याचाच वापर मोठ्या प्रमाणात केला गेल्याचा कथेत उल्लेख येत राहतो.  त्यासोबतच खलनायकाचे दिवा स्वत:च्या ताब्यात घेण्यासाठी केले गेलेले प्रयत्न आणि नायकाने खलनायकापासून दिव्याची केलेली जपणूक या बाबीही कथानकाच्या प्रवासात पुढे वाचकांच्या समोर येत राहतात. 
पुढे एका प्रसंगी खलनायक अल्लाउद्दीनचा हा जादुई दिवा स्वत:च्या ताब्यात घेण्यात यशस्वी होतो. आता अल्लाउद्दीनचे कसे होणार या काळजीत पडलेला वाचकदेखील नायक व खलनायकासोबत एव्हाना अंगठीला विसरलेला असला तरी लेखक मात्र तिला ध्यानात ठेवून असतो आणि ही योग्य संधी साधून पुन्हा ती लोकांच्या नजरेत आणून देतो.  त्याचे असे होते की, दिवा नाहीसा झाल्यामुळे हताश झालेला अल्लाउद्दीन हातावर हात चोळत बसलेला असतो तेव्हा त्याच्याकडून नकळत बोटातील अंगठी घासली जाऊन त्यातून राक्षस प्रकट होतो.  अल्लाउद्दीनला कळतच नाही की दिवा हरवला असला तरी आता राक्षस कुठून आला ते.  मग राक्षस त्याला आपण अंगठीच्या मालकाचे गुलाम असल्याचे सांगतो.  तेव्हा अल्लाउद्दीन त्याला प्रथम दिवा आणून देण्यास फर्मावतो.  राक्षस त्याला दिव्याची ताकद अंगठीहून मोठी असल्याने तसे शक्य नसल्याचे समजावतो पण त्याचसोबत इतर लहान मोठी मदत करण्याचे आश्वासन देतो.  पुढे ह्या अंगठीच्या राक्षसाचे मर्यादित सहकार्य आणि अल्लाउद्दीनचे बुद्धिचातुर्य ह्या दोहोंच्या एकत्रित प्रयत्नांना यश मिळून दिवा पुन्हा अल्लाउद्दीन च्या ताब्यात येतो.  या कथेत अंगठी दिव्यापेक्षा कमी क्षमतेची असल्याचे दाखविली गेले असले तरी दिवा पुन्हा मिळविण्यासाठी या अंगठीची मदत मोलाची ठरल्याचे वाचकांच्या लक्षात येते.
या गोष्टीत उल्लेख केलेल्या अंगठीसारखी किमान एक तरी अंगठी आपल्यापैकी प्रत्येकाकडे असते आणि ती म्हणजे आपल्यापाशी असलेले दुय्यम कौशल्य.  एक मुख्य कौशल्य आपल्याकडे असते ज्याच्या बळावर आपण आपला चरितार्थ चालवित असतो जसे डॊक्टर, इंजिनीयर, वकील, इत्यादी.  त्याशिवाय आपणापाशी अजुनही एखादे कौशल्य असू शकते की ज्याचा आपण व्यावसायिक वापर करीत नसलो तरी तो आपला छंद असू शकतो जसे गायन, वादन, लेखन, चित्ररेखाटन, इत्यादी.  अल्लाउद्दीनचा दिवा त्याच्या ताब्यातून नाहीसा झाला तसे पुढे आयुष्यात काही कारणाने आपल्याला आपल्या मुख्य कौशल्यास बाजूला ठेवावे लागले (म्हणजे पगारदारांना सक्तीची/स्वेच्छा निवृत्ती आणि व्यावसायिकांना अपयश इत्यादींमुळे) तरी आपले हे दुय्यम कौशल्य अल्लाउद्दीनच्या गोष्टीतील अंगठीप्रमाणे आपल्या मदतीला धावून येऊ शकते आणि उत्पन्नाचे साधन देखील ठरू शकते.  क्वचित प्रसंगी आपल्या मूळ व्यावसायिक कौशल्यापेक्षा ह्या छंदामुळेच आपल्याला जास्त पैसा, प्रसिद्धी व समाधान मिळू शकते. 
देशातील सर्वात मोठे महाकाव्य समजले जाणार्‍या महाभारतात देखील पांडवांना जेव्हा बारा वर्षे वनवास व एक वर्ष विजनवास भोगावा लागला तेव्हा पांडवांनी आपल्या दुय्यम कौशल्यांच्या जोरावर ते एक वर्ष विराट राजाच्या पदरी व्यतीत केले.  गदायुद्धात प्रवीण असलेला भीम त्याच्या भोजनप्रेमामुळेच चांगला आचारी देखील होता व बल्लवाच्या रूपात त्याने ते सिद्ध करून दाखविले तर सौंदर्यसम्राज्ञी द्रौपदी सौंदर्योपचारांविषयी ज्ञान असल्यामुळे त्या काळातील सुदेष्णा राणीची ब्युटीशिअन म्हणून सैरंध्री या नावाने यशस्वीपणे वावरली.  भालाफेकीत कुशल असलेल्या युधिष्ठिराने आपण शकुनीच्या कपटामुळे हरलो असलो तरी द्युतातील कौशल्य अंगी असल्याचे दाखवून दिले आणि  धनुर्धारी अर्जुनाने नृत्याच्या स्टेप्समध्येही आपला नेम चूकत नसल्याचेच राजकुमारी उत्तरेचा नृत्य शिक्षक म्हणून वावरताना बृहन्नडेच्या रूपात सिद्ध केले. 
पौराणिक कथांना बाजुला ठेवले तरी चालु काळातही मोहन आगाशे, गिरीश ओक व श्रीराम लागू यांच्यासारख्या लोकांनी वैद्यकीय व्यवसायापेक्षाही अभिनयातून नेत्रदीपक यश कमावल्याचे आपणांस दिसून येते.  यापैकी श्रीराम लागू यांना तर ऎनासिनच्या जाहिरातीत काम केल्यामुळे वैद्यकीय व्यवसायापासून त्यांच्या संघटनेने वंचित केले आहे तरी त्यांच्या चरितार्थावर यामुळे फरक पडलाच नाही.  सलील अंकोला ह्या क्रिकेटपटूला त्याच्या दुखापतीमुळे खेळापासून मुकावे लागले तरी त्याने अभिनयाद्वारे दूरदर्शनमालिकांमध्ये स्वत:चे बस्तान बसविले.  बॆरिस्टर जीना व जवाहरलाल नेहरू हे राजकारणाइतकेच वकिलीत देखील यशस्वी ठरले.   हल्लीचे अनेक राजकारणी सुद्धा वकिली व्यवसायातील पदवीधर असतात.
कधी कधी तर एखाद्या व्यक्तिकडे इतकी कौशल्ये असतात आणि सगळीच इतकी महत्वाची असतात की कशाला दुय्यम म्हणावे हा प्रश्नच पडतो.  गायक / अभिनेता म्हणून परिचित असलेले स्व. श्री. किशोरकुमार हे तितकेच उत्तम गीतकार, संगीतकार, लेखक व दिग्दर्शकही होते.  अतिशय यशस्वी शास्त्रज्ञ असलेले डॊ. ए.पी.जे अब्दुल कलाम जगभर ओळखले गेले ते भारताचे राष्ट्रपती झाल्यावर.  त्या पदावरून निवृत्त झाल्यावरही त्यांनी आपली ओळख एक विद्वान प्राध्यापकाच्या रूपात जगापुढे ठेवलीय.  ह्या लोकांपाशी एकाहून अधिक अंगठ्या असल्यामुळे ह्यांना आयुष्यात कधीही ’पुढे काय?’ अशी विवंचना सतावणार नाही हे नक्की.  आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी ह्या प्रतीकात्मक अंगठीचा एवढा महिमा जाणून घेतल्यावर निदान एकतरी अंगठी बाळगायला (खरं म्हणजे ओळखायला कारण आपल्याकडे ती असतेच पण आपण तिच्याकडे लक्ष देत नाही) हवीच, कोणास ठाऊक दिवा कधी हातातून निसटेल तेव्हा हातावर हात चोळत बसायची वेळ आलीच तर बोटात घट्ट बसलेली अंगठीच मदतीला धावून येईल ना?

चेतनची शोकांतिका

एखाद्या व्यक्तिचे विचार, त्याचे महात्म्य जगाला कळतच नाही.  सॊक्रेटीसला त्याच्याच समाजातील विद्वान ओळखू शकले नाहीत, ज्ञानेश्वर आदी भावंडांचे मोठेपण तर त्यांच्या जन्मगावातील लोकांनाच कळले नाही.  गांधींच्या लाखोंच्या संख्येने असणार्‍या भक्तांनासुद्धा गांधीजी कळलेच नाहीत (गांधींच्या शरीराचा खून नथूराम ने केला हे खरे असले तरी गांधींचा वैचारिक खून त्यांचे अनुयायी म्हणवणार्‍यांनीच केला, अन्यथा गांधींच्या तत्वाला हे तथाकथित अनुयायी जागले असते तर त्यांनी प्रतिक्रियेदाखल पुण्यात शेकडो ब्राह्मणांची घरे जाळलीच नसती).
असो, कित्येकदा व्यक्तिचे मोठेपण जगाला, समाजाला, दूरच्या मंडळींना कळले नाही तर ते आपण समजू शकतो पण त्या व्यक्तिच्या अगदी जवळच्या मंडळींना, त्यांच्या कुटुंबीयांना समजले नाही तर आपणांस आश्चर्य वाटते.
पण माझ्या आश्चर्याचा कडेलोट झाला जेव्हा माझ्या निदर्शनास आले की एक अतिशय महान कलाकृती बनविली गेली आणि काही काळाने तिचे मोठेपण तिचे रचनाकारच विसरून गेले.  इतकेच नव्हे तर या कलाकृतीवर पुन्हा आपल्या क्षुद्रपणाचे कलम करून तिला सामान्यांहूनही खालच्या पातळीवर आणून बसविले. ही खरंच धक्कादायक गोष्ट आहे कारण कलाकृती ही निर्जीव तर तिचे निर्माते सजीव असल्याने ते नि:संशय त्या कलाकृतीहून उच्च पातळीवरच असले पाहिजे पण हे उदाहरण या संकल्पनेला अपवाद ठरते.
१९८४ साली केरळच्या नवोदय स्टुडिओने निर्माता अप्पचन यांचा जिजो दिग्दर्शित माय डिअर कुट्टी चेतन हा मल्याळम भाषेतील चित्रपट हिंदीत छोटा चेतन या नावाने प्रदर्शित केला तेव्हा हा चित्रपट पाहण्याची मला अतिशय उत्सुकता निर्माण झाली कारण एकतर हा या दोन्ही भाषांमधीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिलावाहिला थ्री-डी (थ्री डायमेन्शनल अर्थात त्रिमितीय) चित्रपट होता.  दुसरे कारण माझ्यासाठी अतिशय व्यक्तिगत स्वरूपाचे होते ते म्हणजे इतके हिंदी चित्रपट आतापर्यंत पाहण्यात आले असले तरी त्यापैकी कुठल्याच चित्रपटात नायकाचे नाव चेतन नव्हते.  (खरे म्हणजे विनोदवीर असरानीने राजेश खन्नाच्या अजनबी चित्रपटात रंगविलेल्या गंभीर पात्राखेरीज त्यापूर्वीच्या इतर कुठल्याही चित्रपटात कुठल्याही पात्राचे नाव चेतन नव्हते).  तेव्हा हा चित्रपट पाहणे हे माझ्या दृष्टीने अगदी ’मस्ट’ होते.  बरे चित्रपट खास लहान मुलांसाठीचा असल्याने बघायला ’सेफ’ असणारच या विचाराने घरच्यांचीही काहीच आडकाठी नव्हती. 
तेव्हा आम्ही सहकुटुंब २४ किमी चा प्रवास करून पुण्यातील तेव्हाच्या अतिशय प्रसिद्ध अशा मंगला चित्रपटगृहापाशी आलो.  दारावरच हाउसफुल्ल चा बोर्ड झळकत होता.  काळ्याबाजारात चढ्या भावाने तिकीटे मिळत होती पण ती घ्यायला वडिलांचा सक्त विरोध होता. उलट त्या जास्तीच्या पैशात आपण छानपैकी हॊटेलात नाष्टा करू असे अमिष आम्हाला वडिलांनी दाखविले.  मग तीनच्या ऐवजी सहाच्या खेळाची तिकीटे विकत घेण्यात आली आणि पुढच्या तीन तासांसाठी वडिलांनी आम्हाला पुणे फिरवून आणले.  त्याकाळी आम्ही निगडीहून पुणे मनपापर्यंत पीएमटी बसने येत असू.  तेथून पुढे पुणे शहरात फिरण्यासाठी बसची चैन आम्हाला परवडण्यासारखी नसल्याने शहरांतील पेठांमध्ये सहा - आठ किमी ची आमची भटकंती पायीच ठरलेली असे. आजच्या काळात सामान्य समजला जाणारा तीन आसनी रिक्षा किंवा वातानुकूलित खासगी चारचाकी वाहनांतून प्रवास या बाबी तर आमच्या मेंदुच्या विचारकक्षेच्या पलीकडच्या होत्या. 
तेव्हा अशी भरपूर पायपीट केल्यावर एका बर्‍यापैकी हॊटेलात इडली, डोसा, वडा सांबार इत्यादी हादडून आम्ही पुन्हा सायंकाळी सहाच्या खेळाला चित्रपटगृहात हजर झालो तर तिथे पडद्यावर आमच्या स्वागताला अमिताभ बच्चन, जितेंद्र अशी मोठी कलावंत मंडळी दिसू लागली.  हे माननीय चित्रपटात काम करणारे नसून चित्रपट बघण्यासाठी मिळणारा चष्मा वापरण्याच्या सूचना देण्याकरिता आले होते.  त्यांच्या सांगण्याचा मुख्य सूर असा होता की चित्रपट ह्या चष्म्यामुळे थ्रीडी (अंगावर आल्यासारखा) दिसणार असला तरी ती केवळ चष्म्याची एकट्याची करामत नसून चित्रपटाच्या निर्मितीत देखील काही खास तंत्र वापरले गेले आहे.  तेव्हा हा चष्मा लावून इतर कुठलाही चित्रपट किंवा टीवीवरील कार्यक्रम ३डी दिसू शकणार नाहीत.  सबब प्रेक्षकांनी हे चष्मे चित्रपट संपल्यावर चित्रपटगृहात परत करावेत, ढापून (तरी अनेकांनी ते ढापलेच.  बाय द वे, चष्म्याला ढापण हा शब्द तेव्हाच प्रचलित झाला की काय? हे बाय द वे नसून बाय द अवे म्हणजे विषयांतर झाले म्हणायचे. असो.) घरी नेऊ नये त्याचा त्यांना काहीच फायदा होणार नाही.  साधारण दहा पंधरा मिनीटे हे व्याख्यान ऐकल्यावर एकदाचा चित्रपट सुरू झाला. 
एकतर आम्ही जो खेळ पाहायला आलो होतो, त्यानंतरचा खेळ पाहात होतो, शिवाय मधल्या तीन तासात बरीच दमणूक आणि खाणे झाले होते त्यामुळे माझा धाकटा भाऊ दमुन झोपी गेला, तर आईचे डोके प्रचंड दुखू लागल्याने तिचे चित्रपटात मन रमू शकले नाही.  मी आणि वडिलांनीच चित्रपट लक्षपुर्वक बघितला (आमच्या दोघांचा ह्या बाबतीतला स्टॆमिना प्रचंडच आहे कारण चित्रपट संपल्यानंतर उशिरा घरी परतल्यावरही आम्ही दोघांनी रात्री ११:३० पर्यंत जागून पुन्हा टीवी देखील बघितल्याचे मला स्पष्ट आठवते).  चित्रपटात ३डी दृश्ये केव्हा आहेत ते माझ्या वडिलांना कसे काय कोण जाणे पण अगोदरच समजत होते वाटते कारण ते मला तसे आधी सांगत आणि नंतर मला ती वस्तू (उदा. ज्वाला, खेळण्यातील हेलिकॊप्टर, तरंगणारी दारूची बाटली इत्यादी) अंगावर येताना दिसे.  त्यावेळी माझ्या चिकित्सक बुद्धीने मी त्याचे कारण शोधून काढले ते असे की - चित्रपटगृहात लहानांना काळ्या फ्रेमचा तर मोठ्यांना हिरव्या फ्रेमचा असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे देण्यात आले होते.  मोठ्यांच्या चष्म्यात बहुधा ३डी दृश्य अगोदर दिसत असावे.  पण आता मला कळून चुकलेय की त्यांची चित्रपट बघण्याची कारकीर्द प्रदीर्घ असल्यानेच त्यांना पुढच्या दृश्यांचा अंदाज येत होता.  असो, तर चित्रपट मला एकुणच प्रचंड आवडला.  चेतन हा त्यातला नायक, त्यातील वाईट पात्रांची जबर फजिती करतो आणि त्यासोबत ३ डी दृश्यांच्या साहाय्याने प्रेक्षकांची पुरेपुर करमणूकही.  पण त्यातील काही बाबी खटकल्या देखील.  त्यातील पहिली म्हणजे चेतन पुर्ण चित्रपटात धोतर नेसून वावरतो (म्हणजे नुसतेच धोतर, वरती काहीच नाही - पुर्ण उघडाबंब).  दुसरे म्हणजे तो एका जादुगाराला घाबरत असतो.  चेतनने असे कपडे घालावे आणि मुख्य म्हणजे कुणाला सतत घाबरावे हे काही मला आवडले नाही आणि शिवाय माझ्या त्यावेळच्या आकलनशक्तीच्या मर्यादांमुळे मला हा चित्रपट पुर्णत: समजलाच नाही.
पुढे काही वर्षांतच हा चित्रपट एका दुपारी टीवीवर झळकला तेव्हा शाळेतील माझ्या सहाध्यायींनी वर्गातले तास बुडवून चित्रपटाकरिता शाळेतून घरी पळ काढला.  मला मात्र आता पुन्हा चित्रपट पाहण्यात रस नव्हता.  कारण हा चित्रपट आमच्या टीवीवर ३डी स्वरूपात दिसणार नव्हता.  त्यावेळच्या माझ्या माहितीनुसार असा चित्रपट फक्त निकी-ताशा ह्या राज कपूर यांच्या कन्येने बनविलेल्या टीवीवरच ३डी स्वरूपात दिसू शकणार होता.  आम्ही तेव्हा नुकताच वीडीओकॊनचा रंगीत टीवी आठ हजार रूपयांना विकत घेतला होता तर निकी-ताशा ची त्यावेळची किंमत वीस हजार रूपये होती.  त्याचप्रमाणे चित्रपट बनल्यावर जर तो काही वर्षांतच टीवीवर दाखवला गेला तर तो एक अयशस्वी चित्रपट समजला जात असे (पण छोटा चेतन बाबत खरी हकीगत [जी मला नंतर कळली] अशी होती की तो सीएफएसआय - चिल्ड्रेन फिल्म सोसायटी ऒफ ईंडियाने विकत घेऊन खास बालदिनाच्या निमित्ताने दूरदर्शनवरून प्रसारित केला होता).
पुढे माझे शिक्षण संपवून मी नोकरीला लागलो.  त्यानंतर १९९८ साली पुन्हा एकदा छोटा चेतन चित्रपटगृहात झळकला, पण तेव्हाही हा चित्रपट पुन्हा पाहावा असे मला वाटले नाही.  २००७ साली आमच्या घरी बंधूंच्या कृपेने टाटा स्कायची स्थापना झाली आणि विविध वाहिन्यांवर अनेक चित्रपटांचा रतीबच सुरू झाला.  अर्थात चित्रपटांसोबत जाहिरातीही आल्याच त्यामुळे एक चित्रपट बघत असताना जाहिराती चालु झाल्या की जरा वेळ आम्ही दुसरा चित्रपट बघु लागलो मग भले तो आधी बघितला असला तरीही (कारण जाहिराती बघायच्या नाहीत असे ठरविले होते).  असे करता अचानक एके दिवशी सहजच छोटा चेतनचा काही भाग बघण्यात आला आणि आश्चर्याचा धक्काच बसला.  हा चित्रपट ३डी स्वरूपात दिसत नसला म्हणजे चित्र समोर येत नसले तरी देखील ह्या चित्रपटाला अजुनही एक तिसरी मिती आहे ह्याचा मला साक्षात्कार झाला (ती कोणती ते पुढे कळेलच).  आता काही केल्या हा चित्रपट पुन्हा पुर्णपणे बघायचाच असे ठरविले आणि नेमका आता तो कुठल्याही वाहिनीवर प्रदर्शित होईनासा झाला.
मग मोठ्या प्रयत्नांनी त्याची डीवीडी मिळविली आणि एकदाचा २००९ साली तो पुन्हा (म्हणजे २५ वर्षानंतर) संपुर्ण बघण्याचा योग आला.  यावेळेस थ्रीडी करामती नसतानाही चित्रपटाने पहिल्यापेक्षाही अनेक पटींनी अधिक आनंद दिला.   मुख्य म्हणजे माझे वय पंचवीस वर्षांनी वाढले होते त्यामुळे साहजिकच आकलनशक्तीचाही विकास झाला होता.  दुसरे असे की, चित्रपटगृहात एखादा संवाद नीट ऐकू आला नाही तर कथा समजायला थोडेसे अवघड होते पण डीवीडी आपल्या नियंत्रणात असल्यामुळे पॊझ / रिवर्सचा योग्य तो वापर करून चित्रपट १०० टक्के बघितला / ऐकला जातो.   तर आता या चित्रपटाची तिसरी मिती जी मला जाणवली ती म्हणजे तिची खोली.  चित्रपटाच्या ३ डी परिणामांकडेच लक्ष केंद्रित झाल्यामुळे या चित्रपटाच्या उत्कृष्ट कथेची म्हणावी तशी चर्चा कधीच झाली नव्हती.  बहुधा या चित्रपटाचा टारगेटेड ऒडियन्स जो आहे त्यांच्या वयाला कळायला अवघड असल्यामुळे आणि इतरांनी त्यात रस न घेतल्यामुळे असे झाले असावे.
चित्रपटाच्या सुरूवातीलाच आपल्याला कळते की एक इमारत चेतनच्या प्रभावाखाली आहे आणि चेतन विषयी आजुबाजूला चांगले बोलले जात नाही.  लोकांच्या मते तो एक दुष्टात्मा आहे.  परंतू या चित्रपटातील प्रमुख पात्रे असणारी तीन मुले ज्यापैकी एका मुलीचे वडील (दलीप ताहील) पत्नीविरहामुळे एकाकी होऊन व्यसनाधीन झाले आहेत, तेच फक्त या चेतन विषयी चांगले बोलतात.  जेव्हा ती मुलगी चेतन कसा असेल असे वडिलांना विचारते तेव्हा ते म्हणतात की तो नक्कीच चांगला असेल मग ते धोतर नेसलेल्या एका लहान मुलाचे चित्र काढून तिला देतात आणि सांगतात की तो असा दिसत असणार.
वर्गातल्या इतर मुलांचा, गुरूजींचा होणारा त्रास, वडिलांचे व्यसन अशा विविध समस्यांनी त्रस्त झालेली ही तीन मुले चेतन चांगल्या स्वभावाचा आणि चित्रातील लहान मुलाप्रमाणे गोड दिसत असेल या कल्पनेवर विश्वास ठेऊन त्याच्या इमारतीत जातात.  तिथे त्यांना चेतन दिसत नाहीच तर फक्त त्याचा आवाज (अनंत महादेवन) ऐकू येतो.  ती मुले त्याला विचारतात की बाबारे तू कसा दिसतोस? तर तो (चेतन) उत्तरतो की मला कुठलेही ठराविक रूप नाही, माझे काही ठराविक असे वय नाही.  आता मुलांना त्याचे बोलणे कळतच नाही.  त्यांचे एकच मागणे असते की चेतनने त्यांना मदत करायला हवी आणि मदत करण्यासाठी चेतनला त्यांच्या समोर येणे भाग असते.  आता त्याला रूपच नाही तर तो समोर तरी कसा येणार? (इथे मला निर्गूण / निराकार परमेश्वर कल्पनेचा भास झाला आणि चित्रपटाला एक वेगळीच उंची प्राप्त झाल्यासारखे वाटले) मग चेतन जी रुपे (साप इत्यादी) घेऊन मुलांच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मुले अधिकच घाबरतात.  मग शेवटी चेतन त्यांना विचारतो की मी असे कोणते रूप घेऊ ज्याने तुम्हाला माझी भीती वाटणार नाही? तेव्हा ती छोटी मुलगी वडिलांनी काढलेले चित्र पुढे करते. त्यानंतर एका मोठ्या अंड्यासदृश वस्तूला भेदुन, हवेत कागदाचे कपटे उडवित चित्रपटाचा नायक हा छोटा मुलगा - चेतन अवतीर्ण होतो. 
पुढे ह्या चेतन कडे असलेल्या जादुई शक्तींचा वापर करून तो या तीन मुलांना त्रास देणार्‍या व्यक्तिंचा बंदोबस्त करतो, ज्यात एक श्रीमंत विद्यार्थी, शाळेतले गुरूजी यांचा समावेश आहे.  चेतन कॆब्रे, दारू सारख्या लोकांना बिघडविणार्‍या गोष्टींचेही उच्चाटन करतो. अर्थात, त्याला स्वत:लाच दारू पिण्याचे प्रचंड व्यसन असते पण आपल्या छोट्या मैत्रिणीला ते आवडत नाही हे पाहून तो दारूचा ’त्याग’ करतो.
मुलांच्या जीवनात आनंद निर्माण करणार्‍या या चेतन ची एक वेगळीच समस्या असते.  एका दुष्ट जादुगाराला चेतनच्या कडे असणारे शक्तीच्या मदतीने दुष्कृत्ये करायची असतात.  त्यामुळे चेतन या जादुगारापासून लांब पळत असतो.  खरे तर चेतन या जादुगाराला सहज ठार करू शकत असतो पण तो तसे करीत नाही कारण जादुगाराने एक असे वरदान मिळविलेले असते की ज्यायोगे चेतनने जर जादुगाराला ठार मारले तर स्वत: चेतन देखील त्यानंतर संपून जाईल.  त्यामुळे जादुगार चेतनला स्वत:ला मारण्याचे खुले आव्हान देत असतो आणि चेतन त्याच्यापुढे हतबल ठरत असतो.
जादुगाराला चेतनची या तीन मुलांसोबत असलेली जवळीक समजते.  तिचा फायदा करून घेण्याच्या उद्देशाने जादुगार त्यातील लहान मुलीला ओलीस ठेवतो आणि त्या बदल्यात चेतनला स्वत:च्या स्वाधीन होण्यास सांगतो.  आता चेतनपुढे स्वत:चा जीव वाचविण्याकरिता दोनच पर्याय असतात - एकतर जादुगाराचे ऐकून स्वत:ला त्याच्या स्वाधीन करणे, किंवा मग त्या छोट्या मुलीला जादुगाराच्या ताब्यात तसेच सोडून स्वत: सुखरूप निघून जाणे; परंतू आपल्या छोट्या मैत्रिणीचा जीव वाचविण्याकरिता तो जादुगाराला ठार मारण्याचा तिसरा पर्याय स्वीकारतो, ज्याची किंमत त्याला स्वत:चा अवतार संपवून चुकती करावी लागते. 
अशा प्रकारे हा चित्रपट मानव व अमानवी शक्तीच्या एका अनोख्या मैत्रीची आणि मैत्रीखातर केलेल्या परमोच्च बलिदानाची कथा प्रेक्षकांपुढे सादर करतो.  १९८४ साली ज्यांनी ही शोकांतिका बनविली त्यांनीच पुढे १४ वर्षांनी या चित्रपटाचीच शोकांतिका करून टाकली.  खरे तर आपल्या चित्रपटात वापरलेल्या ३डी तंत्रापेक्षाही त्याची दर्जेदार कथा हेच त्याचे  मोठे बलस्थान आहे हे त्यांना कळायला हवे होते.  पण ते त्यांना कळले नाही की प्रेक्षकांच्या अभिरूची विषयी त्यांना तितकासा विश्वास वाटला नाही कोण जाणे? कारण १९८४ मध्ये जो चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला तो १९९८ मध्ये प्रेक्षकांसमोर आणताना त्यावर उर्मिला मातोंडकरचे कलम केले.  उर्मिला त्याकाळी रंगीला आदी चित्रपटांमुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत होती.  तिच्या प्रतिमेचा चित्रपटाच्या यशाकरिता वापर करण्याकरिता मूळ चित्रपटात नसलेली एक भूमिका कोंबून त्यात बळेच उर्मिलाला सादर करण्यात आले.  तिच्याकरिता इतके फूटेज खर्चण्यात आले की त्यामुळे चेतनचे चित्रपटातील स्थान दुय्यम झाले.  १९९८ सालच्या पोस्टर्सवर देखील उर्मिलाची छबी मोठ्या आकारात तर चेतन आणि त्याचे मित्र कोपर्‍यात कुठेतरी लहानशा जागेत दाखविण्यात आले. 
अनेकदा जुनी चांगली गाणी रिमिक्स स्वरूपात विडंबन होऊन आपल्या समोर येतात तर कधी डॊनचे शाहरूखने केलेले विडंबन, वर्मांची आग किंवा हिमेशने कर्जचे केलेले विडंबन पाहण्याचे दुर्दैव प्रेक्षकांच्या वाट्याला येते.  पण निर्मात्यांनी स्वत:च्याच निर्मितीचे असे वाटोळे केलेली शोकांतिका निदान मला तरी फार दुखवून गेली.