का ल द र्श क

Friday 9 January 2015

स्मरण विसंगती

काही काळापूर्वी एका आस्थापनेत प्रशिक्षण देण्याकरिता गेलो होतो.  प्रशिक्षणाचा विषय होता - समस्या सोडविण्याची तंत्रे (Problem Solving Techniques).  समोर बसलेल्या प्रशिक्षणार्थींना मी समस्या सोडविण्याचं माझं नेहमीचं तंत्र सांगत होतो.  गुंतागुंतीची क्लिष्ट अशी काही समस्या नसतेच मुळी.  असा काही असतो तो आपला तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन.  जगाच्या दृष्टीने अतिशय गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या समस्या केवळ काही सोप्या कल्पना वापरून सोडविल्या जाऊ शकतात (Complex Problems can be solved using simple ideas).  खरे तर व्यवहारातील अनेक समस्या या आपण कुठलेही उपाय वापरण्याआधीच सुटलेल्या असतात.  आपण त्यांच्यापाशी अडखळलो तर मात्र त्या सुटता सुटत नाहीत.  जसे की, रस्त्यावर एखादा सहा इंच रुंद, सहा इंच खोल व रस्त्याच्या रुंदीइतका लांब असा खड्डा आहे.  आपण ताशी ८० किमी वेगाने वाहनातून त्या रस्त्यावरून जात असू आणि आपण तो खड्डा त्याच वेगात पार केला तर आपल्याला जाणवणार देखील नाही.  कारण खड्डा जिथे सुरू होतो व पुढे सहा इंचावर जिथे पुन्हा रस्ता सुरू होतो ते अंतर या ताशी किमी वेगाने जाताना चाकाला जाणवणार देखील नाही इतक्या तीव्रतेने पार होते.  पण आपण जर खड्डा पाहून आधीच आपले वाहन हळू केले आणि वेग ताशी ४० किमी पर्यंत कमी केला तर मात्र आपणाला हा खड्डा चांगलाच जाणवेल.  अशा वेळी खड्ड्याचा त्रास कमीत कमी व्हावा म्हणून आपल्याला वाहनाचा वेग अतिशय कमी (ताशी १५ किमी अथवा त्याहूनही कमी) करावा लागेल.  तरी देखील खड्डा जाणवणारच फक्त त्रास कमी होईल इतकेच.  त्यापेक्षा ८० किमी वेगाने चटकन निघून गेलेले कधीही जास्त सोयीस्कर नाही का? (अर्थात असा प्रयोग केवळ ६ इंच लांब व सहा इंच खोल किंवा त्यापेक्षा लहान खड्ड्यावरच करून पाहा.  गतिरोधकावर [Speed Breaker] नको हे सांगायला मी विसरलो नाही. )  हे म्हणजे १/१० सेकंदापेक्षाही कमी वेळ पाय टेकवत, चटका न बसता विस्तवावरून झरझर चालण्यासारखेच आहे.  त्याचप्रमाणे आपण आपल्या कृती वेगाने करीत गेलो तर लहानसहान समस्या जाणवत देखील नाहीत अशा पद्धतीने त्या सुटलेल्या असतात.  परंतु जर आपण बारीकसारीक गोष्टींचा विचार करीत बसलो तर मात्र समस्या जाणवतात आणि सोडवायलाही त्रास होतो.

प्रशिक्षणार्थींनी मला अशा प्रकारच्या व्यवहारातील एखाद्या समस्येचे उदाहरण मागितले.  हे उदाहरण मी अजून तासाभराने देईन असे मी त्यांना सांगितले. कदाचित प्रशिक्षणाच्या एक दिवसाच्या कालावधीत मी त्यांना उदाहरण देऊ शकलो नाही तर त्यांनी मला नंतर संपर्क साधावा, मी त्यांना उदाहरण पुन्हा कधीतरी देईन असेही सुचविले.  त्याकरिता मी सर्वांना माझे नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक देखील लिहून घेण्यास सुचविले.  प्रशिक्षणार्थींना ही बाब काहीशी विचित्र वाटली.  इतक्या क्षुल्लक बाबीकरिता मी त्यांना पुन्हा संपर्क साधायला का सांगतोय असा काहीसा आश्चर्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

साधारण तासाभराने मी त्यांना स्मरणशक्तीच्या विसंगतीचे उदाहरण देऊन त्याची उकल करायला सांगितली.  ते थोडक्यात असे -  आपण कधी कुठल्या अनोळखी व्यक्तीसोबत नव्याने ओळख करून घेतली आणि त्यावेळी त्या व्यक्तीने आपल्याला तिचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक हे तपशील सांगितले तर नाव आपल्या लक्षात चटकन राहते तर भ्रमणध्वनी क्रमांक आठवणीत राहिलेला नसतो.  याच वस्तुस्थितीची जाणीव व्हावी म्हणून सर्वांना मी माझे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक जो तासाभरापूर्वी सांगितला होता तो विचारला.  बहुतेकांना माझे नाव चटकन आठवले परंतु भ्रमणध्वनी क्रमांक डायरीत पाहून सांगावा लागला.  आता मी त्यांना ही समस्या अजूनच तपशिलात स्पष्ट करून सांगितली.  माझे नाव व क्रमांक त्यांच्या भ्रमणध्वनीवर अथवा डायरीत कशा पद्धतीने नोंद केला जातोय हे आधी फलकावर दाखविले.

Name     : CHETAN GUGALE
Number : 9552077615

म्हणजे नाव जिथे साठविले जात आहे तिथे १२ अक्षरे आहेत.  प्रत्येक अक्षर ए ते झेड या सव्वीस अक्षरांपैकी कुठले तरी एक आहे.  तरीही नाव चटकन लक्षात राहते तर क्रमांक जिथे साठविला जात आहे तिथे दहाच अंक आहेत आणि प्रत्येक अंकाच्या जागी ० ते ९ पैकी कुठला तरी एक अंक असणार आहे तरी क्रमांक चटकन आठवत नाही.  असे का होत असावे?  साधा तर्क लावला तर सव्वीस अक्षरांपैकी प्रत्येक जागी एक अक्षर असे मिळून बारा अक्षरांचे नाव आडनाव आणि त्याच्या तुलनेत प्रत्येक अंकाच्या जागी ० ते ९ पैकी एक अंक असा दहा अंकी क्रमांक यात क्रमांक लक्षात ठेवणे जास्त सोयीचे पडावे परंतु तसे न होता नाव लक्षात राहते या समस्येची उकल कशी काय करावी?

खरे तर व्यवहारात आपल्याला कधी ही समस्या जाणवत देखील नाही.  नाव लक्षात ठेवणे आपल्याला जास्त गरजेचे असते व आपला मेंदू ते बरोबर करतो.  क्रमांक लक्षात ठेवणे इतके गरजेचे नसतेच.  संपर्क साधतेवेळी ते भ्रमणध्वनीच्या अथवा डायरीतील संपर्क नोंदीतून सहज शक्य होते.  म्हणजे ही एक समस्या आपल्या दैनंदिन कामकाजाच्या वेगात कधी आपल्याला जाणवतच नाही परंतु अगदी बारीक सारीक विचार करत आहोत तर जाणवू लागली आहे.  बरं आता जाणीव झाली तर हे असे का घडतेय याची उकल देखील लवकर होत नाही.  म्हणजेच ही बारीक समस्या विचारात घेतली तर त्रास देते, पण विचारात घेतलीच नाही तर काहीच त्रास नाही.

प्रशिक्षणार्थींना हे उदाहरण पटले, पण हे असे का घडते हे जाणून घेण्यास ते उत्सुक होते म्हणून मी त्यांना याचे थोडक्यात स्पष्टीकरण दिले ते असे -  प्रत्यक्षात नावाची बारा अक्षरे आपण डायरीत किंवा भ्रमणध्वनीच्या संपर्क यादीत नोंद करून ठेवत असलो तरी मेंदूत ती त्याप्रकारे साठविली जात नाहीत तर त्या अक्षरांपासून बनलेला संच अर्थात आपले नावच पूर्णतः साठवले जाते.  हे अक्षरांचे संच अर्थात नावे आपल्या परिचयाचीच असतात त्यामुळे ती चटकन साठविली जातात.  म्हणजे चेतन गुगळे हे नाव आणि आडनाव मिळून एका व्यक्तीचे पूर्णं नाव जरी आपण प्रथमच ऐकत असलो तरी हे नावांचे आणि आडनावांचे शब्द म्हणजेच अक्षरांचे संच आपण पूर्वी ऐकलेले असतात.  आता ते इथे आपण एका चेहऱ्याच्या प्रतिमेसोबत आपल्या मेंदूत साठवून ठेवतो.  क्रमांक साठवताना आपल्याला जरी दहा आकडे नोंद करून ठेवायचे इतके लहान काम दिसत असले तरी प्रत्यक्षात आपला मेंदू थेट एखादा आकडा साठवू शकत नाही त्याला त्या आकड्यांचा उच्चार साठवावा लागतो.  जसे की नऊ पाच पाच दोन शून्य सात सात सहा एक पाच.  म्हणजे तसे पाहायला गेले तर दहा आकडे लक्षात ठेवणे हे बारा अक्षरी नाव लक्षात ठेवण्यापेक्षा जास्त अवघड आहे.  शिवाय इथे कुठला परिचित संच देखील नाही.  तसा तो असता तर क्रमांक लक्षात ठेवणे देखील सोपे गेले असते जसे की ४४४४४४४४४४ हा आस्कमी चा संपर्क क्रमांक आहे हे आपल्याला एकदा वाचलं किंवा ऐकलं की लगेच आठवणीत राहतं कारण ते आपल्या मेंदूत दहा वेळा चार या संचाच्या स्वरूपात साठवलं जातं.

ही समस्या जितकी लहान होती तितकंच तिचं उत्तर देखील साधंसोपं होतं, पण आधी एक तर समस्या कधी जाणवलीच नव्हती आणि जेव्हा तिची जाणीव करून दिली गेली तेव्हा तिची उकल लवकर करता आली नाही.  जेव्हा मी ती करून दिली तेव्हा "हात्तिच्या! हे तर किती सोपं होतं" असं वाटून गेलं.  जीवनातल्या बहुतेक समस्या ह्या अशाच क्षुल्लक असतात.  एक तर सहसा त्या जाणवत देखील नाहीत इतक्या सहजतेने पार केल्या जातात आणि कधी आपण तिथे अडखळलोच तर मात्र फरशीवर समोर पडलेली सुई दिसू नये अशी डोक्याची अवस्था होऊन जाते.  अशा वेळी चित्त शांत ठेवून समस्येला लहान लहान घटकांमध्ये विभागून तिच्याकडे पाहिलं की ती किती साधी वाटू लागते आणि तितक्याच सरळ सोप्या उपायांनी तिची उकल कशी होते हे मी उर्वरित प्रशिक्षण सत्रात सांगितलं.  

Wednesday 7 January 2015

पिंपरीची बस, प्रेमशास्त्र आणि मै प्रेम की दीवानी हूं।


१. पिंपरीची बस -  त्या काळी पुण्यात पीएमपीएमएल ऐवजी पिंपरी-चिंचवड (पीसीएमटी) व पुणे (पीएमटी) महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या बस सेवा होत्या.  कोणी कुठल्या भागात सेवा द्यायची याबद्दलचे काही नियम होते.  पुणे महानगरपालिकेच्या पुणेस्टेशन परिसरात पीसीएमटी ला प्रवासी भरण्यास मुभा होती परंतु पुणे मनपा परिसरात येथे पीसीएमटीला परवानगी नव्हती.  तसेच पीएमटीला निगडीच्या मुख्य चौकात तसेच पुढे जकातनाका, सोमाटणे फाटा, तळेगाव या भागापर्यंत प्रवासी वाहतुकीस परवानगी होती परंतु पिंपरी चिंचवड नवनगर (निगडी-प्राधिकरण), मासूळकर कॉलनी, पिंपरी गांव, वडगांव अशा काही भागांमध्ये पीएमटीला परवानगी नव्हती.  तिथे जायचे तर पीसीएमटीतूनच जावे लागे.  थोडक्यात काय तर तुमचे प्रवासाचे अंतिम इच्छित स्थळ काय असेल त्याप्रमाणे तुम्हाला पीएमटी की पीसीएमटी हा पर्याय निवडावा लागे.   तसेच पीएमटी व पीसीएमटी हे दोन्ही पर्याय देखील एकाच ठिकाणी उपलब्ध असतील असे नाही.  म्हणजे बघा, जर मी अहमदनगराहून एसटीचा प्रवास करून पुण्याला येत आहे तर ती एसटी बस पुण्यात पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर या दोन ठिकाणी थांबत असे.  जर मी शिवाजीनगर येथे उतरलो तर मग मला तिथून १.२५ किमी अंतर पायी अथवा तीन आसनी रिक्षाने जाऊन मनपा भवन येथून निगडी करिता पीएमटी पकडावी लागे.  निगडी येथून प्राधिकरणातले माझे घर १.६ किमी अंतरावर, म्हणजे मला हे अंतर देखील पायी अथवा तीन आसनी रिक्षाने पार करावे लागे.  दुसरा पर्याय असा की एसटी बस मधून पुणे स्टेशन येथे उतरून पाऊण किमी अंतर पायी अथवा तीन आसनी रिक्षाने पार करून साधू वासवानी चौकातील शालीमार हॉटेलजवळून प्राधिकरणात जाणारी पीसीएमटी बस पकडणे.  तिथून पुन्हा अर्धा किमी अंतर पायी अथवा तीन आसनी रिक्षाने पार करून माझ्या घरी पोचता येई.  वरवर पाहता दुसरा पर्याय जास्त आकर्षक वाटत असला तरी त्यात काही अडचणी होत्या.  त्या अडचणींचे मूळ पिंपरी-चिंचवड परिवहन महामंडळ (पीसीएमटी) ची आर्थिक ताकद पुणे परिवहन महामंडळाच्या आर्थिक ताकदी पेक्षा कमी असण्यात होते.  पीसीएमटी कडे बसेसची कमतरता असल्यामुळे साधू वासवानी चौकात बसची वाट पाहण्यात फार वेळ जाई तसेच बसथांब्यावर उन्हाचा त्रास देखील जास्त होत असे.  याउलट पीएमटी कडे बसेसची विपुलता असल्याने मनपाभवन येथे पटापट बस मिळत असे.  अर्थात पीएमटीला प्रवाशांची गर्दी देखील बरीच जास्त असे.  तसेच पीएमटी बस प्रवासाच्या पर्यायात जास्त अंतर पायी चालावे लागत असल्याने (तीन आसनी रिक्षाचा खर्च परवडण्यासारखा नसे) आम्ही शक्यतो पीसीएमटीचाच पर्याय निवडत असू.

तर असाच मी एकदा मे १९८५ मध्ये अहमदनगराहून एसटीने प्रवास करून पुणे स्टेशन येथे उतरलो होतो.  तिथून पिंपरी चिंचवड नवनगरातल्या (निगडी-प्राधिकरण) आमच्या घरी येण्याकरिता स्थानिक बस धरण्याकरिता साधू वासवानी चौकातील शालीमार हॉटेलसमोर थांबलो होतो.   बराच वेळ वाट पाहूनही प्राधिकरणाची बस काही आली नव्हती.  दुपारच्या उन्हाचा फारच त्रास होऊ लागला होता.  शेजारीच एका झाडाच्या सावलीत पिंपरीगांवची दुमजली (डबलडेकर) बस थांबली होती.  बसथांब्यावरचे प्रवासी हळूहळू त्या बसमध्ये जाऊन बसू लागले.  मी देखील सावलीच्या आशेने त्या बसमध्ये खालच्या डेकवर एका चांगल्याशा आसनावर जाऊन बसलो.  थोड्या वेळाने वाहक (कंडक्टर) येऊन तिकिटाविषयी विचारणा करू लागला.  प्राधिकरणाला जाणारी बस अजूनही दिसत नसल्याने इतर अनेकांप्रमाणे मी देखील पिंपरीचे तिकीट काढले.  पाचच मिनिटांत बसथांब्यावर प्राधिकरणाची बस आली.  माझ्यासह अनेक प्रवासी पिंपरीगांवच्या बसमधून उतरून प्राधिकरणच्या दुमजली बसमध्ये शिरले.  आम्ही सर्वच प्रवासी वाहकाला पिंपरीपासून पुढे प्राधिकरणापर्यंतचे वाढीव तिकीट मागू लागलो.  यावर वाहकाने साफ नकार दिला.  त्याचे म्हणणे असे की, इथून जर या बसचे तिकीट हवे असेल तर पुणेस्टेशन ते प्राधिकरण असे संपूर्ण तिकीट घ्यावे लागेल शिवाय आधी काढलेले पुणेस्टेशन ते पिंपरी हे तिकीट देखील रद्द होणार नाहीच.  यावर सर्वच प्रवाशांनी आम्हाला प्राधिकरणातच जायचे होते परंतु बराच वेळ वाट पाहूनदेखील बस न आल्याने आम्ही पिंपरीगांवच्या बसमध्ये नाईलाजाने शिरल्याचे व पिंपरीचे तिकीट काढल्याचे सांगितले.  त्यावर वाहकाने हसत हसत ही वस्तुस्थिती त्यास ठाऊक असल्याचे सांगितले.  त्याने आम्हाला खुलासा केला तो असा की, पीसीएमटी प्रशासनाने पुणेस्टेशन ते प्राधिकरण आणि पुणेस्टेशन ते पिंपरीगाव अशा दोन दुमजली बसेस सुरू केल्या परंतु पिंपरीगावच्या बसला अजिबात प्रतिसाद मिळत नसल्याने ती बंद करायची वेळ आली होती.  याउलट प्राधिकरण च्या बसला बऱ्यापैकी प्रवासी प्रतिसाद होता.  याचे कारण असे की, पीएमटीची बस प्राधिकरणात जात नसल्याने प्राधिकरणातील प्रवाशांना पीसीएमटीखेरीज पर्यायच नव्हता.  परंतु पिंपरीगावच्या बसला प्रतिसाद मिळण्याचे असे काही कारण नव्हते.  एक तर पिंपरीगाव हे पिंपरी चौकापासून फार लांब नव्हते त्यामुळे तिथले प्रवासी पीएमटीने पिंपरीपर्यंत जात व तेथून पायी आपल्या इच्छित स्थळी जात.  शिवाय वाकडेवाडी, खडकी, दापोडी, कासारवाडी असे अधलेमधले प्रवासी देखील पीएमटीलाच आपली पसंती देत कारण पीएमटीच्या बसेसची असलेली विपुलता.  तर अशा प्रकारे पिंपरीगावच्या बसला असलेला तोकडा प्रवासी प्रतिसाद भरून काढण्यासाठी या वाहकांनी आधी पिंपरीगावची बस थांब्याजवळ आणून उभी केली आणि बराच वेळानंतर जेव्हा त्यात पुरेसे प्रवासी भरले गेले आणि त्यांची तिकिटेदेखील काढली गेली तेव्हा हळुच प्राधिकरणाची बस थांब्याजवळ आणली.  वाहकांच्या या खेळीमुळे आम्ही सर्व प्रवासी चिडलो आणि दोन्ही वाहकांशी वादविवाद करू लागलो तेव्हा त्यांनी आम्हाला समजावले की हे असे करावे लागणे हा त्यांचाही नाईलाज होता.  त्यामुळे आता ते दोन्ही बसेस सोबतच जाऊ देतील.  पिंपरी चौकात आम्ही उतरून बस बदलू शकतो व पुढे आम्हाला तिथून प्राधिकरणापर्यंतचे तिकीट घेऊन प्रवास करता येईल.  शेवटी चरफडत आम्ही सर्व प्रवासी पिंपरीगावच्या बसमध्ये बसलो आणि त्या वाहकांच्या योजनेप्रमाणे पिंपरी चौकात बस बदलून वाढीव तिकीट घेत प्रवास पूर्ण केला. 

******

२. प्रेमशास्त्र (१९७४) -  सागर (देव आनंद) एक लेखक असतो.  तो आपल्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या नीलिमाच्या (बिंदू) प्रेमात पडून तिच्याशी लग्न करतो.  परंतु काही काळातच त्याचा भ्रमनिरास होतो.  त्या दोघांच्या जीवनपद्धती पूर्णतः वेगळ्या असल्याचे आणि त्यांचे सहजीवन यशस्वी होऊ शकत नसल्याचे त्याच्या लक्षात येते.  तो पत्नी पासून विभक्त होण्याचे ठरवतो.  त्यावर पत्नी त्याला सुचविते की लगेचच कायद्याने विभक्त व्हायची अशी काय गरज आहे?  आपल्या दोघांपैकी कुणाला एकालाही जर कधी तिसऱ्या कुणात रस वाटला तर आपण लगेच कायदेशीर घटस्फोट घेऊ आणि एकमेकांना मुक्त करू.  तोवर आपण समाजात दाखवायला पती-पत्नी म्हणून तरी वावरू शकतो.  सागरला हा प्रस्ताव मान्य होतो व त्याप्रमाणे तो नीलिमासोबत केवळ दिखावू कायदेशीर नाते चालू ठेवतो.  काही काळाने त्याच्या आयुष्यात त्याच्या पेक्षा बारा वर्षांनी लहान तरुणी बरखा (झीनत अमान) येते.  तो तिच्या प्रेमात पडतो.  तिच्याशी लग्न करायचे ठरवतो आणि त्याप्रमाणे स्वतःला मुक्त करून घेण्याकरिता पत्नी नीलिमाला विनंती करतो.  परंतु नीलिमा त्याला सांगते की बरखा ही तिची आधीच्या संबंधातून झालेली मुलगी आहे.  इतकेच नव्हे तर बरखाचा बाप हा सागर सख्खा मोठा भाऊ (अभि भट्टाचार्य) आहे.  तेव्हा सागरला कायद्यानुसार स्वतःच्या सावत्र मुली सोबत (जी नात्याने त्याची सख्खी पुतणीदेखील आहे) लग्न करता येणार नाही. 

ही वस्तुस्थिती ऐकून सागर अतिशय निराश होतो.  परंतु बरखावरील त्याचे प्रेम त्याला स्वस्थ बसू देत नाही.  आधी तो आपल्या मोठ्या भावाच्या पूर्वायुष्याविषयी माहिती घेतो आणि त्याला खात्री होते की बरखा ही त्याच्या भावाची मुलगी नाही.  त्यामुळे बरखासोबत असलेले त्याचे काका-पुतणीचे नाते आपोआपच संपुष्टात येऊन लग्नातला एक मोठा कायदेशीर अडथळा दूर होतो.  आता लग्नातला दुसरा मोठा अडथळा असतो तो म्हणजे नीलिमा सागरला त्या दोघांच्या विवाहबंधनातून मुक्त करायला तयार नसते आणि तिसरा अजून एक अडथळा असतो तो म्हणजे बरखाचे नीलिमासोबत असलेले मुलगी-आई हे नाते.  बरखाची आई असल्याने नीलिमा ह्या विवाहाला संमती देत नसते.  तेव्हा बरखाचा बाप कोण आहे व त्याची संमती आपण मिळवू या दिशेने शोध घेत असता सागरला आढळते की बरखाचा बाप म्हणजे नीलिमाचा पूर्व पती (रेहमान) याने नीलिमाला कधीच घटस्फोट दिलेला नसतो.  फक्त त्यांच्यातील मतभेदांमुळे ते एकमेकांपासून दूर राहत असतात.    त्याचप्रमाणे नीलिमाने बरखाला लहानपणीच शालेय शिक्षणाकरिता स्वतःपासून दूर ठेवलेले असते.  तेव्हा नीलिमाच्या नकळत बरखाचा पिता आपल्या खऱ्याखुऱ्या मुलीला स्वतःकडे घेऊन येतो आणि तिच्या जागी दुसऱ्याच मुलीला ठेवतो.  नीलिमा आपल्या मुलीला थेट मोठेपणीच पाहत असल्याने तिला हा बदल कळत नाही. 

सागर पुढे न्यायालयात हे सिद्ध करतो त्याला जिच्यासोबत लग्न करायचे आहे ती (झीनत अमान) ही नीलिमाची खरी मुलगी नसून खरी मुलगी (अंजू महेंद्रु) ही आहे.   तसेच नीलिमाचा पूर्वपतीपासून कधीच घटस्फोट झालेला नसल्याने सागर आणि नीलिमाचा विवाह हादेखील आपोआपच रद्द ठरतो.  अशा प्रकारे मार्गातले सर्व कायदेशीर अडथळे दूर होऊन सागर व बरखा एकत्र येतात.  दिग्दर्शक बी. आर. इशारा यांच्या दाव्यानुसार हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. 

*****

३. मै प्रेम की दीवानी हूं (२००३) - संजना (करीना कपूर) एक पदवीधर तरुणी.  तिची परदेशस्थ बहीण तिच्या आईवडीलांना (हिमानी शिवपुरी व पंकज कपूर) सुचविते की त्यांच्या माहितीतला एक तरुण प्रेम भारतात त्यांच्या गावी येणार आहे.  हा एक घरंदाज व श्रीमंत तरुण असल्याने त्याच्यासोबत संजनाचा विवाह जुळविण्याकरिता प्रयत्न करावेत.  ठरल्याप्रमाणे प्रेम भारतात येतो.  तो संजनाच्या प्रेमात पडावा व त्याकरिता त्यांच्यात जवळीक व्हावी अशी पुरेपूर व्यवस्था संजनाची आई करते.  सुरुवातीला संजना प्रेम सोबत तुटक वागते.  परंतु जसजसे ते एकमेकांसोबत अधिक वेळ घालवतात तसतसे तिच्या लक्षात येते की ती त्याच्यात मनाने गुंतत जात आहे. 

पुन्हा काही दिवसांनी संजनाच्या बहिणीचा आईवडीलांना निरोप येतो की तिने सुचविलेला प्रेम म्हणजे प्रेम कुमार (अभिषेक बच्चन) भारतात पोचलेलाच नसतो तर त्याऐवजी त्यांचा एक सहाय्यक असलेला प्रेम किशन (हृतिक रोशन) भारतात आलेला असतो.  प्रेमकुमार आगामी काळात भारत येणार असतो.  यानंतर संजनाची आई आता प्रेम कुमारच्या आगमनाची प्रतीक्षा करू लागते.  तिला आता संजनाचा विवाह प्रेम किशन ऐवजी प्रेम कुमार सोबत जुळवायचा असतो.  यथावकाश प्रेम कुमारचे आगमन होते.  आधी जो सन्मान, आदर, जिव्हाळा संजनाच्या आईकडून प्रेम किशन ला मिळालेला असतो तो आता प्रेम कुमारला मिळू लागतो.  संजनाची आई पदोपदी प्रेम किशनचा अपमान करू लागते, त्याला फटकारते, संजनापासून दूर ठेवायचा प्रयत्न करते.  संजना व तिचे वडील हे सर्व पाहून व्यथित होतात परंतु असाहाय्यपणे पाहत बसण्याखेरीज काहीच करू शकत नाहीत.  तर भोळ्याभाबड्या प्रेमकिशनला हे समजतच नाही.  तो आपल्याच नादात असतो.  इकडे आईच्या योजनेप्रमाणे संजना आणि प्रेम कुमार हे एकमेकांच्या सहवासात येतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की त्या दोघांच्या आवडीनिवडी,  त्यांच्या आवडीनिवडी यांच्यात कमालीचे साम्य आहे.  यामुळे प्रेम कुमार ला संजना फारच आवडते.  परंतु संजनाची मोठीच अडचण होते कारण ती प्रेमकुमारला नकार देणार तरी कशी?  तो सर्वच दृष्टीने योग्य वर असतो आणि मुख्य म्हणजे तिला अगदी अनुरूप असतो प्रेम किशन पेक्षाही जास्त आणि तेही कैक पटीने.  पण... टाइमिंग हा घटक फार महत्त्वाचा.  प्रेम किशनचा प्रवेश आधी झालेला असतो आणि सर्वार्थाने तो संजनाच्या मनात वसू लागलेला असतो. 

जर प्रेम कुमार आधी प्रवेश करता तर किंवा अगदी एकाच वेळी प्रेमकुमार व प्रेमकिशन सामोरे आले असते तरीही प्रेमकुमारचीच निवड ठरलेली होती परंतु संजनाच्या जीवनात प्रेमकिशनचाच प्रवेश आधी झाला असल्याने प्रेमकुमार हा सर्वार्थाने बेटरचॉईस असला तरीही अंतर्मनाचा आवाज ऐकत संजना प्रेमकिशनलाच आपला जीवनसाथी म्हणून निवडते.   प्रेमकुमार हे समजून घेतो तर संजनाच्या आईला ही वस्तुस्थिती तिचे वडील समजावतात.     

*****

अनेकदा आपल्या आयुष्यात निर्णय घेईपर्यंत आपल्यासमोर दुसरा पर्याय नसतो परंतु एकदा निर्णय घेऊन झाल्यावर कधी कधी दुसरा आकर्षक पर्याय समोर येतो.  दरेक वेळी निर्णय घेऊन झाल्यावर तो पुन्हा बदलणे हे एका बसमध्ये घाईघाईने चढल्यावर दुसरी अधिक सोयीची बस दिसते आहे म्हणून पुन्हा तितक्याच घाईघाईने पहिल्या बस मधून उतरून दुसऱ्या बसमध्ये चढण्याइतके सहज सोपे नसते.  आपली बस चुकली हे मान्य करूनही निदान काही अंतर तरी चुकीच्या बसमधून प्रवास करीत पुढे जावे लागते.  पिंपरीगावची बस बदलून प्राधिकरणाची बस धरण्याच्या घटनेत हा कालावधी तासाभराचा असू शकतो तर प्रेमशास्त्र चित्रपटातील नायक सागरच्या आयुष्यात जोडीदार बदलण्याकरिता त्याला वाट पाहावी लागण्याच्या प्रसंगात हा कालावधी अनेक वर्षांचा देखील असतो.  याहून भिन्न म्हणजे आपली निवड सर्वोत्तम नसली तरीही जी निवड आता आपण केली आहे त्यात भावनिक गुंतवणूक असल्याने हीच निवड आपल्या आयुष्यभराकरिता आहे हे मानून अन्य पर्यायांचा विचारच बाजूला ठेवणे अशी वेळ देखील मै प्रेम की दीवानी हूं मध्ये दाखविले आहे त्याप्रमाणे होऊ शकते. 

शिवाय आपल्या आयुष्याची मर्यादा देखील आपल्या ह्या निर्णय बदलण्याच्या सवयीवर मोठा परिणाम करून जाते.  लहानपणी कपडेखरेदीला पालकांसोबत दुकानात गेलेली मुले आधी एक पोशाख पसंत करतात.  इतक्यात दुकानदाराने दुसरा आकर्षक पोशाख समोर आणला म्हणजे पहिला टाकून दुसरा निवडतात.  त्या टप्प्यापर्यंत ते ठीक देखील असते पण एकदा बिलाची रक्कम देऊन दुकानाबाहेर निघाल्यावर जर शोकेसमध्ये अजून कुठला आकर्षक पोषाख दिसला तर फक्त मनातल्या मनात कुढत बसण्याखेरीज काहीच करता येत नाही.  हॉटेलात गेल्यावर खाण्याचे मेन्यू किंवा आइसक्रीमचा फ्लेवर निवडतानाही असे अनेकदा होते पण त्यात फारशी हळहळ होत नाही कारण पोटात जागा असली तर आधीची निवड संपवून नवीन पर्याय देखील पुन्हा मागविता येतो, किंवा मग पुढच्या वेळी आपली ऑर्डर त्यानुसार नोंदविता येते.  पुढे महाविद्यालयात प्रवेश घेताना असाच गोंधळ उडतो.  दहावीनंतर बारावीला पीसीबी आणि पीसीएम दोन्ही ग्रुप असू द्यायचे.  आधी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी यापैकी ज्या शाखेच्या प्रवेशाची प्रक्रिया आधी पार पाडली जाईल तिकडे प्रवेश घ्यायचा मग आपली आवड ज्यात असेल तिकडच्या प्रवेश प्रक्रियेत मनाजोगते काम झाले की आधीचा प्रवेश रद्द करायचा असा उपद्व्याप अनेक विद्यार्थी करत असतातच.  तसेच एखाद्या शाखेला प्रवेश घेतला आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर व्यावसायिक संधी तिकडे कमी आढळल्या की पश्चात्ताप करणारेही अनेक जण भेटतात. 

पहिली कार / बाइक खरेदी करताना देखील अनेकांचा असाच गोंधळ उडतो.  अनेकदा आपण खरेदी केल्यावर आपल्याला आवडेल असे मॉडेल बाजारात येते.  जर एकच कंपनी असेल तर काहीवेळा अपग्रेड करून देतात देखील.  आम्ही १९८७ साली कायनेटिक होंडा ही स्कूटर खरेदी केली तेव्हा ती फक्त लाल व निळ्या ह्या दोनच रंगात उपलब्ध असल्याने आम्ही निळ्या रंगात घेतली.  पुढे सहा महिन्यात तिच्यात पांढरा व चंदेरी हे दोन पर्याय अजून उपलब्ध झाले.  आधीच्या ग्राहकांना कंपनीने फुकट रंग बदलून देण्याची सुविधा ठेवली म्हणून आम्ही ती पांढरी करून घेतली.  शिवाय नव्याने समाविष्ट झालेली साईडस्टँड सारखी अजून काही वैशिष्ट्ये देखील आम्हाला मिळाली.  अर्थात हे दरवेळी शक्य असतेच असे नाही.  आपले सध्याचे वाहन विकून पुन्हा नवीन विकत घेणे यात बराच आर्थिक तोटा होतो.  अनेकजण तर बुलेट घ्यायचे ठरवितात पण सध्या आर्थिक चणचण आहे तेव्हा गरज भागवायला दुसरी बाइक घेऊ आणि नंतर सावकाशीने बुलेट घ्यायचे स्वप्न बघतात.  त्यांच्या वापरातल्या दुचाकीची पुनर्विक्री किंमत झपाट्याने घसरते आणि बुलेटची किंमत तितक्याच वेगाने वर चढत जाते त्यामुळे त्यांचे बुलेट घ्यायचे स्वप्न हे स्वप्नच राहते. 

तरीही या सर्व गोष्टींमध्ये निर्णय बदलणे हे तुलनेने कमी त्रासदायक वाटावे असे काही निर्णय आयुष्यात कायमस्वरूपी होऊन जातात.  जसे की, करिअर.  अनेकांना घरच्या जबाबदारी मुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा भरभरून उत्पन्न देणाऱ्या शाखांमध्ये शिक्षण घ्यावे लागते.  कालांतराने त्यांना आपल्या आतला एक कलाकार, लेखक, कवी, गायक टोचणी देत राहतो.  मग ती टोचणी तेवढीच तीव्र असेल तर सारे काही सोडून एखादा अभियंता चित्रपट दिग्दर्शक (रामगोपाल वर्मा) होतो.  एखादा डॉक्टर अभिनेता (श्रीराम लागू) किंवा गायक (पलाश सेन) होतो.  कुणी पूर्णवेळ लेखक तर कुणी निवेदक बनतात.  एखादा प्रशासकीय अधिकारी राजकारणी पुढारी (अरविंद केजरीवाल) बनतो.  प्रत्येकालाच हे शक्य होते असे नाही मग मी या प्रांताऐवजी त्या प्रांतात असतो तर यशस्वी बनलो असतो असे उसासे सोडले जातात.  याउलट काहींना जे बनायचे नसते ते नाईलाजास्तव बनावे लागते आणि तरीही ते अपेक्षेपेक्षा प्रचंड प्रमाणात यशस्वी होतात. 

तेव्हा आपल्या आयुष्यात योग्य तो निर्णय घेणे जमले नाही तरी आपण आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आहोत हे पाहून निर्णय फिरविल्यास आपल्याला त्याची किती मोठी किंमत चुकवावी लागेल याचा अंदाज घेऊन आणि त्याची तुलना भावी फायद्यांसोबत करीत एकतर लवकरात लवकर निर्णय बदलावा अन्यथा आपली बस चुकली हे मान्य करून पुढचा प्रवास चालू ठेवावा हेच योग्य.