जून २०१५ मध्ये एफटीआयआयच्या अध्यक्षपदी श्री. गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. चौहान आणि एफटीआयआय सोसायटीवरील संघ परिवाराशी संबंधित असलेल्या चार व्यक्तींना हटवण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी संप पुकारला. तब्बल १३९ दिवस चाललेल्या या संपाच्या काळात चौहान आणि केंद्र सरकारवर प्रचंड टीका झाली. चौहान यांना पदावरून दूर करण्याबद्दल निर्णय होत नसल्यामुळे ऑक्टोबर २०१५ मध्ये विद्यार्थ्यांनी संप मागे घेतला.
ज्या चौहान यांच्या अध्यक्षपदावरील गच्छंतीकरिता विद्यार्थ्यांनी प्रचंड आंदोलन केले त्यांची कारकीर्द ४ मार्च २०१७ रोजी संपली. चौहान यांच्या तेरा महिन्यांच्या कार्यकाळात आलेला नवीन अभ्यासक्रम, संस्थेत झालेले अॅक्टींग स्टुडिओ व चित्रपटगृह, सहा अभ्यासक्रमांना मिळालेला पदव्युत्तर पदवीचा समकक्ष दर्जा या उल्लेखनीय बाबी घडल्या. याव्यतिरिक्त नोंद घ्यावी असे आणि वादग्रस्त वाटावे असे काही त्यांच्या कार्यकाळात घडलेले आढळून येत नाही. हा संपूर्ण घटनाक्रम विचारात घेता विद्यार्थी संघटनांचा दुहेरी पराजय झालेला दिसतो. एक म्हणजे तब्बल १३९ दिवस संप करूनही शासनाने चौहान यांना पदावरून हटवले तर नाहीच उलट विद्यार्थी संघटनांना या मागणीशिवायच आपला संप मागे घ्यावा लागला. या संपाच्या निमित्ताने विद्यार्थी संघटनेचे नेते अभ्यासक्रम विहित मुदतीत पूर्ण न करता दहा वर्षांहूनही अधिक काळ वसतिगृहातील सवलती अत्यल्प दरात लाटत असल्याचे जनतेला प्रथमच कळले. विद्यार्थ्यांच्या या सवलतींनाही चाप बसला. तसेच ज्या व्यक्तीच्या हातात अध्यक्षपदाची सूत्रे दिली तर संस्थेच्या नावास काळिमा फासले जाईल अशी आवई प्रसारमाध्यमांमधून उठविली गेली त्यांच्याबाबत तसे काहीच घडल्याचे दिसून आले नाही.
मग इतके प्रचंड आंदोलन करून विद्यार्थ्यांनी नेमके काय साधले? या प्रश्नाचे उत्तर शोधू जाता हाती काहीच लागत नाही. गजेंद्र चौहान यांना विरोध करण्यामागचा एक मुद्दा असाही होता की त्यांनी खुली खिडकी, जंगल लव, वासना, जंगल की रानी, जवानी जानेमन अशा द्वितीय श्रेणी व तद्दन वाह्यात असंस्कृत चित्रपटांत काम केले असल्याने ते या पदावर काम करण्यास योग्य नाहीत. वास्तवात ८० व ९० च्या दशकांत प्रदर्शित होणारे हे असे चित्रपट त्यांच्या अंतरंगात काय घेऊन येणार आहेत हे त्यांच्या शीर्षकावरूनच समजत असे. ज्यांना त्यांवरूनही समजायचे नाही त्यांना हे असले चित्रपट श्रीकृष्ण, एक्सेल्सिअर, जयहिंद असल्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाले म्हणजे त्या ठिकाणी बाहेर लावलेल्या पोस्टर वरून तरी नक्की समजायचे की या चित्रपटांत नेमके काय दाखवले जाणार आहे. तारुण्यातील जोष उतू जात असलेला काही मर्यादित प्रेक्षकवर्ग सोडला तर इतर सामान्य प्रेक्षक असल्या चित्रपटांच्या वाटेला जात नसत. या चित्रपटांतील दृश्यांची चर्चाही वर्तमानपत्रे अथवा जनतेच्या संभाषणात होत नसे. त्यामुळे या चित्रपटांना अथवा त्यातील दृश्यांना फारसे गांभीर्याने घेण्याचे काहीच कारण नाही. समाजातील एक किरकोळ वर्ग सोडला तर इतरांच्या खिजगणतीतही असले चित्रपट कधी नसायचे. त्यामुळे असल्या चित्रपटांमुळे आपली संस्कृती बुडण्याचा काहीच प्रश्न नसे.
याउलट नंतरच्या काळात प्रदर्शित झालेला, लहान मुलांच्या गंभीर आजारावर भाष्य करणारा पा सारखा चित्रपट समाजाची चिंता जास्त प्रमाणात वाढवतो असे मला वाटते. चित्रपटाचा आशय आणि विषय सामाजिक असताना आणि तो बघण्यास समाजातील सर्व थरांतील आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकवर्ग येत असताना त्यात नायक अभिषेक बच्चन आणि नायिका विद्या बालन यांचे शयनगृहातील प्रणयदृश्य आणि धावत्या आगगाडीतील चुंबनदृश्य दाखविणे अनावश्यक आणि तितकेच धक्कादायक देखील होते.
पा चित्रपटातील अभिनेत्री विद्या बालन हिचाच आणखी एक चित्रपट - नो वन किल्ड जेसिका हादेखील तपास आणि न्यायव्यवस्थांतील त्रुटींवर भाष्य करणारा एक गंभीर चित्रपट. यातही नायिका विद्या बालनचे संदर्भहीन स्नानदृश्य, सहनायिका राणी मुखर्जीचे प्रणयदृश्य आणि तिच्या तोंडची गचाळ भाषा दाखविणे चिंताजनक होते. याशिवाय या चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व प्रसिद्धीच्या वेळी राणी मुखर्जी आणि विद्या बालन यांचे एक खळबळजनक चुंबनदृश्यही माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आले होते. प्रत्यक्षात असे कुठलेही दृश्य चित्रपटात नव्हते आणि चित्रपटाचा विषयदेखील दूरदूरपर्यंत समलैंगिकतेवर भाष्य करणारा नव्हता.
गमतीची गोष्ट म्हणजे पा आणि नो वन किल्ड जेसिका हे चित्रपट प्रसारमाध्यमांनी गौरविले. खरे तर हे मुख्य धारेतील चित्रपट होते आणि ते पाहायला येणारा प्रेक्षक सर्व थरातला होता. यातल्या दृश्यांची चर्चा सर्व समाजात होत होती. त्यांचा परिणाम कुटुंबातील लहान मुलांवरही होत होता. याउलट ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रकार न करणाऱ्या आणि आपण नेमके काय दाखविणार आहोत हे आधीच स्पष्ट करणाऱ्या आणि ठराविक प्रेक्षकवर्गासाठीच बनलेल्या खुली खिडकीसारख्या चित्रपटांचे अभिनेते गजेंद्र चौहान मात्र या प्रसारमाध्यमांच्या रोषास बळी पडले.
चौहान यांनी कारकीर्दीस सुरुवात केल्यानंतर त्यांच्याकडून काही चुका झाल्या असत्या आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असते आणि त्यावेळी प्रसारमाध्यमांनीही चौहान यांच्यावर टीका केली असती तर ते समयोचित ठरले असते. परंतु चौहान यांनी पदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वीच झालेले आंदोलन आणि त्यांच्यावर माध्यमांद्वारे झालेली अनाठायी टीका ही केवळ नकारात्मकतेचे प्रदर्शन करणारी ठरते.
माध्यमांद्वारे निष्कारण पसरविली जाणारी ही नकारात्मकता समाजात आता किती खोल प्रमाणात रुजली आहे याची तीन छोटी उदाहरणे खाली मांडत आहे.
1. एकदा वर्गात शिक्षिकेने फळ्यावर लिहिले - Make sentence using I. एक विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला, "आय इज्.. " पण त्याचे वाक्य मध्येच तोडत शिक्षिकेने त्याला सुनावले की आय नंतर नेहमीच ऍम, शॅल अथवा वॉज् यांच्यापैकी एखादे क्रियापद यायला हवे. आय नंतर इज् चा वापर करणे किती चुकीचे आहे यावर दहा मिनिटे प्रवचन दिल्यावर शिक्षिकेने जेव्हा त्याची वही पाहिली तेव्हा तिला खजील व्हावे लागले कारण त्यावर लिहिले होते - आय इज् द नाईंथ लेटर इन् इंग्लिश अल्फाबेट. खरे तर शिक्षिकेने आय चा वापर करून वाक्य बनवायला सांगितले तेव्हा तिने आय शब्द की आय अक्षर हे स्पष्ट केले नव्हते. विद्यार्थ्याने आय अक्षराचा वापर केला तर विद्यार्थी हा आय शब्दाचा वापर करीत आहे असे समजून पूर्ण वाक्य न ऐकताच शिक्षिकेने त्याच्यावर तोंडसुख घेणे चुकीचे होते.
2. एका तरुणाच्या लग्नाच्या दिवशीच त्याने एका व्यक्तीचा कुऱ्हाडीने घाव घालून जीव घेतल्याचे चित्रीकरण उपस्थितांच्या पाहण्यात आले. ते पाहताच त्याचे ठरलेले लग्न मोडण्याबरोबरच वाग्दत्त वधूचा पिता त्याच्या जीवावर उठण्याचा प्रसंग आला. पुढे अधिक स्पष्टीकरणाअंती निष्पन्न झाले की त्या तरुणाचा यात काहीच दोष नव्हता. त्याने पोलिसांनी "जिवंत अथवा मृत हव्या असलेल्या" एका गुन्हेगाराला ठार मारून पोलिसांनी ठेवलेले बक्षीस मिळविण्याकरिता मित्राकरवी केलेले चित्रीकरण कुणीतरी हितशत्रूने वाह्यातपणे त्यावेळी प्रदर्शित केले होते. उपस्थितांनी संपूर्ण परिस्थिती जाणून न घेताच त्या तरुणास अपराधी ठरविणे अयोग्य होते.
3. शक्याशक्यतांचा अंदाज लावण्याचा खेळ म्हणून मी एक प्रश्न माझ्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षणार्थींना नेहमीच विचारतो. एक वाहनचालक गेल्या तीस वर्षांहूनही अधिक काळ वाहन चालविण्याचे काम करीत आहे. आजपर्यंत त्याने काही लाख किलोमीटर वाहन चालविले आहे. या काळात त्याने एकही अपघात केला नसला तरी त्याच्या वाहनाचा वेग नेहमीच अत्युच्च राहिला आहे. त्याने बहुतांश वेळा वाहतूक नियमन करणाऱ्या दिव्यांचा इशारा (ट्रॅफिक सिग्नल) पाळलेला नाही. तरीही त्याचेवर आजवर कुठलीही कारवाई झालेली नाही. तर असा वाहनचालक कोण असावा? आणि त्याचेवर कारवाई न होण्याची कारणे काय असावीत? या प्रश्नांची उत्तरे देताना ज्या शक्यता प्रशिक्षणार्थींकडून वर्तविल्या जातात त्या अशा - वाहनचालक अतिशय श्रीमंत किंवा श्रीमंत कुटुंबातील असावा, राजकीय पक्षाचा पुढारी किंवा त्यांच्याशी संबंधित असावा. त्याचे वाहन अतिशय महागडे, वेगवान आणि ताकदवान असावे. तो अतिशय प्रसिद्ध कलाकार अथवा खेळाडू असावा की जेणेकरून त्याच्या चाहत्यांच्या प्रचंड संख्येला घाबरून अथवा पोलिस स्वतःच त्याचे चाहते असल्याने त्याचेवर कारवाई होत नसावी. काहीजण तर हा वाहनचालक स्वतःच पोलिस अधिकारी अथवा पोलिसाच्या कुटुंबीयांपैकी असावा अशीही शक्यता वर्तवतात. खरे पाहता या सर्वच अतिशय नकारात्मक शक्यता आहेत आणि यांच्या प्रत्यक्षात असण्याची प्रॉबॅबिलिटीही फारच कमी आहे. याउलट एक अतिशय सकारात्मक शक्यता की जी वास्तवात असण्याची प्रॉबॅबिलिटी फार जास्त आहे ती कुणी वर्तवत नाही हे फारच आश्चर्यकारक आहे. जगभरात अशा प्रकारचे लाखो वाहनचालक असतील तर ते कोण असतील अशी हिंट दिली तरीही प्रशिक्षणार्थी याचे सकारात्मक उत्तर ओळखू शकत नाहीत हे फारच खेदजनक आहेत. उलट जगभरात पोलिस भ्रष्ट झाले असतील आणि त्यामुळेच अशा लोकांवर कारवाई होत नसेल इतके टोकाचे नकारात्मक उत्तर त्यांच्याकडून येते. कमालीच्या वेगाने वाहन चालविणे, वाहतूक दिव्यांचा इशारा न जुमानणे यातून वाहनचालकाचे केवळ नकारात्मक चित्रच लोकांच्या डोळ्यासमोर का उभे राहते? अशा प्रकारे वाहन चालविण्याची मुभा आणि गरज असलेली व्यक्ती रुग्णवाहिकेचा (ऍम्ब्युलन्स) चालक असू शकेल ही सकारात्मक शक्यता बहुसंख्य लोक ध्यानी का घेत नाहीत?
हे सारे आताच आठविण्याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेश या देशातल्या सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी योगी श्री. आदित्यनाथ यांची झालेली निवड. ३/४ जागा मिळवून राज्यात सत्तारूढ झालेल्या भारतीय जनता पक्षाने लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या या आमदाराची मुख्यमंत्री पदाकरिता घोषणा करताच प्रसारमाध्यमांमध्ये त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द कशी असेल याविषयी तर्कवितर्कांना नुसतेच उधाण आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी अजून आपली मुख्यमंत्री पदाची कारकीर्द सुरू करावयाची आहे. रीतसर शपथविधी वगैरे होऊन ते सूत्रे हाती घेतील. आता खुल्या मनाने त्यांना आणि त्यांच्या पक्षाला (आणि पर्यायाने मतदारांनी दिलेल्या भरघोस जनादेशाचा आदर राखत) शुभेच्छा देत त्यानंतर त्यांच्या कारभारावर बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्याकडून काही आगळीक घडलीच जाब विचारायला आणि टीका करायला माध्यमांना मुभा आहेच पण त्यापूर्वीच अनाठायी अंदाज बांधत विरोधक व प्रसारमाध्यमांनी गजेंद्र चौहान प्रकरणाप्रमाणे आपले पुनश्च एकवार हसे करून घेऊ नये इतकीच अपेक्षा आहे.
चौहान यांच्या ब श्रेणी चित्रपटांपैकी एक म्हणजे - खुली खिडकी. या चित्रपटाच्या नावाचा एफटीआयआय आंदोलनादरम्यान अनेकदा उल्लेख झाला होता. खरे तर खुली खिडकी फारशी धोकादायक नाहीच. निदान तिच्यामुळे आत काय आहे ते बाहेरच्यांना दिसते तरी. धोकादायक आहेत त्या बंद खिडक्या. काय घडणार आहे ते माहिती करून घेण्याची वाट पाहण्यापेक्षा भविष्यात काय घडेल याचे आधीच छातीठोक भाकीत वर्तविणे आणि तसे जणू घडणारच ही काळ्या दगडावरची रेघ समजून ते घडण्यापूर्वीच अर्वाच्य स्वरात आपला विरोध चालू करणे योग्य नव्हे. आपल्या झापडबंद विचारसरणीला लागलेल्या या नकारात्मकतेच्या बंद खिडक्या उघडण्याची आत्यंतिक गरज आहे.
चेतन सुभाष गुगळे