का ल द र्श क

Friday 26 November 2010

अजमल कसाबचं काय केलं?

आज मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला दोन वर्षं पूर्ण झाली (म्हणजे हल्ला ज्या दिवशी सुरू झाला त्या दिवसाला कारण तो हल्ला तीन दिवस चालु होता).  मागच्या वर्षी म्हणजे जेव्हा या हल्ल्याला एक वर्षं पूर्ण व्हायला काही दिवस बाकी होते तेव्हा मी मुंबईत दुचाकीवरून रात्रीचा फेरफटका मारायचं ठरवलं.  कडक पोलीस बंदोबस्त असेल असा माझा समज होता.  रात्री बेरात्री भटकतोय म्हंटल्यावर पोलीस मला हटकतील असं वाटलं आणि त्यामुळे पोलीसांना माझा उद्देश समजावा या करिता व त्यांनाही त्यांच्या कामात त्रास होऊ नये या विचाराने आणि माझ्याकडून सहकार्य व्हावे या हेतूने मुंबई पोलीस  आयुक्तांना उद्देशून एक पत्र टंकलिखीत केले.  ठिकठिकाणी असा पोलीस बंदोबस्त असेल व प्रत्येक वेळी मला त्या कर्मचार्‍यांना देण्यास सोयीचे होईल म्हणून या पत्राच्या दहा प्रती सोबत बाळगल्या होत्या. 

माझ्या घरातून (निगडी, पुणे येथून) मी सायंकाळी ठीक सहा वाजता निघालो.  दादर येथे रात्री साडेनऊ वाजता पोचलो.  एका उपाहारगृहात जेवण करून तेथून रात्री सव्वा दहा वाजता बाहेर पडलो.  मरीन ड्राईव्ह येथे रात्री पावणे अकरा वाजता दुचाकी वाहनतळावर लावून काही काळ पायी भटकंती केली.  त्यानंतर पुन्हा दुचाकीवरून शहराच्या विविध भागांमध्ये चकरा मारल्या.  या संपूर्ण कालावधीत मला कुठेही पोलीसांनी हटकले नाही.  मुख्य म्हणजे पोलीस बंदोबस्तावर असलेले मला कुठे दिसलेच नाहीत.  मरीन ड्राईव्ह येथे एका बाकड्यावर दोन पोलीस गप्पा मारीत बसले होते. इतरही काही ठिकाणी पोलीस खुर्च्यांवर आरामात बसले होते.  त्यांना बंदोबस्तावर असलेले असे काही म्हणता येणार नाही.  मध्यरात्र उलटून गेल्यावर परगावच्या क्रमांकाची दुचाकी घेऊन (शिवाय माझ्या डोक्यावर ज्यातून चेहरा दिसणे शक्य नाही असे काळ्या काचेचे हेल्मेट होते) रस्त्यावर फिरणार्‍या मला त्यांनी थांबवून हटकायला हवे होते.  तसे त्यांनी केले नाही, उलट मीच काही पोलिसांना रस्त्याची माहिती विचारली असता त्यांच्या आरामात मी  व्यत्यय आणला असा उद्वेग त्यांच्या चेहर्‍यावर दिसला.  त्यामुळे माझ्याकडील पत्राची एकही प्रत मला प्रत्यक्षात कुठेही पोलिसांना देण्याचा प्रसंग आलाच नाही व सर्वच्या सर्व प्रती अजूनही माझ्यापाशीच आहेत.

पोलिसांनंतर ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे असे समजले जाते त्या खासगी सुरक्षा रक्षकांचा अनुभवही फारसा आशादायक नव्हता.  ज्या ट्रायडेंट हॉटेल वर हल्ला झाला तिथे अतिशय कडक बंदोबस्त होता, पण सुरक्षेचे निमित्त करून त्यांनी हॉटेलच्या जवळील पदपथावर बांबू लावून अतिक्रमण केले होते व सरळ सरळ हा पदपथही खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने स्वत:च्या ताब्यात घेतला होता.   याच भागात असणार्‍या इतर इमारतींमध्ये जिने व इतर मोकळ्या जागांमध्ये विजेचे दिवे चालु होते पण व्यक्तींचा वावर नव्हता.  इमारतींना एकाहून अधिक फाटक होते, पण सेवेवरील सर्व सुरक्षा रक्षक एकाच फाटकापाशी जमून पत्ते खेळत होते तर काहीजण तेथे शेजारीच पथारी टाकून झोपले होते.  म्हणजे दुसर्‍या फाटकातून कोणी इमारतीत प्रवेश केला तरी या रक्षकांना त्याचा काहीच पत्ता लागणार नव्हता.  शहरातील बहुतेक इमारतींबाबत अशीच परिस्थिती होती.

अशा प्रकारे सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे लक्षात आल्यावर मी माझ्या या भेटीतील इतर निरीक्षणांवर आधारित दुसर्‍याच विषयावर एक लेख लिहून तो ब्लॉग वर प्रसिद्ध केला.  अर्थात या भेटीदरम्यान जाणवलेली व विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मुंबईतील टॅक्सीचालक हेच रात्रीच्या मुंबईचे खरे पहारेकरी.  बहूतेक ठिकाणी हे टॅक्सीचालक अतिशय सतर्क असलेले आढळले.  त्यांनी मला एका ठिकाणाहून दुसरीकडे कसे जायचे याबद्दल माझ्या विनंतीवरून मार्गदर्शन तर केलेच पण त्याशिवाय मी कोठून आलो आहे व असा का भटकत आहे हेदेखील जाणून घेण्यात त्यांनी रस दाखविला (जे खरे तर पोलिसांकडून अपेक्षित होते).  अर्थात या रात्री भेटलेल्या टॅक्सीचालकांमध्ये मराठी भाषिक अभावानेच आढळले, बहुतांश परप्रांतीय च होते.

असो.  तर यावर्षी पुन्हा मुंबई भटकंती करून फारसे काही नवीन बघावयास मिळेल असे वाटले नाही.  त्याऐवजी दुसर्‍या एका महत्त्वाच्या विषयावर विचारमंथन करून ते ब्लॉगवर प्रकाशित करावे असे मी ठरविले.  हा दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे अर्थातच त्या दहशतवादी हल्ल्यातील दहा हल्लेखोरांपैकी पोलिसांनी जिवंत पकडलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब.  मी गेली दोन वर्षे आणि आजही कित्येकांच्या चर्चेत ऐकतोय, वाचतोय, पाहतोय तो एकच प्रश्न म्हणजे अजमल कसाबचं काय करणार?

मला वाटतं त्याचं काय करणार ह्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे अजमल कसाबचं काय केलंत?  होय गेली दोन वर्षे ताब्यात असणार्‍या या इसमाचं पोलिसांनी नेमकं काय केलं?  काय करता येऊ शकलं असतं? किंवा खरं तर काय केलं जाणं अपेक्षित होतं?  आता त्याला फाशी द्या अशी लोकभावना आहे पण गेल्या दोन वर्षांतील घडामोडींवर दृष्टीक्षेप टाकल्यास असं लक्षात येईल की त्याला फाशी देण्याची प्रक्रिया आपणच आपल्या हातांनी अतिशय अवघड करून टाकलीय.  जेव्हा ह्या मोहिमेत त्याचे इतर साथीदार जागच्या जागीच ठार मारण्यात आले आणि हा एकटा जिवंतपणे पोलिसांच्या ताब्यात आला त्यावेळेपासून ते आजतागायत उचलण्यात आलेली पावले पाहता या सगळ्या प्रकरणाचा शेवट कसाबच्याच पथ्यावर पडणारा आहे. 

कसा तो पाहा :-

सर्वप्रथम ताब्यात आलेल्या कसाबवर खटला चालवायचा निर्णय घेण्यात आला.  त्यासाठी त्याला वकील निवडण्याची संधी देण्यात आली.  त्याला ते जमले नाही म्हणून आपल्या तर्फेच त्याच्याकरिता वकीलाची सोय केली गेली (त्यातही दोन वेळा बदल करण्यात आला).  आपल्याला असे दाखवायचे होते की आपण कसाबची बाजू पूर्णपणे न्यायाने आणि त्याला ती मांडण्याची सर्वप्रकारे संधी देऊन मगच निर्णय घेणार आहोत (हे सारे आपण कुणाला दाखविणार आहोत? अंकल सॅमला?).  जेव्हा हा निर्णय घेतला गेला तेव्हाच कसाबला आपण एक फार मोठा मार्ग उपलब्ध करून दिला तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयांपर्यंतची विविध पातळ्यांवरील न्यायालये आणि त्यात त्याला बाजू मांडण्याची संधी आणि त्याउप्परही राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करण्याची खास सवलत.  ह्या सगळ्या प्रक्रियांना लागणारा विलंब लक्षात घेता कसाबला सहज दहा ते पंधरा वर्षांचा अवधी आपण बहाल केला हे आपल्यापैकी कुणाच्याच कसे लक्षात आले नाही.  कारण यापैकी प्रत्येक पातळीवर जरी त्याच्या विरोधात निर्णय झाला तरीही वरच्या पातळीपर्यंत दाद मागण्याचा अधिकार आपणच त्याला देऊ केलाय.  तो आता आपण नाकारला तर मग त्याला सुरूवातीलाच न्यायालयात सादर करण्याच्या निर्णयालाच अर्थ राहत नाही.  म्हणजे आता आपण या मार्गावरून हटू शकत नाही.  उलट तो प्रत्येक वेळी काही ना काही तांत्रिक मुद्दे (जसे की त्याची गैरसोय होतेय, त्याचा वकीलावर, आरोग्य तपासणी अधिकार्‍यांवर विश्वास नाही वगैर, वगैरे) उपस्थित करून वेळेचा प्रचंड अपव्यय करून आधीच वेळखाऊ असलेली प्रक्रिया अधिकच लांबवू शकतो.  त्याशिवाय या कालावधीत तो आजारपणाने, किंवा इतर कुठल्याही कारणाने पोलिसांच्या कैदेतच मृत्यू पावता कामा नये.  याकरिता त्याला उत्कृष्ट प्रकारचे अन्न व सर्वप्रकारच्या वैद्यकीय सोयीसुविध पुरविण्याची जबाबदारीही आपोआपच आपल्या शिरावर येऊन पडलीय.  त्याच्या विरोधात जनमतही प्रचंड असल्याने त्याला घातपात होण्याची शक्यता गृहीत धरून त्या दर्जाचे संरक्षण पूरविणे हेही मोठे जिकीरीचे व खर्चाचे काम आहेच.

एवढा लांबलचक व वळणा वळणांचा मार्ग निवडून आपण त्याच्यावर महत्त्वाचा आरोप काय ठेवला तर देशाविरुद्ध युद्ध पुकारणे.  या एका वाक्याने तो नायकपदावर विराजमान झाला.  याचे प्रमुख कारण म्हणजे चोरी, खून, बलात्कार हे सारे जगाच्या पाठीवर सगळीकडे निसंशय अपराधच ठरतात म्हणजे कायद्याच्या दृष्टीनेही आणि नैतिकतेच्या दृष्टीनेही.  याउलट युद्ध हे ज्या देशाविरोधात लढले जाते त्या देशाच्या कायद्याचा तो भंग होत असला तरी जो देश युद्ध पुकारतो तो त्याला कायदेशीर रीत्या अपराध समजत नाहीच शिवाय नैतिकतेच्या दृष्टीने पाहता तो तर एक पराक्रमाचाच भाग असतो.   शिवाय आपण त्याला युद्ध पुकारण्यावरून पकडले असे म्हणत असू तर तो युद्धकैदी झाला आणि मग तो सैन्याच्या ताब्यात जायला हवा आणि सैन्यानेच त्याचा फैसला करायला हवा.  असे केल्यास मग तो युद्धकैद्यांच्या दर्जाचा मानून त्याची पाकिस्तानबरोबर आपल्या युद्धकैद्यांच्या बदल्यात देवाणघेवाण करावी लागेल आणि असे केले गेले तर जनमत प्रक्षुब्ध होऊन सरकारच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.

आता तो देशाविरुद्ध युद्ध पुकारतोय म्हंटल्यावर सैन्याच्या ताब्यात असायला हवा पण आहे मात्र पोलिसांच्या ताब्यात कारण त्याला पोलिसांनी पकडलेय, सैन्याने नाही.  (आता इथून पुढचा विचार करता दिसतील त्या आपल्या व्यवस्थेतील त्रुटी)  पोलिसांनी पकडले कारण तो शहरात नागरिकांवर शस्त्रांच्या साहाय्याने हल्ला करीत होता.  अर्थात पोलीसांनी त्याला पकडले असले तरी कुठलाही कायदा मोडल्याचा ठपका ते त्याच्यावर ठेऊ शकत नाहीत कारण मुळातच त्याला कुठलेही कायदे लागू होतच नाहीत.  कायदे इथल्या अधिकृत नागरिकांकरिता बंधनकारक असतात किंवा मग अधिकृतरीत्या व्हिसा घेऊन येणार्‍या परकीय नागरिकांवर.  हा तर बेकायदा घुसलेला म्हणजे याला शहरात आल्यावर नव्हे तर देशाच्या सीमेवर घुसखोरी करीत असतानाच पकडायला हवा होता आणि तो ही सैन्याने, पोलिसांनी नव्हे.  तसे घडले नाही हा सैन्याचा दोष नाही का?

दुसरे अतिशय महत्त्वाचे म्हणजे कसाब व त्याचे साथीदार साठ तास पोलिसांसोबत / सैन्यासोबत लढता येईल इतका शस्त्रसाठा / दारुगोळा स्वत:बरोबर घेऊन आले.  इतका दारुगोळा व शस्त्र सैन्याच्या नजरेखालून सुटून या देशात / शहरात आलेच कसे?  त्यानंतरही शहरात पोलिसांनी त्यांना या गोष्टी बाळगण्याबाबत दोषी मानून आधीच अटकेत का टाकले नाही?  आपल्या देशात स्वसंरक्षणासाठी देखील सहा इंच किंवा त्याहून लांब पात्याचे हत्यार इथले अधिकृत नागरिकही जवळ बाळगू शकत नाही तिथे नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवरच येऊन पडते.  या जबाबदारीचाच एक भाग म्हणून शहरातील सर्वच जण या शस्त्रास्त्र कायद्याचे पालन करताहेत याची खात्री करून घेणे, ज्याचे पालन मुंबई पोलिसांनी इमानदारीने केले नाही असे अत्यंत खेदाने नमूद करावे लागते.

थोडक्यात कसाब, त्याचे साथीदार व त्यांची शस्त्रसामुग्री मुंबई शहराच्या  मध्यवर्ती भागात सैन्य अथवा पोलिसांचा पहारा चुकवून आत पोचतात आणि साठ तास शहराला वेठीस धरून अंदाधुंद गोळीबार करतात, कित्येक निरपराधांचे प्राण घेतात हे सारेच अविश्वसनीय आहे.  त्याहून महत्त्वाचे म्हणजे या दहा जणांचा मुकाबला आपण हजार जणांच्या मदतीने करतो (पोलीस, एनएसजीचे कमांडो, इत्यादी) आणि शेवटी जेव्हा हे सारे रोखण्यात आपण यशस्वी होतो तेव्हा आपण त्याला आपला विजय (?) मानतो.  हे सारेच अतर्क्य आणि आचरटपणाचे नाही का?  पुर्वी शिवाजी महाराज अतिशय निवडक मावळ्यांच्या सोबतीने मुघलांवर स्वारी करीत आणि मुघलांचे सैन्य हजारोंच्या संख्येने असले तरी त्याला धूळ चारीत.  आजच्या काळात कसाब फक्त मोजक्या दहा साथीदारांसह इथे येतो आणि आपल्याला त्याच्याशी लढायला हजार माणसे लागतात आणि तीही आपल्याच प्रदेशात.  युद्धाच्या डावपेचांमध्ये कोण कुणाचे अनुयायी आहेत?

दोन वर्षे झाली कसाब पोलिसांच्या ताब्यात आहे.  या कालावधीत त्याला इथपर्यंत येण्यास कोणी मदत केली त्या सैन्यातल्या व पोलिस दलांमधल्या नावांचा अजून आपल्याला छडा लागू नये?  पोलिसांनी थर्ड / फोर्थ अगदी हव्या त्या डिग्रीचा वापर करून गुन्हेगारांकडून आतापर्यंत इतर प्रकरणांत माहिती मिळविली आहेच ना? मग या प्रकरणात त्यांना ही माहिती का मिळू शकली नाही?  ही माहिती जर दोन वर्षांत मिळविता येत नसेल तर मग त्याला जिवंत पकडून त्याच्या पालनपोषणाचा खर्च करण्यात काय हशील आहे? त्याच्या इतर साथीदारांप्रमाणेच त्यालाही जागच्या जागी संपविता आले असतेच की.

कसाबला जिवंत पकडण्यासाठी स्वत:च्या देहाची चाळण करणार्‍या तुकाराम ओंबळे यांचे बलिदान व्यर्थच गेले म्हणायचे.

15 comments:

  1. दूर्दैवाने तू म्हणतो आहेस ते खरंय चेतन...ह्या पेक्षा जास्ती काहीच लिहू शकत नाही. :(

    ReplyDelete
  2. आता आपण स्वत:च बनविलेल्या चक्रव्युहात सापडलो आहोत. त्याला मारू तर शकत नाहीच, उलट त्याला अगदी ऐषारामी व्यवस्थेत पोसत राहून तो म्हातारा होऊन त्याला नैसर्गिक मरण कधी येईल याची वाट पाहणं एवढंच आपल्या हाती आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. मला आणखी एक प्रश्न भेडसावतो, चेतन. पोलिसांनी कसाबला पकडलं. नसतं पकडलं तर एक तर तो निसटला असता किंवा त्याच्या साथीदारांप्रमाणेच मेला असता. या हल्ल्यानंतर कसाबसह त्याच्या सर्व साथिदारांनी मरण्याचीच तयारी ठेवली होती. मग हा हल्ला करून कुणाला नेमकं काय साध्य करायचं होतं? केवळ दहशत बसवणं हा उद्देश असू शकत नाही. निश्चितच जास्त उद्देश असले पाहिजेत. कुठलीतरी अतिसंवेशनशील, अतिभयानक माहिती लपवण्यासाठी तयार केलेलं हे पांघरूण आहे.

      Delete
  3. हि न्यायव्यवस्था बदलायला हवी .... पण यासाठी आपण काहीच करू शकत नाही हे हि तितकंच खरं ...! अजूनही आपली सरकार अफजल गुरु ला फाशी देऊ शकली नाहीये ... ! मग कासाबला फाशी देणं लांबच राहिलं , केवळ हे ' त्या ' धर्माचे आहेत म्हणून कॉंग्रेस सरकार यांना फाशी देण्याचा टाळतय ..असं वाटू लागलंय ... !

    ReplyDelete
  4. ’त्या’ धर्माचे हे काही कारण नाही म्हणता येणार. कसाबच्या उरलेल्या साथीदारांना उडविलंच ना? कसाबला जिवंत ठेवून न्यायासनासमोर त्याच्या तोंडून आपल्याला हवं ते वदवून घेण्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील डावपेचांचा हा एक भाग होता. ज्यात भारतीय मुत्सद्दी सपशेल अपयशी ठरले आणि कसाब विजयी ठरला, कारण आपल्या हुशार, अतिहुशार, सुशिक्षित आणि उच्च शिक्षित विद्वानांपेक्षा हा तेवीस वर्षांचा अशिक्षित युवक जास्त चलाख निघाला.

    ReplyDelete
  5. फुसका कायदा आणि त्याच्या फुसक्या वल्गना.. बाकी काय..

    ReplyDelete
  6. नाही भारत, कायदा फुसका आहे असं मी नाही म्हणणार. त्याची अंमलबजावणी कशी करायची यावर सारं अवलंबून आहे. कलमं कुठली लावायची, आरोपपत्रं कसं बनवायचं यासाठी हुशार वकिलाची आवश्यकता असते. बॅरिस्टर जीना किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या हुशार कायदेतज्ज्ञांची आज आपल्या देशाला खरी गरज आहे.

    मुख्य म्हणजे हा खटला भरण्यापेक्षा कसाबला सैन्याकडूनच मारायला हवं होतं. पण असा निर्णय घेण्यासाठी तेवढी बौद्धिक पात्रता असणारे नेतेही आज दुर्मिळ होत चाललेत.

    ReplyDelete
  7. कायद्यामध्ये अश्या गुन्ह्यांसाठी तरतुदी करायला हव्यात...बदल हवेत. खरच त्या कसाबला गेट वे ला फाशी जाताना बघायची इच्छा आहे..पण हे शक्य नाही..पण अश्या गोष्टी केल्या नाहीत तर ह्या लोकांच्या मनात भीती निर्माण होणार नाही. ते येतात बिंदास मारायला आणि मरायलापण त्यांना माहीत असत की भारतीय कायदा त्यांना इतक्या सहज मरू देणार नाही आणि त्यांच्या तो विश्वास हीच आपल्या सर्वांची....^&%&%$^$

    सोड :(

    ReplyDelete
  8. खरंय चेतन, तू म्हणतोयस ते. तो कसाब म्हणजे अवघड जागी दुखणं होऊन बसला आहे. मी पण आज शतपावलीवर या विषयावरच पण थोडा वेगळ्या अंगाने लेख लिहीला आहे.

    ReplyDelete
  9. पूर्वी काही राजे युद्धात हरायचे पण तहात जिंकायचे. तर काही युद्धात जिंकलेले तहात घालवायचे.
    २६/११ ला आपण युद्धही हरलो व उरलेल्या २ वर्षात तहातहि हरतच आलो.
    ह्यासाठी बरीच कारणे आहेत.
    चेतन तुम्ही वरील लेखात त्यांचे तुमच्या पद्धतीने अगदी योग्य शब्दात विश्लेषण केले आहे.

    वरील लेखात दोन प्रमुख मुद्दे आले आहेत. पाहिला सुरक्षा व दुसरा कसाब. दोन्हीमध्ये एक समान सूत्र आहे ते म्हणजे आपला ढिसाळपणा.
    हा ढिसाळपणाच आपल्या देशाचा गुणधर्म आहे व तोच आपल्याला इतर प्रगत देशांपासून वेगळे करतो.

    ReplyDelete
  10. ही आपली खरच खुप मोठी शोकांतिका आहे...
    योग्य तेच आणि खुप विचारपुर्वक लिहल आहेस...

    ReplyDelete
  11. सुहास मी आधीच नमूद केल्याप्रमाणे कायदा नुसता कडक असून उपयोगाचा नाही तर त्याची अंमलबजावणी देखील तितकीच महत्त्वाची आहे. हे दहशतवादी आत घुसलेच कसे? पहार्‍यावरील लोकांनी सीमारक्षण नीट केले नाही हा त्यांचा दोष आहेच ना?
    कसाबला आपण कितीही कडक शिक्षा दिली तरी त्याने काहीच साध्य होणार नाहीय. पुन्हा नवीन दहशतवादी येणारच कारण त्यांची मरायची तयारी असतेच. पुन्हा एखादा अतिरेकी देशात घुसणार की नाही हे अवलंबून आहे ते आपण किती कडक शिक्षा आपल्या दोषी अधिकार्‍यांना देतो यावर.

    ReplyDelete
  12. अपर्णाजी, आपला लेख मी वाचला. त्यात आपण जवानांचं कौतुक केलंय. अर्थात सैन्यातील निदान काही जण तर हलगर्जी आहेत हे आपणही मान्य करालच ना कारण आपणच म्हंटल्याप्रमाणे अवघड जागचं दुखणं होऊन बसलेला कसाब तिथवर पोचलाच कसा? सैन्यातील कुणाचं तरी ईमान विकत घेऊनच ना?

    असो. तुमच्या लेखाच्या शीर्षकात ज्या गाण्याचं नाव तुम्ही टाकलंय त्या गाण्याच्या जन्माची मूळ हकीकत देखील तुम्ही इथे वाचा म्हणजे आपण भारतीय किती संवेदनाशून्य आहोत आणि तेही फार पूर्वीपासूनच हे तुमच्या लक्षात येईल.

    http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_633.html

    ReplyDelete
  13. रणजीत आणि देवेन्द्र आपल्या प्रतिक्रियेबद्दल आपणा दोघांचेही मन:पूर्वक धन्यवाद.

    ReplyDelete
  14. माझ्या लेखातील

    << ज्या ट्रायडेंट हॉटेल वर हल्ला झाला तिथे अतिशय कडक बंदोबस्त होता, पण सुरक्षेचे निमित्त करून त्यांनी हॉटेलच्या जवळील पदपथावर बांबू लावून अतिक्रमण केले होते व सरळ सरळ हा पदपथही खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने स्वत:च्या ताब्यात घेतला होता. >>

    या मुद्यावर आज इतक्या वर्षांनी कारवाई झाली.

    http://www.loksatta.com/mumbai-news/fine-to-hotel-taj-1090851/

    दहशतवादी हल्ल्यानंतर रस्ता आणि पदपथ अडवून त्याचा वाहने उभी करण्यासाठी वापर करणाऱ्या कुलाबा येथील ताज हॉटेलकडून दोन कोटी रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच ताज हॉटेलने बळकावलेला रस्ता ताब्यात घेण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी प्रशासनाला गुरुवारी दिले.
    मुंबईमधील ट्रायडेंट हॉटेल, ताज हॉटेल, नरिमन हाऊस, लिओपोल्ट रेस्तराँवर २००९ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर ताज हॉटेलने समोरील रस्ता आणि पदपद बॅरिकेड घालून अडविला होता. या जागेमध्ये नागरिकांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता. मात्र हॉटेलमध्ये उतरणारे पर्यटक आणि सुरक्षा रक्षक या भागामध्ये संचार करीत होते. हॉटेल ताजने केवळ सुरक्षेच्या नावाखाली २००९ पासून या परिसरावर कब्जा केला आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्यांची वाहने काही भागांत उभी केली जातात. मात्र गेट वे ऑफ इंडिया पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना वळसा घालून जावे लागते. त्यामुळे हा रस्ता आणि पदपथ पालिकेने तात्काळ ताब्यात घ्यावा, अशी मागणी काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केली.

    ReplyDelete

Note: only a member of this blog may post a comment.