का ल द र्श क

Friday 14 January 2011

आयडीअल चा खरा अर्थ

सर्वसाधारणपणे आपण ज्याला आपली बोली भाषा म्हणतो ती छापील पुस्तकी भाषेहून बरीच वेगळी असते.  त्यात दुसर्‍या भाषेतील शब्दांचा मुक्त वापर तर असतोच पण अनेकदा ते शब्द बिनदिक्कतपणे चूकीच्या अर्थाने वापरले जातात.

असाच एक इंग्रजी शब्द म्हणजे आयडिया (IDEA).  या शब्दाचा मराठीत अर्थ होतो कल्पना, पण आपल्यापैकी अनेक जण हा शब्द चक्क युक्ती या अर्थाने बोलताना वापरतात.  लोकांनी अशा वेळी योग्य मराठी शब्द वापरावा किंवा ते जर जमणार नसेल व इंग्रजी शब्दच वापरायचा असेल तर ट्रिक (Trick) हा शब्द वापरावा या अर्थाचे मार्गदर्शनपर लिखाण यापूर्वीच अनेक विद्वानांनी केले आहे.  उदाहरणादाखल राधा मराठे यांनी लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीतील माय मराठी या सदरात २९ एप्रिल २००६ रोजी लिहिलेला हा लेख.  या लेखातल्या बाराव्या परिच्छेदात त्यांनी या आयडिया / युक्ती शब्दांच्या चूकीच्या वापराविषयी अतिशय विस्ताराने लिहीले आहे.

या आयडियाचेच अपत्य असलेला एक शब्द म्हणजे आयडीअल (Ideal).  या शब्दाचाही आपल्याकडे बोलताना सढळ वापर केला जातो.  कुणी जर अगदी सरळ, अजिबात गैरमार्गांचा अवलंब न करता वागायची भाषा करू लागला तर त्याला तिथल्या तिथे परावृत्त करताना सुनावले जाते "उगाच आयडीयल गोष्टी बरळू नको, प्रॅक्टीकल काय असेल ते बोल".  या ठिकाणी त्या परावृत्त करणार्‍या व्यक्तीला प्रॅक्टीकलचा अर्थ वास्तविक किंवा वास्तवातले असा अपेक्षित असतो तर त्याचवेळी आयडीअल चा अर्थ काल्पनिक किंवा प्रत्यक्षात नसणारे असा अपेक्षित असतो.

आयडीअल म्हणजे आदर्श असा एक अर्थ शब्द कोशात दिलेला आहे पण त्या अर्थाला आयडीअल हा शब्द ज्या आयडीया या शब्दा पासून तयार झालाय त्या शब्दाच्या अर्थाचा आधार नाहीय.  त्याचवेळी शब्दकोशात आयडीअल चा अजून एक अर्थ काल्पनिक असा आहे आणि या अर्थाला आयडियाच्या अर्थाचा तार्किक आधार देखील आहे. 

विज्ञानात मुख्यत्वेकरून आयडीअल हा शब्द काल्पनिक या अर्थानेच वापरला जातो.  विज्ञानातील बर्‍याच संकल्पना या केवळ कल्पनेतच असू शकतात, प्रत्यक्षात असू शकत नाहीत. उदाहरणार्थ :- आयडीअल व्होल्टेज सोर्स (ज्याचा रेझिस्टन्स इन्फाईनाईट आहे) किंवा आयडीअल करंट सोर्स (ज्याचा रेझिस्टन्स झीरो आहे), आयडिअल मशिन / इंजिन (ज्यांची इफिशिअन्सी १०० टक्के आहे), इत्यादी.

व्यवहारात मात्र आयडीअल हा शब्द जास्तकरून आदर्श म्हणजेच संपूर्णत: दोष विरहीत, शुद्ध या अर्थाने वापरला जायला हवा.  आपल्याकडे मात्र लोकांनी बोली भाषेत आयडीअल हा शब्द अशा काही पद्धतीने वापरलाय की त्यामुळे आयडीअल असं काही जगात असूच शकत नाही हेच ऐकणार्‍याच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न चाललाय असं वाटू लागलंय.  विशेषत: भ्रष्टाचाराच्या संदर्भात बोलायचं तर भ्रष्टाचार जिथे होत नाही असं एखादं सरकार, एखादा प्रशासकीय विभाग, अशी एखादी संस्था, एखादा व्यवसाय किंवा आता तर आयुष्यात कधीच भ्रष्टाचार केला नाही अशी एखादी व्यक्ती अस्तित्त्वात असूच शकत नाही याबाबत आपल्या मनात दृढ विश्वास होत चाललाय.  या संदर्भात आयडीअल चा अर्थ आपण आदर्श नाही तर केवळ काल्पनिक च असू शकतो यावर ठाम होत चाललो आहोत.

आयडिया हा शब्द चूकीच्या अर्थाने वापरणारे आपण आयडीअल हा शब्द (शब्दकोशाच्या दृष्टीने) बरोबर अर्थाने वापरत असलो तरी त्यामागची आपली मानसिकता बरोबर आहे असे आपल्याला खरंच वाटते का?


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.