का ल द र्श क

Friday 10 April 2015

एका द्वयर्थी गीताचे रसग्रहण


जेव्हा एखाद्या वाक्यरचनेतून एकाहून अधिक अर्थ ध्वनित होतात तेव्हा श्लेष अलंकार साधला जातो. या गाण्यातही अशाच प्रकारे वाक्यरचनेतून दोन अर्थ आपण काढू शकतो. त्याचप्रमाणे प्राथमिक श्रवणातून जो अर्थ निघतो त्यातही नेहमीच्या पारंपारिक विचारांपेक्षा एक नवा आधुनिक विचार प्रकट केलाय जो निदान मला तरी अतिशय महत्वाचा वाटतो.

सुरूवातीचे ५० सेकंद केवळ वाद्यांचा आवाज आणि लताचा ओलाप ऐकू येतो. त्यानंतर गीताचे शब्द सुरू होतात.

नदीया बहती है तुमसे कहती है ...
सागरसे मुझको मिलना नही है, सागरसे मिलके मै खारी हो जाऊंगी।

या ओळींमधूनच आपल्या लक्षात येतं की गीतकार एक वेगळा नवा विचार आपल्यासमोर मांडतोय. नेहमी नदी सागरा मिळते, नायक नायिकेचे नाव सागर सरिता असणे वगैरे गोष्टी आपण चिक्कारदा ऐकल्या आहेत. इथे नदी सांगतेय की मला सागराला भेटायचंच नाहीये. त्याला भेटून माझं पाणी खारट होईल. आता हा विचार नवा जरी असला तरी चूकीचा नक्कीच नाहीये. नदीचं पाणी एकदा सागरात मिसळलं की ते खारटच होणार. 

बांधलो मुझे, रोक लो मुझे; मै तुम्हारी हो जाऊंगी ।

बघा म्हणजे ही नदी म्हणतेय की मला सागराला जाऊन मिळण्यापासून थांबवा, अडवा. मी तुमच्या उपयोगी पडेन. जुनाट विचारांचे लोक धरणे बांधायला विरोध करीत त्या पार्श्वभूमीवर तर हा विचार अधिकच प्रेरणादायी वाटतो. शिवाय मला यातून जाणवलेला एक छुपा दुसरा अर्थ असा की वरवर ऐकायला जरी हे गीत नदीचे आत्मवृत्त प्रकारातील वाटत असले तरी खोलवर ते कुठेतरी एका स्त्रीचे आत्मवृत्त आहे. ती म्हणतेय की माझे घरचे माझा कल न पाहता, माझ्या मनाचा विचार न करता मला कुणाच्या तरी गळ्यात बांधतील, जे की मला पसंत नाही. त्या अगोदर माझ्या मनाचा विचार करणार्‍या, माझी आवडनिवड जोपासणार्‍या कुणीतरी मला आपली बनवा. थोडक्यात हा घरच्यांनी ठरविलेला विवाह विरुद्ध प्रेमविवाह असा सामना आहे आणि ही स्त्री आपल्या प्रियकराला साद घालतेय. तिच्या मनात जी पारंपारिक नवर्‍याची प्रतिमा आहे तिला तिने सागराची उपमा दिली आहे आणि तिला हव्याहव्याशा वाटणार्‍या प्रियकराला तिने धरणाची उपमा दिलीय.

नाव तो क्या गांव बह जाते है मेरी चाल मे ऐसी रवानी।
बांधलो मुझको बहक न जाए चंचल चंचल जवानी का पानी॥

नदीच्या प्रवाहाला असणार्‍या वेगाचा अंदाज आला नाही तर नौका तर डुबतेच आणि कधी काळी जर नदीने रौद्र रूप धारण केलं तर गावंच्या गावं पाण्याखाली जातात. तेव्हा या पाण्याच्या प्रवाहाला वेळीच आवर घाला असंही ही नदी सूचवितेय. पुन्हा याच शब्दांचा स्त्रीच्या संदर्भामध्ये अर्थ शोधला तर स्त्रीच्या आकर्षण प्रवाहात बुडालेला टायटॅनिक मधला प्रियकर देखील आठवेल आणि स्त्रियांना मिळविण्याकरिता पुरूषांनी केलेली युद्ध आणि त्यात बेचिराख झालेल्या राज्यांच्या कथाही आठवतील. वेळीच योग्य हाती हे तारूण्य सुपूर्त झालं नाही तर नेमकं काय होईल याचा अंदाज तिलाही नाही म्हणूनच ती म्हणतेय बहक न जाए चंचल चंचल जवानी का पानी.

मेरी आंचलमें है अमृत वह देदे जो नयी जिंदगानी।
आंगन आंगन बरसेगा कंचन, जानसे तुमको मै प्यारी हो जाऊंगी।

इथेही पुन्हा आंचलमें अमृत हा शब्द नदीच्या संदर्भात पाणी या अर्थाने तर स्त्रीच्या संदर्भात दूध ह्या अर्थाने वापरला असून दोन्हींमूळे नवजीवन मिळते. त्याचप्रमाणे नदीच्या पाण्याने शेते पिकून सोन्यासारखे धान्य प्रत्येक अंगणी बरसेल तर स्त्री घरादाराचं सोनं करून टाकेल आणि या दोघीही त्यांच्या कुटुंबियांना (नदीचं कुटुंब तर अख्खा गावच) प्राणप्रिय होतील.

रेत जहां, खेत लहराएंगे जागेगी धरतीकी ममता सोयी।
प्यार तुम्हे दुंगी, बहार तुम्हे दुंगी, प्यासा रहेगा न पनघट कोई।।

आज जिथं वाळवंट आहे उद्या तिथे नदीच्या पाण्यामुळे शेते बहरतील. पुरुषांचं आयुष्य काम, धंद्या निमित्त कराव्या लागणार्‍या ढोरमेहनतीमुळे वैराण वाळवंटासारखंच असतं. प्रेयसीच्या रुपाने येऊन स्त्री त्याला प्रेम देते आणि त्याची ही तहान भागविते हा भाव अतिशय सुरेख पद्धतीने व्यक्त झालाय.

मेरा नामोनिशां फिर होगा कहां, मै जो समंदर में खोई।
मुझे अपनालो, गांव मे बसालो, तुम्हारीही सारी की सारी हो जाऊंगी॥

मी जर त्या खारट समुद्राला जाऊन मिसळले तर मग माझ्या गोड्या पाण्याचं अस्तित्व काय राहणार? मला इथेच आपलं बनवा. या गावातच मला थांबवा म्हणजेच धरण बांधा. माझं पाणी तुमच्याच उपयोगी पडू द्या.
पूर्वी मुलीच्या घरचे केवळ जात, धर्म, पैसा, अडका यांनी भुलून जाऊन मुलीला कुठेतरी दूरच्या शहरी विवाह करून पाठवायचे. तिथे तिचा पती बहुतेकदा तिचे मन जाणु न शकणारा, अरसिक, शुष्क मनोवृत्तीचा असायचा अशा हकीकती आपल्याला ठाऊक आहेतच. अशाच पतीला तिने खारट समुद्राची उपमा दिलीय. अशा घरात माझं अस्तित्व ते काय असणार? त्यापेक्षा गावातल्याच तिच्या अस्मितेला जपणार्‍या एखाद्या तरूणाने तिचा प्रियकर बनुन तिला आपलं बनवावी हिच तिची इच्छा दिसतेय.

गीतलेखनाबरोबरच लताचा आवाज आणि कानाला सुखावणारं संगीत या जमेच्या बाजू आहेत. तीन दशकांपूर्वीच्या नई इमारत या चित्रपटातील ह्या गीताला पडद्यावर साकारलंय विद्या सिन्हा, परीक्षित सहानी, अमरिश पुरी आणि इतर सहकलाकारांनी. 

परंपरेने ठरवून दिलेला समुद्र हा नायक झुगारून आपल्या मनातला खरा नायक धरणच आहे असे ठासून सांगणार्‍या सरितेच्या या गाण्याचा आस्वाद एकदा तरी जरूर घ्यावा.

3 comments:

  1. खूप छान रसग्रहण! Hats off !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद दत्तात्रयजी पटवर्धन.

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Note: only a member of this blog may post a comment.