का ल द र्श क

Wednesday 8 December 2010

भारताला गरज भरताचीभारतीय नागरीक आपल्या पुराण पुरूषांच्या / देवतांच्या बाबतीत जरा जास्तच हळवे असतात.  त्यांच्या विषयी कुठे काही वादग्रस्त छापून आले तर लगेच आक्रमक होऊन दंगल / जाळपोळ करतात.  पण हेच भक्त लोक आपल्या आदर्शांचे गुण स्वत:च्या अंगी बाणविण्याबाबत तितकेसे उत्साही नसतात.  रामायणातील राम व महाभारतातील कृष्ण हे आपल्यापैकी बहुतेकांचे आदर्श.  मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा चमत्कारी श्रीकृष्ण बनणे हे आजच्या जमान्यात कुणालाच शक्य नाही.  त्यापेक्षा रामायणातला किंवा महाभारतातला भरत बनणे आपल्याला जमू शकेल.  किंबहुना आजच्या भारताला राम किंवा कृष्णापेक्षा भरताचीच जास्त गरज आहे.

रामायणातील भरत हा आद्यकाळातील विश्वस्त (Trustee) म्हणता येईल.  हाताशी आलेले अयोध्येचे राज्य त्याने आपल्या थोरल्या बंधुसाठी नाकारले.  पण त्याहूनही विशेष म्हणजे रामाच्या आग्रहावरून त्याने चौदा वर्षे राज्यकारभार चालविला, तोही राजा बनुन नव्हे तर राजाचा प्रतिनिधी म्हणून, त्याच्या पादुका गादीवर ठेवुन. तो स्वत: राजसिंहासनावर कधीच बसला नाही.  चौदा वर्षे त्याने विश्वस्त म्हणून निष्ठेने राज्य चालविले आणि त्यानंतर राम वनवासावरून परत येताच ’इदं न मम’ या वृत्तीने ते रामाच्या सुपूर्त केले.

महाभारतातील भरताचे काम तर रामायणातील भरताहूनही अधिक कठीण होते.  रामायणातील भरताला राज्यासाठी उत्तराधिकारी निवडण्याची गरज नव्हती.  राम येताच अयोध्येचे राज्य त्याला सुपूर्त करावयाचे हे भरताला ठाऊक होते.  परंतू महाभारतातील भरताला वानप्रस्थाश्रमास जाण्यापुर्वी आपला उत्तराधिकारी निवडायचा होता.  महाभारतातील भरत हा राजा दुष्यंत व शकुंतला यांचा पुत्र, हस्तिनापूरचा सम्राट, चंद्रवंशी राजा भरत होय.  असे म्हणतात की याच्याच नावावरून आपल्या देशाचे नाव भारत असे पडले.  ह्या भरताला आठ पुत्र होते.  आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून तो ह्या आठांपैकी कुणाचीही निवड सहज करू शकला असता.  त्याकाळी राजेशाही पद्धत अस्तित्त्वात असल्याने त्यात कुणाला काही खटकण्यासारखेही नव्हते.  परंतू आपल्या आठही पुत्रांपैकी कुणीही राजगादीसाठी पात्र नसल्याचे लक्षात येताच त्याने आपल्या राज्यातील एका योग्य तरूणाची (शंतनू) आपला राजकीय वारस म्हणून निवड केली.  आपल्या रक्ताच्या पुत्रांना डावलून एका परक्या तरूणाला राज्याभिषेक करण्याचे धाडस सम्राट भरत दाखवू शकले ते केवळ त्यांच्या अंगी असलेल्या विश्वस्त वृत्तीमुळेच.

राजा भरताची ही विश्वस्त वृत्ती हस्तिनापूरच्या पुढील राज्यकर्त्यांना जोपासता आली नाही.  सरसकट सर्वांनी आपल्या पुत्रांना राजगादीवर बसविले.  सरळ मार्गाने पुत्र झाला नाही तर व्यभिचाराने पुत्रांना जन्म दिला.  (आठवा व्यासांपासून राणी अंबिकेला झालेला अंध धृतराष्ट्र, तर अंबालिकेला झालेला रोगट पंडू).  पण यापैकी एकालाही आपणदेखील सम्राट भरताप्रमाणेच राज्यातील एखाद्या होतकरू तरूणाला आपला राजकीय वारस नेमावे असे वाटले नाही. 

आजच्या जमान्यात तर लोकशाही सत्ता पद्धत अस्तित्त्वात असून देखील आपल्या अपात्र चिरंजीवांना सत्तेत आणण्याची धडपड करणारे नेते पाहता, त्या काळातही घराणेशाही जनतेवर न लादण्याचा सम्राट भरताचा निर्णय केवळ स्तुत्यच नव्हे तर अनुकरणीय देखील वाटतो. 


आपण राज्याचे मालक नसून विश्वस्त आहोत व ही सत्तेची खिरापत आपल्या घराण्यातील लोकांना वाटण्यासाठी नसून हे पद विश्वस्त वृत्तीने काम करू शकेल अशा लायक व्यक्तीला सोपविणे ही आपली जबाबदारी आहे हे आजच्या लोकप्रतिनिधींनी समजून घेतले पाहिजे.  खरेतर अनेकांना ही बाब कळते पण वळत नाही.  ह्याला कारण पुत्रप्रेम माणसाला अंधत्व आणते व त्याला कर्तव्य दिसत नाही.  संभाव्य उमेदवारांमध्ये आपला पुत्रही असेल तर साहजिकच त्याला झुकते माप दिले जाते.  महाभारतातही पुत्र की पुतण्या हा निर्णय घेताना धृतराष्ट्राला निष्पक्षपातीपणा दाखविता आला नाही.  तीच चूक आजचे नेतेही करीत आहेत.  नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वरीष्ठ सनदी पोलीस अधिकारी देखील पोलीस दलात घराणेशाही आणत आहेत.  (आठवा लोकसेवा आयोग परीक्षा घोटाळा).

अर्थात पुत्राला आपला उत्तराधिकारी नेमले नाही तरीही अडचणच.  लोक तिकडूनही नावे ठेवतात.  (महात्मा गांधींची चारही मुले फारशी चमकली नाहीत; त्यावेळी गांधींनी मुलांसाठी काहीच केले नाही, ते आपल्या पितृधर्माला जागले नाहीत, अशी त्यांच्यावर टीका करणारेही अनेक जण सापडतील).  तसेच गृहस्वामिनीचा रोषही पत्करावा लागतो.  याशिवाय राजकारण काही पुर्वीइतके सरळ राहिलेले नाही.  हल्लीच्या जमान्यात सरळमार्गी माणसालाही कधी कधी चौकटीबाहेर जाऊन काही कामे करावी लागतात.  अशा व्यक्तीची ही जगापासून गुप्त असलेली व त्याला अडचणीत आणू शकणारी रहस्ये त्याच्या पुत्राला नक्कीच ठाऊक असतात.  पुत्राला दुखविणे हे सर्वनाशालाच निमंत्रण ठरू शकते.  (पाहा - अमिताभ बच्चन यांचा सरकार हा चित्रपट).  म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती.

त्यामूळे बरेचदा राज्यकर्त्यांना अनेकदा अनिच्छेनेच आपल्या अपात्र पुत्रांनाही आपला राजकीय वारस घोषित करावे लागते.  ’अत्यूच्च पदी थोरही बिघडतो’ अशा अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे.  हा थोर बिघडतो तो बहुधा या पुत्रप्रेमा अथवा पुत्रदबावामूळेच.

सम्राट भरताची विश्वस्त वृत्ती अंगी बाणवायची असेल तर सार्वजनिक क्षेत्रात मोठी जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी स्वत:ला अपत्य होऊ न देण्याचा कठोर निर्णय घेणे हेच इष्ट.  अनेकांना हे विधान धाडसाचे वाटू शकेल, परंतू मोठ्या पदाची मनीषा बाळगून असलेल्या व्यक्तींनी एवढा किमान त्याग तरी केलाच पाहिजे.  हा विचार जगावेगळा, बहुमताच्या विरुद्ध वाटण्याची शक्यता आहे.  परंतू एक लक्षात ठेवले पाहिजे की जग हे अतिसामान्य विचारसरणीच्या बहूसंख्य लोकांमुळे चालले नसून असामान्य, लोकोत्तर विचारसरणीच्या संख्येने अत्यल्प असलेल्या लोकांमुळेच चालले आहे.  बसमध्ये साठ प्रवासी असतात, परंतू बस चालविण्याचे काम एकटा चालकच करीत असतो.  साठही प्रवासी उतरून गेले तरीही चालक एकटा बस पुढे नेऊ शकतो.  पण साठ प्रवासीदेखील चालकाशिवाय बस चालवू शकत नाहीत.  प्रत्येकानेच अशा प्रकारे वर्तन करावे अशी अपेक्षा नाही, परंतू भारताच्या एक अब्ज लोकसंख्येतून निदान असा एकतरी भरत निर्माण व्हावा ही अपेक्षा चूकीची आहे काय?

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.